
रुग्णास उपचारासाठी नेताना ॲम्बुलन्सचा टायर फुटला
39055
लक्ष्मण सावंत
रुग्णास उपचारासाठी नेताना
रुग्णवाहिकेचा टायर फुटला
माडखोलची घटना; कुणकेरीतील वृद्धाचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ ः जिल्ह्यातील अपुऱ्या आरोग्य यंत्रणेचा फटका बुधवारी एका वृद्धाला बसला. जिल्ह्यात शासकीय कार्डियाक ॲम्बुलन्स उपलब्ध नसल्याने मुंबईहून मागवलेल्या कार्डियाक ॲम्बुलन्सने वृद्धाला सावंतवाडीहून मुंबई येथे नेत असतानाच माडखोल येथे चालत्या रुग्णवाहिकेचा टायर फुटला आणि या घटनेत वृद्धाचा मृत्यू झाला. या घटनेने आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा व्हेंटिलेटरवर असल्याचे सिद्ध झाले.
कुणकेरी येथील ज्येष्ठ कीर्तनकार लक्ष्मण विठ्ठल सावंत (वय ८५ ) यांना अधिक उपचारासाठी मुंबई येथे न्यायचे ठरले. जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेची कार्डियाक ॲम्बुलन्स उपलब्ध नसल्याने सावंत कुटुंबीयांना मुंबईहून ती मागवण्याची वेळ आली. बुधवारी दुपारी या ॲम्बुलन्सने सावंत यांना मुंबई येथे नेत असताना माडखोल येथे एका तीव्र वळणावर रुग्णवाहिका चालकाच्या बाजूचा मागचा टायर फुटला. सुदैवाने टायर फुटूनही गाडी पलटी न होता काही अंतर पुढे जाऊन थांबली आणि कुणालाही दुखापत झाली नाही; मात्र या घटनेत स्टेपनीसह फुटलेला टायर बदलण्यात बराच वेळ गेल्याने वृद्धाचा मृत्यू झाला. याबाबत लक्ष्मण सावंत यांचे नातू केतन सावंत यांना विचारले असता ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्डियाक ॲम्बुलन्स उपलब्ध नसल्याने मुंबई-बोरीवली येथून रुग्णवाहिका मागवली होती. दुपारी तीनच्या सुमारास आंबोली येथे टायर फुटला. यावेळी पर्यायी स्टेफनी ॲम्बुलन्समध्ये उपलब्ध नसल्याने हा प्रकार घडला. त्यामुळे यापुढे तरी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम व्हावी. जेणेकरून अशा प्रकारे अन्य कोणाचाही जीव जाऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81501 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..