
लांजा-घनकचरा प्रकल्पासाठी मिळेना जागा
लांजा नगरपंचायत---लोगो
....
घनकचरा प्रकल्पासाठी मिळेना जागा
नागरिकांचा विरोधामुळे अडचण; नगराध्यक्षांचे सहकार्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २८ ः लांजा शहरातील घनकचरा प्रकल्पाचा विषय दिवसेंदिवस जटिल होत आहे. कचरा टाकण्यासाठी भाडेतत्त्वावर जागा मिळत नाही. शहरातील कचरा कुठे टाकावा, असा गंभीर प्रश्न नगरपंचायतीसमोर निर्माण झाला आहे. घनकचरा प्रकल्प झाला तरच कचऱ्याची विल्हेवाट लावणे शक्य आहे. हा प्रकल्प होण्यासाठी जनतेच्या सहकार्याची गरज आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष मनोहर बाईत यांनी केले आहे.
लांजा नगरपंचायतीमार्फत शहरातील धुदंरेवाडी नंतर कोत्रेवाडी येथे प्रस्तावित घनकचरा प्रकल्प उभारण्यात येणार होता; मात्र प्रकल्पाला मंजुरी आधीच स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे थांबवण्यात आली. नंतरच्या काळात नगरपंचायतीमार्फत धुंदरे या ठिकाणी जागा भाडेतत्त्वावर घेण्यात आली होती. त्या ठिकाणी सर्वच प्रभागातील कचरा गोळा करून टाकला जात होता; मात्र तेही नागरिकांच्या विरोधानंतर कचरा टाकणे बंद करण्यात आला. या प्रकल्पाला दोनही ठिकाणच्या प्रखर विरोधानंतर व अगदी न्यायालयीन लढाईपर्यंत विषय गेल्याने कचराप्रश्न जटील झाला आहे.
नगरपंचायत हद्दीतील रोजचा सुमारे ५ टन इतका ओला व सुका कचरा असतो. त्यामुळे साठलेल्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची? असा प्रश्न नगरपंचायतीसमोर उभा राहिला आहे. या संदर्भात नगराध्यक्ष मनोहर बाईत यांनी विशेष सभेमध्ये सर्व नगरसेवकांना प्रभागामधील जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे; मात्र कोणतीही जागा आजतागायत उपलब्ध केलेली नाही. कचरा टाकण्यासाठी भाडेतत्त्वावर उपलब्ध करण्यात येणारी जागेसाठी जागामालक तयार होतात आणि नंतर नाही सांगतात, याला कारणीभूत कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.
...
चौकट
भाडेतत्त्वावर जागा द्या..
सद्यःस्थितीत कचराप्रश्नावर मार्ग म्हणून नगराध्यक्ष बाईत यांनी तात्पुरता उपाय म्हणून शहरातील गोंडेसखळस्थित स्वतःच्या मालकीच्या २५ गुंठे जागेत सध्या कचरा टाकला जात आहे. याबाबतीत बाईत यांनी नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच सामाजिक दायित्व म्हणून शहरातील विकासाचा विचार करता भाडेतत्त्वावर जागा उपलब्ध करून देण्याचेही आवाहन केले आहे. जागा उपलब्ध करून दिल्यानंतर शासकीय नियमांची योग्यरित्या अंमलबजावणी करून कचरा व्यवस्थापन नागरिकांच्या आरोग्य सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
--------
चौकट
..तर प्रदूषणाची समस्या
लांजा नगरपंचायत ही कोकणातील सर्वात जास्त क्षेत्र असणारी नगरपंचायत असून ते ३५.१३ चौ. किमी इतके क्षेत्र आहे. त्यानुसार घनकचरा प्रकल्पासाठी जागा मिळत नसेल तर ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. दरम्यान, कचराप्रश्न लवकरात लवकर मार्गी लागणे गरजेचे आहे अन्यथा येत्या काळात कचऱ्याची विल्हेवाट योग्यरित्या नाही लागली तर प्रदुषणाची समस्या निर्माण होऊन नागरिकांचे आरोग्य ऐरणीवर येईल, यात शंका नाही.
----------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81738 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..