
रस्त्यावर खडी पडल्याने धोका
रस्त्यावर खडी
पडल्याने धोका
कुडाळ ः मुंबई-गोवा महामार्गावर पावशी-कुंभारवाडी येथे मंगळवारी (ता. २६) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कुडाळच्या दिशेने येणाऱ्या हिरव्या रंगाच्या डंपरच्या मागील फाळक्यातून शंभर मीटर लांबपर्यंत खडी पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. याबाबत कुडाळ पोलिसांना माहिती मिळताच वाहतूक पोलिस अमोल बंडगर, दयानंद चव्हाण व अर्चना धर्णे घटनास्थळी दाखल झाले. खडी पडल्याचा अंदाज वाहनधारकांना येत नव्हता; मात्र पोलिस व नागरिकांनी वाहतूक सुरळीत केली. महामार्ग प्राधिकरणाला कळवून खडी दूर करण्यात आली.
--------------
जिल्हा बॅंकेचे
आवाहन
कुडाळ ः बँक कर्जाची शंभर टक्के पूर्ण फेड केलेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संस्था समिती सदस्य व सचिव यांचे अभिनंदन करण्यासाठी २९ ला सकाळी ११ वाजता कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात सभा आयोजित केली आहे. ३० जून अखेरपर्यंत ज्या विविध सहकारी संस्थांनी जिल्हा बँकेकडून घेतलेले कर्ज वेळेत भरणा केले, त्या संस्था अभिनंदनास पात्र आहेत. अशांचा सन्मान करण्यात येणार आहे. या सभेत संस्थांच्या सक्षमीकरणाबाबत चर्चासत्र घेण्यात येणार आहे. उपस्थित राहवे, असे आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.
----------------
शॉनचे मिनेझीसचे
आयएससीमध्ये यश
सावंतवाडी ः शहरातील जुनाबाजार येथील मूळ रहिवासी व मुंबई येथील बॉम्बे स्कॉटिश स्कूलचा विद्यार्थी शॉन फ्रान्सिस मिनेझीस याने बारावी परीक्षेत (आय.सी.एस.ई.-आयएससी) विज्ञान शाखेतून ९९.२५ टक्के गुण मिळवत मुंबई विभागात तिसरा क्रमांक पटकाविला. शॉन मिनेझीस हा मूळ सावंतवाडीतील रहिवासी आहे. (कै.) जोसेफ मिनेझीस यांचा तो नातू आहे. नोकरीनिमित्त मिनेझीस कुटुंबीय मुंबई येथे स्थायिक झाले आहेत; मात्र आपल्या मूळ सावंतवाडी-जुनाबाजार येथे त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे येणे-जाणे असते. शॉनच्या अद्वितीय यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
--------------------
डिझेल कोट्याची
आकडेवारी मागविली
मालवण ः १२० अश्वशक्तीपेक्षा जास्त क्षमता असलेल्या ३ हजार ३३ यांत्रिकी मासेमारी नौकांना गत पाच वर्षांमध्ये किती डिझेल कोटा मंजूर झाला होता? त्यापैकी किती डिझेल कोटा त्यांनी प्रत्यक्ष उचलला? याची आकडेवारी सादर करण्याची सूचना राज्याचे उपसचिव श्रीनिवास शास्त्री यांनी मत्स्य आयुक्तांना केली आहे. त्यानुसार मत्स्य व्यवसाय सहआयुक्त महेश देवरे यांनी जिल्हानिहाय सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांना पत्र पाठवून माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81313 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..