
पान एक-आंबोली-गेळेत बंगला फोडला
39052
गेळे ः तुकाराम बंड यांचा बंगला.
39053
गेळे ः चोरट्याने मुख्य दरवाजाची तोडलेली कडी. (छायाचित्र ः अनिल चव्हाण)
आंबोली-गेळेत बंगला फोडला
एक लाख रुपये चोरीस, दीड लाखांची रोकड वाचली
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ ः तालुक्यातील गेळे-डुरेवाडी येथील तुकाराम गोविंद बंड यांच्या बंद बंगल्याचा मुख्य दरवाजा चोरट्याने फोडून कपाटातील तब्बल एक लाखांची रोकड चोरून नेली. हा प्रकार आज उघडकीस आला. या प्रकरणी अंकुश रामचंद्र गवस (वय ६७, रा. गेळे-गावठणवाडी) यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः गेळे मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम विभागात कामाला होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर पत्नी आणि मुलीसह ते येथे राहायला आले. महिनाभरापूर्वी पत्नीच्या उपचारासाठी ते मुंबईत गेले होते. त्यांच्या बंगल्याची किल्ली कित्येक वर्षे अंकुश गवस यांच्याकडे असते. ते देखरेखही करतात. आज ते आंबोली-हिरण्यकेशी येथील त्यांच्या हॉटेलमध्ये असताना सौ. लक्ष्मी गवस यांनी बंड यांच्या बंगल्याचा दरवाजा उघडा असल्याचे सांगितले. यानंतर गवस यांनी बंड यांच्या पत्नीला बंगल्याकडे जाऊन खात्री करा, असे सांगितले. दोघेही तेथे गेल्यानंतर त्यांनी आंबोली पोलिसांना माहिती दिली.
सायंकाळी उशिरा पोलिस उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळुंखे, निरीक्षक शंकर कोरे, सहायक उपनिरीक्षक अमित गोते, हवालदार राजेश नाईक, दीपक शिंदे, संभाजी पाटील आदींनी तेथील पंचनामा केला. समोरील दरवाजा तोडून चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला. बेडरुमच्या दरवाजाची कडी तोडून लोखंडी कपाट फोडल्याचे दिसून आले. बंड यांची पत्नी संध्या यांनी कपाटीतील चोर कप्प्यामध्ये एक लाख रुपये रोख, तर दुसऱ्या चोर कप्प्यात एक लाख ५१ हजार २०० रुपये इतकी रक्कम होती, असे सांगितले. त्यावरून पोलिसांनी खात्री केली असता एका कप्प्यात असलेली एक लाख रुपयाची रोख रक्कम चोरीला गेल्याचे दिसून आले. दुसऱ्या कप्प्यातील दीड लाखांची रक्कम तशीच होती. ओरोस येथील श्वानपथक, ठसेतज्ज्ञांनाही पाचारण केले; मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
.................
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81497 Txt Sindhudurg1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..