
पान दोन मेन-मालवणात राज्यपालांचा निषेध
L39819
- मालवण ः राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा तालुका शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला.
मालवणात राज्यपालांचा निषेध
शिवसेना आक्रमक ः ''त्या'' वक्तव्याविरोधात निदर्शनांसह जोरदार घोषणाबाजी
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३१ ः राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून राज्यात संताप निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने शहरात एकत्र येऊन ''त्या'' वक्तव्याविरोधात जोरदार निदर्शने केली. "चले जाव चले जाव... काळी टोपी चले जाव" अशा स्वरुपाची घोषणाबाजी करत प्रातिनिधिक स्वरुपात आणलेल्या काळ्या टोप्या यावेळी जमिनीवर फेकण्यात आल्या.
राज्यपाल या पदाला मानमर्यादा आहेत. हे घटनात्मक पद असताना एखाद्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याप्रमाणे राज्यपाल वागत आहेत. ज्या महाराष्ट्राचे आपण प्रतिनिधित्व करता, त्या महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान करणारे वक्तव्य त्यांनी केले आहे. या वक्तव्याचा तालुका शिवसेना निषेध करत आहे. राज्यपाल पदावर बसण्याची कोश्यारी यांची योग्यता नसल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी या पदावरून पायउतार व्हावे, अशी मागणी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केली.
येथील शिवसेना शाखेच्या आवारात ही निदर्शने करण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवा तालुकाप्रमुख मंदार गावडे, उपतालुकाप्रमुख अमित भोगले, शहरप्रमुख बाबी जोगी, युवा सेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, अमेय देसाई, सिद्धेश मांजरेकर, नंदू गवंडी, तपस्वी मयेकर, किरण वाळके, शीला गिरकर, संमेश परब, आतू फर्नांडिस, पंकज सादये यांच्यासह अन्य शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री. खोबरेकर म्हणाले की, ज्याप्रमाणे देशाचा प्रमुख हा राष्ट्रपती असतो, त्याप्रमाणे राज्यपाल ही प्रत्येक राज्याची प्रमुख व्यक्ती असते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसाला कमी लेखण्याचे काम केले. त्यांच्या पदाला घटनात्मक अधिकार आहे; परंतु याचा त्यांना विसर पडला असून एखाद्या पक्षाचे पदाधिकारी असल्याप्रमाणे त्यांच्याकडून सातत्याने वक्तव्ये होताना दिसत आहेत. शिवसेनेच्या वतीने आम्ही त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करतो.अशा शब्दांत खोबरेकर यांनी टीका केली आहे.
..............
मराठी माणसाने मुंबई घडवली
महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई नाना शंकर शेठ या मराठी माणसाने घडवली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत मराठी माणसाला स्वाभिमानाने जगायची शिकवण दिली. शिवसेना मराठी माणसाच्या आत्मसन्मानासाठी नेहमीच रस्त्यावर उतरली असून महाराष्ट्राच्या विरोधात कोणीही वक्तव्य करत असेल, तर ते खपवून घेणार नाही. असा इशारा अनेक वक्त्यांनी दिला
...................
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82644 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..