वेंगुर्लेला सदैव झुकते माप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेंगुर्लेला सदैव झुकते माप
वेंगुर्लेला सदैव झुकते माप

वेंगुर्लेला सदैव झुकते माप

sakal_logo
By

39038
वेंगुर्ले ः रेडी विकास संस्थेचा सत्कार करताना जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी. सोबत प्रज्ञा परब व इतर.

वेंगुर्लेला सदैव झुकते माप

मनीष दळवी ः विकास संस्था सक्षमीकरण मेळावा उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २७ ः जिल्हाभरात ९१ तर वेंगुर्लेत ४ विकास संस्थांनी १०० टक्के वसुली केली. विकाससंस्थाच्या उलाढालीमध्ये वेंगुर्ले तालुक्याचा नंबर सातवा लागतो. तालुक्यात सहकार चळवळ वृद्धिंगत व्हावी म्हणून यावर्षीपासून प्रत्येक तालुक्यात मेळावे घेण्याचे नियोजन केले असून याचा प्रारंभ आज वेंगुर्लेतून होत आहे. आजवरच्या इतिहासात प्रथमच वेंगुर्लेला जिल्हा बॅंक अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. त्यामुळे तालुक्याला निश्चितच झुकते माप देण्यात येईल; मात्र विकास संस्थांनी कर्ज वाटप व वसुली अशा सर्वच बाबतीत आघाडीवर राहावे, असे आवाहन जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी येथे केले.
येथील साई डिलक्स सभागृहात बुधवारी प्राथमिक विकास संस्था सक्षमीकरण मेळावा झाला. यावेळी दळवी बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा बॅंकेच्या माजी संचालक प्रज्ञा परब, जिल्हा बॅंकेचे कार्यकारी अधिकारी अनिरुध्द देसाई, क्षेत्रवसुली सरव्यवस्थापक देवानंद लोकेगावकर, कर्ज विभाग प्रमुख श्री. वरक, संगणक संस्था प्रमुख श्री. हडकर, तालुका विकास अधिकारी भाग्येश बागायतकर, विकास अधिकारी दत्तात्रय आजगावकर आदी उपस्थित होते.
यावेळी ३० जून अखेरपर्यंत वसुलपात्र बॅंक कर्जाची १०० टक्के वसुली केल्याबद्दल क्षेत्रपालेश्वर विकास संस्थेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष नारायण पार्सेकर, सचिव राजबा सावंत यांचा सत्कार अनिरुद्ध देसाई यांच्या हस्ते, तर रेडी ग्रामविकास संस्थेच्या चेअरमन चित्रा कनयाळकर, उपाध्यक्ष नूतन मांजरेकर, सचिव सदानंद नाईक, दाभोली विकास संस्थेचे चेअरमन उदय गोवेकर, उपाध्यक्ष विवेक परब, सचिव मनोहर नाईक, उभादांडा विकास संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण गावस्कर, उपाध्यक्ष पेडणेकर व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच १०० टक्केच्या जवळपास पोहोचलेल्या पाल, मातोंड, सातेरी, केळुस, म्हापण व वेंगुर्ले ग्रुप या सहा विकाससंस्थांचा चेअरमन, उपाध्यक्ष व सचिव व संचालकांचाही सत्कार झाला.
यावेळी श्री. दळवी यांनी, विकास संस्था या स्वायत्त संस्था आहेत. विकास संस्थांनी मानसिकता बदलणे आवश्यक आहे. फक्त पीक कर्जे शेतकऱ्यांना न देता अल्प, मध्यम मुदतीची कर्जे देऊन त्यातून उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे, असे सांगितले. बॅंकेच्या संचालक प्रज्ञा परब यांनी वेंगुर्लेतील अडचणीत सापडलेल्या संस्थांना उभारी देण्यासाठी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दळवी यांनी लक्ष द्यावे, अशी विनंती केली. तर रेडी विकास संस्थेच्या चेअरमन कनयाळकर यांनी संस्थांना कमी प्रमाणात मार्जिन मिळत असल्याने संस्था डबघाईस आल्या आहेत. त्यामुळे मार्जिन वाढवून मिळावे, अशी मागणी केली. देसाई यांनी आभार मानले.
...............
चौकट
खावटी कर्जातून शेतकऱ्यांना दिशा
खावटी कर्जात जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकरी भरडला जात होता. त्यांचे व्याज सातत्याने वाढत होते. शासनाकडून खावटी कर्जमाफी मिळणार नाही, हे लक्षात आल्यावर जिल्हा बँकेने पुढाकार घेऊन विकास संस्था व शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यातून योजना आणल्या. ज्यामध्ये जिल्हा बँकेचा जरी तोटा झाला असला तरी विकास संस्था व शेतकऱ्यांना मार्ग मिळाला. अशा योजनांमुळे जिल्ह्याभारत जे खावटी कर्जाचे २७ कोटी रुपये थकले होते, त्यातील १४ कोटी रुपये आज वसूल झाले आहेत. हे सर्व करताना समाधान एकच आहे की, यात शेतकरी व विकास संस्थांचा कुठेही तोटा जिल्हा बँकेने होऊ दिला नाही. आर्थिक नुकसानीचा भार जिल्हा बँकेने स्वतः पेलला, असे यावेळी दळवी म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81473 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..