सदर ः खाद्यसंस्कृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सदर ः खाद्यसंस्कृती
सदर ः खाद्यसंस्कृती

सदर ः खाद्यसंस्कृती

sakal_logo
By

खाद्यसंस्कृती...........लोगो

फोटो ओळी
-rat31p4.jpg
L39740
ः राजीव लिमये.
-----------
पुरणपोळीः महाराष्ट्राची शान

श्रावणमासी हर्ष मानसी हे गाणे निसर्गप्रेमी कवीऐवजी खवैय्या कवीने लिहिले असते तर त्यात हिरवळीच्या जागी पुरणपोळीचा उल्लेख झाला असता का? हा सांस्कृतिक क्षेत्रातील कळीचा प्रश्न ठरू शकेल, इतका पुरणपोळी हा महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, याबद्दल दुमत नसावे! पुरणपोळीला महाराष्ट्रीय भावविश्वात इतके महत्व कसे बरे असेल? सुगृहिणींच्या पाककौशल्याची परीक्षा ज्या पदार्थांनी होते, त्यात पुरणपोळी अग्रक्रमाने येते. कष्टकारक तरीही आनंद देणारी. यावर्षी तर श्रावणाची सुरवातच शुक्रवाराने झाली आहे. साहजिकच बहुतेक घरांतून पहिला दिवस पुरणपोळीने साजरा झाला असणार.
पुरणपोळी करण्याचे ठरल्यानंतर चांगली चणाडाळ, चांगल्या दर्जाचा गूळ चोखंदळपणे निवडला जातो. पुरण चांगले शिजणे हा उत्तम पुरणपोळी होण्यासाठी महत्वाचा असा पाया असतो, असे कोणतीही गृहिणी सांगेल. प्रत्येक पदार्थाच्या दर्जेदार कृतीचे काही अनुभवसिद्ध ठोकताळे असतात. चणाडाळ बेगमीसाठीची वाळवलेली असल्यास ती शिजायला कठीण, असे अनुभवी गृहिणी सांगतात. आता पुरणासाठी चणाडाळ, प्रेशर कूकरमध्ये शिजवली जात असल्याने डाळ शिजण्यात कमी-जास्त जाणवल्यास पुन्हा कुकरच्या शिट्ट्या केल्या जातात. पूर्वी पुरण मोठ्या पातेल्यात शिजवले जात असल्याने ते वेळाचे काम होते. कोकणातल्या अनेक घरांतून एकत्र कुटुंबे असल्याने सहजच पंधरा-वीस माणसे असायची. त्या वेळी घरांत सहज पन्नासएक पुरणपोळ्या केल्या जायच्या. कसे टीमवर्क असावे त्याचे.
अलिकडे विभक्त कुटुंबांमध्ये घरात एकटी महिला असल्यांने सोईसाठी पुरण आदल्या दिवशी तयार करून ठेवले जात असले तरी परंपरेने सोवळ्यानेच स्वयंपाक करण्याची पद्धत होती. मग भल्या पहाट स्नाने करून घरातील सर्वात ज्येष्ठ गृहिणी, बहुतेक सासू, हे डाळ शिजवून पुरण करण्याचे काम जबाबदारीने करत असणार. पुरण एकजीव होण्यासाठी ते आटवताना त्यात उलथना किंवा पलिता उभा राहिला की, पुरेसे आटले आणि घट्ट किंवा एकजीव झाले, याचा ठोकताळा अनुभवी गृहिणीने तिच्या मुली, सुनांना सांगितल्यानेच आता सर्वांना माहिती झाले असेल. शिजलेले पुरण उन उन असतानाच पाट्यावर वाटण्याची जबाबदारी दुसरी जाऊ घेत असेल. किती सुखद दृश्य असेल, याची कल्पना कराल का तुम्ही? एकजण कणिक तिंबून-तिंबून तयार करत असेल. मग कव्हर करून त्यात अलगद पुरण भरण्याची आणि पोळ्या लाटून त्या भाजण्याची क्रिया सर्वजणी एकत्रित बसून करत असतील. लहान वयाच्या, किशोरवयीन मुली लूडबूड करत काही ना काही करत हे सर्व नकळत शिकत असतील. कुटुंबाची वीण यातूनच अधिक घट्ट होत असेल नाही का? पुरणपोळी करताना ती अलगद लाटून तव्यावर टाकण्याचे कौशल्य कोणत्याही यू ट्यूब रेसिपीपेक्षा अनुभवातूनच शिकता येते. पोळीच्या कव्हरसाठी मैदा वापरायचा की कणिक यातही पाठभेद आहेत. काहीजणी मैद्यापेक्षा गव्हाची कणिक वापरणे पसंत करतात. याची आजच्या ऑनलाइन ऑर्डर करण्याच्या जमान्यात याविषयी कल्पनाच करणे कठीण आहे. अर्थात, हा काळाचा महिमा आहे. यातूनच अनेक घरांतून अगदी व्यावसायिक पद्धतीने ऑर्डरप्रमाणे दर्जेदार पुरणपोळ्या केल्या जातात. पुरणपोळ्या केल्यावर पॅकिंग करण्याआधी त्यातील वाफ जाण्यासाठी पसरून ठेवतात. आता तर पुरणपोळ्यांचा एक्स्पोर्ट होतो म्हणे. यापुढे कदाचित ठराविक ब्रॅंडिगच्या पुरणपोळ्या सर्वत्र मार्केटवर राज्य करतील.
पुरणपोळीबरोबर केलेली कटाची आमटी हा एक चविष्ट उपपदार्थ तुम्ही नक्कीच चाखला असेल. पुरणपोळीसाठी चणाडाळ शिजवल्यावर त्यातील अधिकचे पाणी चाळणीतून गाळून काढले जाते आणि त्याची कटाची आमटी केली जाते, हे सर्वांनाच परिचित आहे. महत्वाचे म्हणजे महाराष्ट्राच्या सर्वच भागात अगदी विदर्भ, मराठवाडा, कोकण, खानदेश या प्रांताप्रांतात पुरणपोळीचे अनेक पाठभेद आहेत. अगदी तव्यावर तूप सोडून खमंग भाजलेली पुरणपोळी खूप चविष्ट असते ना? काही ठिकाणी गुळाबरोबर थोडी साखरही पुरण करताना वापरतात. त्याने पोळीला खुसखुशीतपणा येतो, असे सांगतात. घाटावरचे पुरणपोळी खाताना वाटीत तूप घेउन त्यात बुडवून खाण्याचे किस्से ऐकले असतील तुम्ही; पण आपल्या कोकणातील घरांतून, नारळ विपुल असल्याने असेल. पुरणपोळी ही तुपापेक्षा नारळाच्या दुधाबरोबर जास्त आवडीने खाल्ली जाते. पुरणपोळीबरोबर जेवणात सहसा बटाट्याची भाजी शोभते. हिरव्यागार केळीच्या पानावर डाव्या बाजूला चटणी, लाल रंगाची टोमॅटोची कोशिंबीर, एका वाटीत नारळाचे दूध, दुसऱ्या वाटीत कटाची आमटी, उजव्या बाजूला पिवळसर रंगाची बटाट्याची भाजी आणि या सजलेल्या पानात डाव्या बाजूला खालच्या भागात सोनेरी-पिवळसर रंगाची पुरणपोळी हे दृश्य तोंडाला पाणी सुटण्याला पुरेसे आहे. अथ् पुरणपोळी पुराणम समाप्तम!
-राजीव लिमये, कर्ले, रत्नागिरी
------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82553 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..