नेमळेतील कॅन्सरग्रस्तास हातभार ट्रस्टतर्फे मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेमळेतील कॅन्सरग्रस्तास हातभार ट्रस्टतर्फे मदत
नेमळेतील कॅन्सरग्रस्तास हातभार ट्रस्टतर्फे मदत

नेमळेतील कॅन्सरग्रस्तास हातभार ट्रस्टतर्फे मदत

sakal_logo
By

नेमळेतील कॅन्सरग्रस्तास
हातभार ट्रस्टतर्फे मदत
सावंतवाडीः नेमळे-एरंडोवाडी येथील बाळकृष्ण रामचंद्र धावडे यांना तोंडाच्या कॅन्सर झाल्याने त्यांना कुटुंबियांनी बांबोळी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने पुढील उपचारासाठी मदतीची गरज होती. म्हणून धावडे कुटुंबियांनी हातभार चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग यांच्याकडे मदतीचा हात मागितला असता त्यांच्या हाकेला हातभार चॅरिटेबल ट्रस्ट धावून जात या गरीब कुटुंबियांना दहा हजार रुपये धनादेशाच्या स्वरुपात मदत देऊन त्यांच्या संकट काळात हातभार लावला आहे. यावेळी हातभार चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष शैलेश मयेकर, खजिनदार नयने गावडे, सचिव एकनाथ चव्हाण, जिल्हा सचिव श्यामसुंदर सावंत, जिल्हा संपर्कप्रमुख प्रमोद गावडे, जिल्हा सचिव अस्मिता भराडी, जिल्हा सल्लागार नम्रता आराबेकर, महिला जिल्हा उपाध्यक्ष साक्षी गवस, तालुकाध्यक्ष नेहा काष्टे, तालुका संपर्क प्रमुख सुप्रिया आराबेकर, तालुका खजिनदार सायली देवरुखकर आदी उपस्थित होते. हातभार चॅरिटेबल ही ट्रस्ट कॅन्सरग्रस्त, किडनीग्रस्त गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचे कार्य करत आली आहे. आशा समाजपयोगी कार्यासाठी समाजातील दानशूर दात्यांच्या मदतीची आवश्यकता आहे. ज्यांना या सामाजिक कार्यात आर्थिक मदत करावीशी वाटते, त्यांनी अध्यक्ष मयेकर यांच्याशी संपर्क करावा.
...............

खानोलीतील मुलाचा आकस्मिक मृत्यू
कुडाळः कांजण्या व ताप असल्याने उपचारासाठी कुडाळ येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील खानोली- देऊळवाडी येथील सहावर्षीय प्रणव शंकर केरकर याचे बुधवारी सकाळी निधन झाले. याबाबत कुडाळ पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. प्रणव याला चारपाच दिवसांपूर्वी कांजण्यांचा त्रास सुरू झाला होता. त्यात त्याला तापही आला होता. आज पहाटेच्या सुमारास त्याचा त्रास वाढला. श्वास कोंडल्यासारखा होऊ लागला. नातेवाईकांनी त्याला कुडाळ येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र उपचारा दरम्यान सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्याचे निधन झाले. याबाबतची खबर त्याचे वडील शंकर सुरेश केरकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली.
------------------
दिगवळेतील वस्तीत गव्यांचा कळप
कणकवलीः दिगवळेतील गावडेवाडी, रांजणगाव या वस्तीत गवारेड्यांच्या कळपाने प्रवेश केल्याने शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दाजीपूर अभयारण्याच्या राखीव क्षेत्रातून येऊन हे गवारेडे कोकणातील भातशेतीचे नुकसान करू लागले आहेत. वन विभागाने गवारेड्यांच्या कळपांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे. दिगवळे गावची सीमा ही दाजीपूर अभयारण्याला लागून आहे. गतवर्षी रांजणगाव येथे डोंगराचा कडा कोसळण्याची घटना 22 जुलैच्या पहाटे घडली होती. त्यानंतर जंगलमय भागातून रानटी जनावरे या मातीच्या कोसळलेल्या भागातून वस्तीत येत आहेत. यापूर्वी रानगायी शेतात येत होत्या. अलिकडे पावसाळा सुरू झाल्यानंतर भातशेती खाण्यासाठी गवारेड्यांचा कळप वस्तीच्या दिशेने प्रवेश करत आहे.
--------------------
संरक्षक भित उभारण्याची मागणी
सावंतवाडीः शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावरील मोती तलावाचा संरक्षक कठडा कोसळल्याने वाहतुकीस धोका निर्माण आहे. त्यामुळे या मार्गावर अवजड वाहतूक त्वरित बंद करावी, या मागणीसाठी माजी उपनगराध्यक्ष राजू बेग व भाजपचे शहर उपाध्यक्ष दिलीप भालेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांची भेट घेऊन लक्ष वेधले. मोती तलावाचा गाळ काढल्यानंतर पावसाळ्यात शहरातून जाणार्‍या मुंबई-गोवा महामार्गावरील तीनमुशीजवळ दोन ठिकाणी तलावाचे संरक्षक कठडे कोसळले आहेत. या मार्गावरून वाहनांची मोठी वर्दळ आहे. अवजड वाहनांमुळे कोसळलेल्या कठड्याच्या बाजूचा रस्ता खचत आहे. शिवाय कठड्यांची मातीही कोसळत असल्याने रस्ता खचण्याची शक्यता आहे. सध्या मुसळधार पाऊस कोसळत असल्याने रस्ता खचून अपघात घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरून होणारी अवजड वाहनांची वाहतूक तात्काळ बंद करावी. लवकरात लवकर संरक्षक भिंत उभारण्यात यावी, अशी मागणी बेग व भालेकर यांनी केली आहे.
------------------
कणकवलीत रेनकोटचे वाटप
कणकवलीः भाजप हळवलच्या माध्यमातून गावातील तिन्ही शाळांतील मुलांना मोफत रेनकोट वाटप करण्यात आले. माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री, भाजप तालुका उपाध्यक्ष शशिकांत राणे, जिल्हा परिषद प्रभारी लक्ष्मण गावडे, पुजारे, समर्थ राणे, सुदर्शन राणे, लक्ष्मण राणे, प्रभाकर राणे, प्रथमेश राणे आदी उपस्थित होते.
-------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81582 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..