
रत्नागिरी नोकरीच्या आमिषाने महिलाना 5 लाखाला गंडा
नोकरीच्या आमिषाने महिलाना ५ लाखांचा गंडा
खेड येथील प्रकार ; १६२ महिलांची फसवणूक झाल्याचा अंदाज, दोघे ताब्यात
खेड, ता. २९ : शासनाच्या ई-गव्हर्नन्स योजनेअंतर्गत तालुकास्तरावर डाटा ऑपरेटर तसेच तालुका समन्वयक म्हणून नोकरीला लावतो, असे सांगून अनेक महिलांकडून प्रत्येकी तीन हजार रुपये घेऊन सुमारे ५ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. खेड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा तिघाजणाविरोधात दाखल झाला आहे. याप्रकरणी दोघाजणांना ताब्यात घेतले आहे.
खेड पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांनी रत्नागिरी जिल्ह्यात अनेक महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर येत आहे. संजय पाटील, धनंजय घोले अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. दोघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुरुवारी नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर संजीवनी संजय शेलार ( वय ४२, रा. समर्थनगर, भरणे ) यांनी तक्रार दिली. त्यानुसार १६२ महिलांची सुमारे ५ लाखांची फसवणूक झाल्याचे म्हटले आहे.
शासनाच्या ई-गव्हर्नन्स विभागाचा महाराष्ट्र हेड असल्याचे सांगून जिल्ह्यातील गरीब व गरजू महिलांकडून संजय पाटील या व्यक्तीने कौशल्य विकास नावाच्या एका खासगी संस्थेच्या माध्यमातून दहा हजार रुपये प्रशिक्षणाच्या नावाखाली मागितले. त्यानंतर तालुकास्तरावर आपली डेटा ऑपरेटर म्हणून नियुक्ती केली जाईल असे आश्वासन देखील दिले.
एप्रिल महिन्यात खेडमधील २९ तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून सुमारे १६२ महिलांकडून प्रत्येकी ३००० या प्रमाणे कौशल्य विकास संस्थेच्या बँक खात्यात पैसे भरून घेतले. तसेच तालुकास्तरावर आपण लवकरच प्रशिक्षण घेऊन नियुक्त्या केल्या जातील, असे आश्वासन देखील संजय पाटील याने सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्ष त्यांच्यासोबत काम करणाऱ्या जिल्ह्यातील महिलांच्या माध्यमातून सर्वांना सांगितले.
तीन महिने झाले तरी कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण दिले जात नाही. तसेच डाटा ऑपरेटर म्हणून नियुक्तीपत्र देखील दिले गेले नाही. म्हणून काही महिलांनी यासंदर्भात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. खेडमध्ये फसवणूक झालेल्या एका महिलेने खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संजय पाटील, धनंजय घोले याच्यावर खेड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलिसांचे एक पथक पाठवून कणकवली येथून संजय पाटील आणि धनंजय घोले यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी खेडच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव करीत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82164 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..