
कणकवली :एसटीचे चाक
बेजबाबदारपणामुळे एसटीचे चाक खड्यात
मोहन केळुसकर ः कोकणातील आमदारांनी महामार्ग पुर्ततेसाठी संघटित प्रयत्न करावेत
कणकवली, ता. २९ ः एसटी महामंडळ हे आशियातील सर्वांत मोठे परिवहन महामंडळ म्हणून गणले जाते; मात्र कोरोना संकट, एसटी कर्मचाऱ्यांच्या शासनामध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपामुळे आणि माजी परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांच्या ढिसाळ, आडमुठ्या, बेजबाबदार कारभारामुळे हे महामंडळ आर्थिक गोत्यात सापडले आहे. आता तर प्रवासी संख्येत ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याने महामंडळाचा डोलारा सांभाळणे कठीण झाले आहे. परिणामी कोकणातील गणेशोत्सवातील जादा प्रवासी वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. विद्यमान सरकारसह कोकणातील सर्वपक्षिय आमदारांनी महामार्ग पूर्ततेसाठी तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे, अशी रोखठोक भूमिका कोकण विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी व्यक्त केली.
गणेशोत्सवातील भाविक प्रवासी वर्गाच्या समस्यांबाबत कोकण विकास आघाडीची (कोविआ) बैठक मुंबई - दादर येथील मुख्य कार्यालयात झाली. त्यावेळी केळुसकर बोलत होते. यावेळी सरचिटणीस सूर्यकांत पावसकर, उपाध्यक्ष बळीराम परब, रमाकांत जाधव, प्रकाश तावडे, मनोहर डोंगरे, नरेंद्र म्हात्रे, चंद्रकांत आंब्रे आदी उपस्थित होते.
श्री. केळूसकर म्हणाले, राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी प्रवासी सेवेतील त्रूटी जाणून उपाययोजना करण्यासाठी प्रदेशनिहाय बैठका घेतल्या. त्यात त्यांनी कोरोना पुर्व काळात पावसाळी हंगामात रोज ६६ लाख प्रवाशांची संख्या आता २७ लाखांपर्यंत खाली आल्याचे स्पष्ट केले आहे. परिवहन खात्याच्या बाबतीत अपरिचित असलेल्या माजी परिवहन मंत्र्यांना एसटीच्या कारभाराची नस पायउतार होईपर्यंत समजली नाही. एसटी कर्मचाऱ्यांचा संप व्यवस्थित हाताळता आला नाही. मविआच्या घटक पक्षांनी जाणिवपूर्वक या संपाकडे दुर्लक्ष केले. परिणामी ६ महिने लांबलेल्या या संपामुळे एसटीचा डोलारा कोसळला आहे. एसटीला सद्या गाड्याच्या सुट्या भागाची कमतरता जाणवत आहे. टायर उपलब्ध नसल्याने गाड्या आगारात उभ्या रहात आहेत. रस्त्यावर गाड्या नादुरूस्त होत असल्याने प्रवासी आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर जीवघेण्या अपघाताचे प्रमाणही वाढले आहे, असे सांगून श्री. केळुसकर म्हणाले, एसटीचा संप लांबल्याने नियमित प्रवाशांनी पर्यायी व्यवस्था शोधली आहे. दुचाकी आणि चार चाकी गाड्या खरेदी केल्यात. सहा आसनी रिक्षा दुप्पट क्षमतेने प्रवासी वाहतूक करीत आहेत. परिणामी एसटीच्या प्रवासी संख्येत निम्म्यापेक्षा अधिक घट झाली आहे.
---
आता योग्य परिवहनमंत्री हवा
श्री केळुसकर म्हणाले की, यंदाच्या गणेशोत्सवात भारतीय आणि कोकण रेल्वेने मुबलक प्रमाणात विशेष जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. एसटीनेही जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे; मात्र एसटीची विद्यमान परिस्थिती पहाता या गाड्यांचे योग्य नियोजन होण्याची शक्यता धूसर आहे. आता नव्याने सत्तेवर आलेल्या सरकारने परिवहन मंत्री म्हणून योग्य ज्ञान असलेल्या आमदाराची नियुक्ती करणे गरजेचे आहे.
--
महामार्ग पूर्ततेसाठी प्रयत्न करावेत
यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईकर चाकरमानी मोठ्या संख्येने स्वत:च्या अथवा खासगी गाड्यांनी गावी जाण्याचे नियोजन करीत आहेत. मुंबई गोवा कोकण महामार्गाची अनेक ठिकाणी दुरवस्था आहे. परशुराम घाट धोक्याचा झाला आहे. या परिस्थितीत चाकरमानी पुणे, कोल्हापूर मार्गे कोकणात जाईल. गणेशोत्सवाला महिना उरला आहे. आता कोकणातील सर्वपक्षिय लोकप्रतिनिधींनी संघटित होऊन या रखडलेल्या महामार्गाच्या कामाच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करायला हवेत. अन्यथा या चाकरमान्यांच्या रोषाला बळी पडावे लागेल, असे केळुसकर म्हणाले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81959 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..