
पाडलोसमध्ये दूध व्यावसायिक जखमी
swt2816.jpg
39175
पाडलोसः अपघातग्रस्त दुचाकी चरातून बाहेर काढताना.
पाडलोसमध्ये दूध व्यावसायिक जखमी
दुचाकी घसरली ः रस्ता काम प्रलंबित, ग्रामस्थ आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २८ः न्हावेली-पाडलोस मार्गे रोणापाल जुन्या रस्त्यावर सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पाडलोस-सातीवनमळी येथील दूध व्यावसायिक बाळा नाईक यांची दुचाकी तीन फुटी खोल चरात घसरून अपघात झाला. सुदैवाने त्यांना किरकोळ दुखापत झाली. ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत श्री. नाईक यांना खाजगी दवाखान्यात हलवले. अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या रस्त्याचे काम अद्याप सुरू न झाल्यामुळेच अपघात झाल्याचे सांगत ग्रामस्थ आक्रमक बनले. तसेच लोकप्रतिनिधींनी दिलेले आश्वासन पाळावे अन्यथा आम्ही स्वातंत्र्यदिनी रस्त्यासाठी उपोषण छेडणार असल्याचा इशारा उपस्थित ग्रामस्थांनी दिला.
मुसळधार पावसामुळे न्हावेली-पाडलोस मार्गे रोणापाल रस्त्यावर तीन फुटी खोल चर पडला. हा दीड किलोमीटर रस्ता खडीकरण व डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असून अद्यापही याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले. दरम्यान, पाडलोस येथून दूध व्यावसायिक बाळा नाईक आपल्या घरी जात होते. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात रस्त्याचा काही भाग वाहून गेला असून अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने वाहनचालकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. अनेक वेळा प्रशासनाचे लक्ष वेधूनही रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाकडे पूर्णपणे डोळेझाक होत असल्याचा आरोप उपस्थित ग्रामस्थांनी केला. आज झालेल्या अपघातास पूर्णपणे प्रशासनच जबाबदार असून याकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. पाडलोस तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष महेश कुबल, आरोस सोसायटी संचालक बाबल परब, पाडलोस सिंधू दुग्ध संस्था चेअरमन अर्जुन कुबल तसेच गोकुळदास परब, संजय कळंगुटकर आदी शेतकरी ग्रामस्थांनी धाव घेत दुचाकीही चरातून वर काढली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81785 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..