पान दोन मेनसाठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान दोन मेनसाठी
पान दोन मेनसाठी

पान दोन मेनसाठी

sakal_logo
By

39442
देवगड पंचायत समिती

देवगडात अनेकांची दांडी गुल

आरक्षणाचा तालुक्यावर परिणाम; पंचायत समितीसाठी लढती

संतोष कुळकर्णी ः सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २९ ः तालुक्यातील पुर्नरचित झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदार संघासाठीच्या आगामी निवडणूकीच्या अनुषंगाने आरक्षण सोडत निघाली. आरक्षणाकडे डोळे लावून बसलेल्या अनेकजणांच्या दृष्टीने निराशाजनक आरक्षण ठरले. आरक्षणाने इच्छुकांची दांडी गुल झाली तर काहींना पुर्नंसंधी राहिली.
येथील देवगड जामसंडे नगरपंचायत स्थापनेपूर्वी तालुक्यात देवगड जिल्हा परिषद आणि त्यामध्ये देवगड आणि जामसंडे असे दोन पंचायत समिती मतदारसंघ होते. मात्र, २०१६ मध्ये नगरपंचायतीची स्थापना झाल्याने मतदारसंघ गोठवला गेला. त्यामुळे मागील पाच वर्षात ७ जिल्हा परिषद मतदारसंघ (पुरळ, पडेल, बापर्डे, पोंभुर्ले, शिरगांव, किंजवडे, कुणकेश्‍वर) आणि १४ पंचायत समिती मतदारसंघ (मुणगे, बापर्डे, फणसगांव, नाडण, पडेल, पुरळ, मणचे, पोंभुर्ले, शिरगांव, तळवडे, किंजवडे, कोटकामते, तिर्लोट, कुणकेश्‍वर) कार्यरत होते. आता पुन्हा यामध्ये विभागणी होऊन आठ जिल्हा परिषद मतदारसंघ (विजयदुर्ग, पडेल, पोंभुर्ले, शिरगांव, नाडण, कुणकेश्‍वर, किंजवडे, मिठबांव) आणि १६ पंचायत समिती मतदारसंघ (विजयदुर्ग, पुरळ, पडेल, बापर्डे, पोंभुर्ले, गोवळ, महाळुंगे, शिरगांव, नाडण, मोंड, दाभोळे, कुणकेश्‍वर, किंजवडे, कुवळे, मिठबांव, मुणगे) निश्‍चित करण्यात आले आहेत. मतदारसंघ लहान झाल्याने नव्या सदस्यांना सोयीचे होणार आहे. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणनिहाय समाविष्ट ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा परिषद गट विजयदुर्ग -पंचायत समिती गण -विजयदुर्ग -गिर्ये (बांदेगाव), रामेश्‍वर, विजयदुर्ग, पंचायत समिती गण पुरळ - पुरळ (कळंबई, हुर्शी), ठाकूरवाडी, तिर्लोट (मोहूळगाव), जिल्हा परिषद गट पडेल -पंचायत समिती गण -पडेल -वाघोटण, सौंदाळे (वाडा केरपाई), पडेल, पंचायत समिती गण बापर्डे -मुटाट, पाळेकरवाडी, बापर्डे (जुवेश्‍वर), जिल्हा परिषद गट पोंभुर्ले -पंचायत समिती गण -पोंभुर्ले -मणचे, पाटगांव, पोंभुर्ले (मालपेवाडी), पेंढरी, पंचायत समिती गण -गोवळ -फणसगांव, गोवळ (सोमलेवाडी), धालवली, कोर्ले, कुणकवण, उंडील, जिल्हा परिषद गट शिरगांव -पंचायत समिती गण महाळुंगे -विठ्ठलादेवी, महाळुंगे, गढीताम्हणे, रहाटेश्‍वर, नाद, शिरवली, वाघिवरे (वेळगिवे), बुरंबावडे, गवाणे, पंचायत समिती गण शिरगांव -वळीवंडे, शिरगांव (निमतवाडी, शेवरे, धोपटेवाडी), हडपीड, ओंबळ, जिल्हा परिषद गट नाडण -पंचायत समिती गण नाडण -पडवणे, वाडा (वाडातर), फणसे, नाडण (वीरवाडी), मळेगाव, पंचायत समिती गण मोंड -मोंड (चिंचवाड), मोंडपार, वानिवडे, पावणाई, टेंबवली (कालवी), जिल्हा परिषद गट कुणकेश्‍वर -पंचायत समिती गण दाभोळे -लिंगडाळ, कट्टा, दाभोळे, कोटकामते, पाटथर, पंचायत समिती गण कुणकेश्‍वर -इळये, कुणकेश्‍वर (कातवणेश्‍वर), मिठमुंबरी, दहिबांव (बागमळा), जिल्हा परिषद गट किंजवडे -पंचायत समिती गण किंजवडे -चांदोशी, वरेरी, किंजवडे, तळवडे (तळेबाजार, बागतळवडे), पंचायत समिती गण कुवळे -आरे, तोरसोळे, कुवळे (रेंबवली), चाफेड, सांडवे, साळशी, जिल्हा परिषद गट मिठबांव -पंचायत समिती गण मिठबांव -मिठबांव, तांबळडेग, कातवण, हिंदळे (मोर्वे), पंचायत समिती गण मुणगे -मुणगे (आडबंदर), खुडी, नारिंग्रे, पोयरे आदी गावांचा समावेश आहे. नव्या मतदारसंघाच्या रचनेमुळे राजकीय पक्षांचा पारंपारिक पगडा काहीसा विभागला जाणार आहे. त्यामुळे राजकीय नेतेमंडळींना नव्याने मोर्चेबांधणी करावी लागणार आहे. इच्छुकांना आतापासूनच चाचपणीला सुरूवात करावी लागेल. राजकीय पक्षांनाही उमेदवारी देताना मतदारसंघाचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा लागणार असल्याने सर्वच बाबतीत कसोटी लागणार आहे. तालुक्यात एक जिल्हा परिषद आणि दोन पंचायत समिती मतदारसंघ वाढल्याने तीन नवीन इच्छुकांना संधी मिळेल. मतदारसंघ पुर्नरचनेमुळे राजकीय पक्षांचे पारंपारिक बालेकिल्ले विभागले गेले. यामुळे सर्वच राजकीय पक्षांना मतदारसंघाची आता नव्याने बांधणी करावी लागणार आहे. यासाठी मतदारसंघाचा नव्याने अभ्यास करण्याची आवश्यकता भासेल. नव्याने झालेल्या रचनेमुळे मतदारसंघाची नावेही बदलली आहेत. शिवाय पारंपारिक मतदारसंघ बदलल्याने राजकीय संदर्भही बदलणार असल्याने राजकीय पक्षांच्या दृष्टीनेही आता अधिक लक्ष केंद्रीत करावे लागेल. त्यातच आता आरक्षणाने इच्छुकांच्या मनसुब्यांना सुरूंग लावला आहे. माजी सभापती सुनील पारकर यांचा मुणगे मतदारसंघ अनारक्षित राहिला. माजी सभापती सदाशिव ओगले यांचा सध्या कोटकामते मतदारसंघ आहे. मात्र किंजवडे मतदारसंघ खुला असल्याने त्यांना पुन्हा संधी आहे. माजी उपसभापती रवींद्र तिर्लोटकर, माजी उपसभापती अमोल तेली यांची आरक्षणामुळे संधी हुकणार आहे. पडेल आणि मिठबांव जिल्हा परिषद गट सर्वसाधारण असल्याने याठिकाणी इच्छुकांची संख्या वाढेल. तर शिरगाव मतदारसंघातील आरक्षणाबाबत इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
.................
चौकट
इच्छुकांचा हिरमोड
आरक्षणामुळे आधीपासून मोर्चेबांधणी करून तयारीत असलेल्या इच्छुकांना दणका बसला. पन्नास टक्के महिला आरक्षणामुळे आधीच राजकीय हवा गेलेली असताना आता आरक्षणाने इच्छुकांचा उर्वरित उत्साह मावळला आहे. एकदा संधी गेल्यास पुन्हा पाच वर्षे वाट पहात बसावे लागते. पाच वर्षात राजकीय संदर्भ बदलतात, इच्छुकांचे वय वाढत जाते, उमेदवारीसाठी ताटकळत बसावे लागते, इच्छुकांची संख्या वाढते आदी अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
-----

39443
वैभववाडी पंचायत समिती


उमेदवारीसाठी रस्सीखेच शक्य

वैभववाडीत आतापासूनच दावेदारी; तीन मतदारसंघ खुले

एकनाथ पवार ः सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २८ ः तालुक्यातील तीन जिल्हा परिषद आणि सहा पंचायत समिती मतदारसंघापैकी एक जिल्हा परिषद आणि दोन पंचायत समिती मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी असल्यामुळे या तीन मतदारसंघात पक्षातर्गंत उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार रस्सीखेच निर्माण होणार आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यमान सदस्य आणि इच्छुकांनी आतापासूनच मतदारसंघावर दावेदारी सांगण्यास सुरूवात केली आहे.
तालुक्यात तीन जिल्हा परिषद आणि सहा पंचायत समिती मतदारसंघ आहे. तीन जिल्हा परिषद मतदारसंघापैकी कोकिसरे जिल्हा परिषद हा मतदारसंघ सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाला आहे तर उर्वरित लोरे आणि कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे आता खुल्या प्रवर्गातील विद्यमान सदस्य आणि इच्छुकांची कोकिसरे मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. या मतदारसंघाचे नेतृत्व सध्या भाजपाचे सुधीर नकाशे करीत आहेत. त्यामुळे ते प्रबळ दावेदार आहेत. परंतु, त्याचबरोबर भाजपाकडून माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी सभापती अरविंद रावराणे, दिगंबर मांजरेकर, बाप्पी मांजरेकर हे दावेदार मानले जात आहेत. हे सर्वच इच्छुक तगडे असल्यामुळे या मतदारसंघात पक्षश्रेष्ठीची कसोटी लागणार आहे. शिवसेनेकडून गेल्या काही दिवसांपासून पक्षात सक्रीय झालेले संदीप सरवणकर, बँकेचे माजी संचालक दिगंबर पाटील, रोहीत रावराणे, प्रसाद नारकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात उमेदवार निवडताना शिवसेनेची देखील डोकेदुखी वाढणार आहे. लोरे जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपाकडून माजी सभापती वैशाली रावराणे, माजी सभापती शुभांगी पवार यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. याशिवाय एखाद्या नवीन उमेदवाराचे नाव पुढे येऊ शकते. शिवसेनेकडून या मतदारसंघात विद्यमान जिल्हा परिषद सदस्य पल्लवी झिमाळ, नलिनी पाटील किंवा नवख्या उमेदवाराला देखील संधी मिळू शकते. कोळपे जिल्हा परिषद मतदार देखील सर्वसाधारण महिलांसाठी खुला आहे. या मतदारसंघातून सीमा नानीवडे, माजी सभापती सुवर्णा संसारे, दुर्वा खानविलकर, हर्षदा हरयाण यांच्यापैकी एकीला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे तर शिवसेनेकडून वनिता खाडे यांचा नावाचा विचार होऊ शकतो. भुईबावडा पंचायत समिती मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी असल्यामुळे माजी उपसभापती भालचंद्र साठे हे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. याशिवाय स्वप्निल खानविलकर, राजेंद्र राणे, महेश संसारे यांच्यापैकी कुणालाही संधी मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून माजी सभापती दिपक पांचाळ, सुरेंद्र पांचाळ यांचा विचार होऊ शकतो. परंतु, या मतदारसंघात एखादा नवीन चेहरा शिवसेना उतरविण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खांबाळे पंचायत समिती मतदारसंघ हा देखील सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला आहे. भाजपाकडून या मतदारसंघात सांगुळवाडीचे माजी सरपंच प्रकाश पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता आहे तर शिवसेनेकडून विद्यमान सदस्य मंगेश लोके हेच प्रमुख दावेदार असू शकतात. याशिवाय संभाजी रावराणे यांना देखील संधी मिळु शकते. तिथवली पंचायत समिती मतदारसंघ हा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे. या मतदारसंघातून माजी सभापती बाळा हरयाण यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय महेश संसारे यांना देखील संधी मिळू शकते. शिवसेनेकडे या प्रभागात बाबा खाड्ये यांच्या व्यतिरिक्त हमखास चेहरा नाही.
----
उंबर्डेत भाजपकडून नवा चेहरा?
उंबर्डे प्रभागही सर्वसाधारण (महिला) आहे. या मतदारसंघात भाजपकडून एखाद्या नवीन चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना देखील नवीन चेहरा निवडणुक रिंगणात उतरविण्याची तयारी करीत आहे. कोकिसरे प्रभागातून सभापती अक्षता डाफळे यांना पुन्हा संधी मिळु शकते. शिवसेना एखाद्या नवख्या चेहऱ्याला संधी देऊ शकते. लोरे हा प्रभाग देखील सर्वसाधारण महिलांसाठी आहे. या प्रभागातून वैशाली रावराणे यांना संधी मिळु शकते. आरक्षित प्रभागांमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी तितकीशी चुरस असणार नाही. मात्र, खुल्या तीन मतदारसंघात उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच असणार आहे. पक्षांतर्गंत उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांना जोरदार मोर्चेबांधणी करावी लागणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82103 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top