पावसाची अनियमितता पिकाला मारक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाची अनियमितता पिकाला मारक
पावसाची अनियमितता पिकाला मारक

पावसाची अनियमितता पिकाला मारक

sakal_logo
By

04962
भातशेतीचे संग्रहित छायाचित्र.


पावसाची अनियमितता पिकाला मारक

शेतकऱ्यांमध्ये चिंता; भात शेतीवर करपा रोगाच्या प्रादुर्भावाची भीती

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३० ः अनियमित पाऊस, भात बियाण्याच्या उगवण क्षमतेमधील काहीशी कमतरता यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या दृष्टीने अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. पाऊस नसल्याने कातळावरील भात शेतीवर करपा रोगाच्या प्रार्दुभावाची चाहूल दिसू लागली आहे. भात रोपांची लावणी लावून बराच कालावधी उलटला, तरीही अपेक्षित प्रमाणात भातशेतीमध्ये वाढ झाली नसल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. सध्या पावसाने पूर्णपणे पाठ फिरविली असल्याने भातशेतीला सध्याचे हवामान मारक ठरण्याची लक्षणे आहेत.
कोकणातील शेतकऱ्यांचा भातशेती हा पूर्वापार व्यवसाय आहे. मिरगापासून भरपूर पाऊस ही भातशेतीच्या दृष्टीने जमेची बाब होती. केवळ भातशेतीच नाही, तर नाचणी, कुळीथ यासह विविध कडधान्ये पिकवण्याकडे शेतकऱ्यांचे विशेष लक्ष असे. वर्षाकाठी लागणारे भात पिकवण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी कायमच खटाटोप करीत आला आहे. भातशेतीच्या जोडीला भाजीपाला उत्पादन घेतले जात होते. यथावकाश शेतीला पूरक म्हणून बागायती निर्माण होऊ लागल्या. तरीही ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे आजही शेती करताना दिसतात. अलीकडे शेतीला आधुनिकतेची जोड मिळाली आहे. त्यामुळे जलद शेती करण्याकडे कल असतो. कमी मनुष्यबळात शेतीची कामे करण्याची सोय झाली. याबरोबरच पारंपरिक बियाण्यांची जागा आधुनिक बियाण्यांनी घेतली. त्यामुळे भरपूर भात उत्पादन घेण्याकडे कल वाढला. विविध शेती स्पर्धांमध्ये शेतकरी सहभागी होऊ लागला. भात विक्री करून अपेक्षित नफाही कमवू लागला; मात्र अलीकडे ग्लोबल वॉर्मिंगचे पडसाद भातशेतीला जाणवू लागले आहेत. हवामान बदलाचा फटका एकूणच हंगामावर दिसू लागला आहे. पूर्वी पाऊस काही ठराविक कालावधीत पडत असल्याने भातशेतीचे नियोजन ठरलेले असे; मात्र आता अवेळी पाऊस पडत असल्याने शेतीमधील अडचणी वाढू लागल्या आहेत. यंदा मान्सूनचे आगमन तुलनेने उशिरा झाले. त्यातच गेल्या काही दिवसांत पावसाने ओढ दिली आहे. कडक ऊनाच्या झळा बसू लागल्या आहेत. एकीकडे काही प्रमाणात भाताला ऊनाची आवश्यकता असते; मात्र सध्याच्या वाढत्या उकाड्याने शेतीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. तालुक्यातील बहुतांशी भाग कातळाचा असल्याने काही ठराविक दिवसांत पाऊस न झाल्यास शेती अडचणीत सापडते. असेच काहीसे चित्र आता दिसत आहे. भात लावणी वेळीच उरकली, तरीही अद्याप भात रोपांची म्हणावी तशी वाढ होताना दिसत नाही, असा शेतकर्‍यांचा अनुभव आहे. भातशेतीप्रमाणे भाजीपाला उत्पादनही कमी होत असल्याचे चित्र आहे. बियाण्यांमधील उगवण क्षमतेतील कमतरता याला कारणीभूत असावी, असा शेतकर्‍यांचा प्राथमिक अंदाज आहे. काहीही असले तरीही पावसाने भातपीक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
.......................
कोट
यंदा पाऊस शेतीसाठी बरा आहे. काहीवेळा शेतीसाठी ऊनही आवश्यक असते; मात्र पाऊस नसल्याने कातळी भागातील शेतीवर आता करपा रोग जाणवू लागला आहे. सुरुवातीला लावलेल्या रोपांची वाढ खुंटलेली दिसते. बियाण्यांमधील उगवण क्षमतेमधील काही त्रुटी असाव्यात, असे वाटते. भाजीपाल्याची बियाणी अपेक्षित जोर धरत नसल्याचे दिसते.
- बबन बोडेकर, शेतकरी, दाभोळे-कोंडामा
.....................
कोट
पावसाने ओढ दिल्याने भातपीक अडचणीत येऊ शकते. काही भागात भातपिकावर आता करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. याचे प्रमाण कमी असले, तरीही पाऊस असाच लांबल्यास अडचणी वाढू शकतात. सोय असलेल्या शेतकऱ्यांनी भातशेतीला पाणी देण्याची आवश्यकता आहे. शेतीसाठी आवश्यक काळजी घेतली पाहिजे.
- एच. एस. उल्फे, कृषी अधिकारी, देवगड

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82270 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top