दोन रेल्वेगाड्यांना अखेर झाराप, मडुरेत मिळाला थांबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन रेल्वेगाड्यांना अखेर झाराप, मडुरेत मिळाला थांबा
दोन रेल्वेगाड्यांना अखेर झाराप, मडुरेत मिळाला थांबा

दोन रेल्वेगाड्यांना अखेर झाराप, मडुरेत मिळाला थांबा

sakal_logo
By

दोन रेल्वेगाड्यांना अखेर
झाराप, मडुरेत मिळाला थांबा
कणकवली ः गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वे मार्गावर अनेक प्रवासी रेल्वेगाड्या सोडण्याची घोषणा करण्यात आली आहे. दोन रेल्वेगाड्यांना आता प्रत्येकी एक जादा थांबा देण्यात आला आहे. दोन्ही थांबे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानकांवर असणार आहेत. सीएसएमटी-सावंतवाडी-सीएसएमटी डेली स्पेशल रेल्वेला झाराप थांबा देण्यात आला आहे. सीएसएमटी-सावंतवाडी (०११३७ ) दुपारी १२.०३ वाजता, तर सावंतवाडी-सीएसएमटी (०११३८) दुपारी २.५० वाजता झाराप येथे पोहोचणार आहे. या दोन्ही गाड्या १३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या काळात धावणार आहेत. सीएसएमटी-सावंतवाडी रात्री १२.२० वाजता सीएसएमटी येथून सुटणार आहे. सावंतवाडी-सीएसएमटी ही दुपारी १२.२० वाजता सावंतवाड़ी येथून सुटणार आहे. पुणे - थिविम-पनवेल साप्ताहिक स्पेशल गाडीला मडुरे थांबा देण्यात आला आहे. त्यानुसार पुणे-थिविम (०११४५) शनिवारी सकाळी ८.२४ वाजता, तर थिविम-पनवेल (०११४४) शनिवारी दुपारी ३ वाजता मडुरे येथे पोहोचणार आहे. पुणे - थिविम ही गाडी १२ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत दर शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता पुणे येथून सुटणार आहे. थिविम-पनवेल ही १३ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत दर शनिवारी दुपारी २.४० वाजता थिवी येथून सुटणार आहे.
---
मणेरीत मोटारीला अपघात
दोडामार्ग ः मणेरी-कलमठाणा येथे कारला अपघात होऊन ती पलटी झाली. सुदैवाने चालक समीर परब व त्यांची पत्नी या अपघातातून सुखरुप बचावल्या. या अपघातात गाडीचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना बुधवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास घडली. साळ-गोवा येथील समीर परब व त्यांच्या पत्नी सासोली-हेदूस येथील त्यांच्या नातेवाईकांकडे गेल्या होत्या. बुधवारी दुपारी ते आपल्या मोटारीतून घरी परतत होत्या. दरम्यान पावणे चारच्या सुमारास त्यांची गाडी कलमठाणा येथे आली असता अचानक गाडीच्या स्टेअरिंगचा नट निखळला व त्यामुळे स्टेअरिंग मोकळे झाले. हा प्रसंग चालक समीर परब यांच्या लक्षात येताच गाडी थांबविण्यासाठी त्यांनी ब्रेक लावला; मात्र गाडी रस्ता सोडून लगतच्या माळरानात घुसली व उलटली. अपघाताची वार्ता समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. गाडीतील समीर परब व त्यांच्या पत्नी या अपघातातून सुदैवाने बचावल्या.
---
गव्यांकडून शेतीचे नुकसान
सावंतवाडी ः सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात सध्या गव्यांचे वास्तव्य वाढले आहे. सावंतवाडी पट्ट्यात गव्यांनी दहशत निर्माण केली आहे. गव्यांना वनखात्याने आवर घालावा. अन्यथा आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. कलंबिस्त पंचक्रोशीत गवारेडे वास्तव्यास आले आहेत. दिवसाढवळ्याही शेतीत घुसून दहशत माजवत आहेत. या दहशतीमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. कलंबिस्त-धामणमळा भागात गवारेडे शेतकर्‍यांची भातपिके उद्धवस्त करत आहेत. एकतर अतिवृष्टीमुळे भातपीक धोक्यात आले आहे. माजी सरपंच बाळू सावंत यांनी वनखात्याने या गवारेड्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.
-------------------
कुशेवाड्यात उपकरणे जळाली
परुळे ः उच्चदाबाच्या विजेने कुशेवाडा-मांजार्डेवाडी येथील पस्तीसहून अधिक ग्रामस्थांची उपकरणे जळाली. परिसरातील ग्रामस्थांच्या घरातील विद्युत उपकरणे जळाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उच्च वीज दाबामुळे बुधवारी सायंकाळी साडेसहाला परुळे-कुशेवाडा-मांजार्डेवाडी भागात बऱ्याच घरातील सेटटॉप बॉक्स, टीव्ही, फ्रीज, इनव्हर्टर, इंटरनेट मोडेम जळाले. तसेच बल्ब, ट्यूबलाईटही फुटल्या. नुकसानीची दखल घेऊन महावितरणने तातडीने ग्राहकांना भरपाई देण्याची मागणी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81996 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..