मासेमारी हंगाम आजपासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मासेमारी हंगाम आजपासून
मासेमारी हंगाम आजपासून

मासेमारी हंगाम आजपासून

sakal_logo
By

39890- मासेमारी करतानाचे संग्रहीत छायाचित्र.
39891 - मिथुन मालंडकर


मासेमारी हंगाम आजपासून
दोन महिन्यांच्या बंदीनंतर मच्छीमार सज्ज
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३१ ः दोन महिन्यांच्या मासेमारी बंदीची मुदत संपत असून, उद्या (ता.१) पासून नव्या मासेमारी हंगामाची सुरवात होत आहे. दर्यावर स्वार होण्यास मच्छीमार बांधव सज्ज आहेत. पावसाने गेले काही दिवस दडी मारली असून, मासेमारी हंगामाची दमदार सुरवात होईल, अशी अपेक्षा मच्छीमार बाळगून आहेत.
शासनाने १ जून ते ३१ जुलै म्हणून पावसाळी मासेमारी बंदी कालावधी जाहीर केला आहे. या काळात मासेमारी पूर्णतः बंद असते. त्यामुळे नदी, खाडी पात्रातील मासळीचा आस्वाद मत्स्यखवय्यांकडून लुटला जात होता. आता मासेमारी हंगाम सुरू होत आहे. गेल्या काही दिवसांत स्थानिक बाजारपेठेत मोरी, बांगडा यांसारखी मासळीची मोठी आवक झाली होती. या मासळीचे दर कमी असल्याने मत्स्यखवय्यांनी त्याचा मनमुराद आनंद लुटला. श्रावणास सुरवात झाली आहे. त्यामुळे नव्या हंगामात उपलब्ध होणाऱ्या मासळीला चांगला दर मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. तरीही मच्छीमार बांधव गणेशोत्सवापूर्वी मासळीचे चांगले उत्पन्न मिळेल, या दृष्टीने प्रयत्नशील असतील.
जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात ट्रॉलिंग पद्धतीची मासेमारीही केली जाते; मात्र काही ट्रॉलर्सधारक नारळी पौर्णिमा किंवा गणेशोत्सवनंतरच आपले ट्रॉलर्स समुद्रात लोटतात. सध्या पावसाने दडी मारली असून, समुद्र शांत आहे. वाऱ्याचा जोरही कमी आहे. त्यामुळे चांगली मासेमारी होईल, अशी अपेक्षा पारंपरिक मच्छीमारांमधून व्यक्त होत आहे.
दरम्यान, मत्स्य व्यवसाय खात्याची गस्तीनौका नसल्याने परराज्यातील ट्रॉलर्सची घुसखोरी होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात मत्स्य व्यवसाय खात्याने जुलैच्या पहिल्या आठवड्यातच गस्तीनौकेची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक होते. मात्र, शासनाकडून २९ जुलैला मत्स्य व्यवसाय खात्यास सूचना आल्या आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होण्यास अजून १५ ते २० दिवसांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा फायदा परराज्यातील ट्रॉलर्सकडून घेतल्या जाण्याची शक्यता आहे. मत्स्य व्यवसाय खात्याने लवकरात लवकर निविदा प्रक्रिया पूर्ण करून सुसज्ज गस्ती नौका उपलब्ध करावी, अशी मागणी पारंपरिक मच्छीमारांमधून करण्यात येत आहे.

कोट
समुद्र शांत असून, वाऱ्याचा जोरही कमी आहे. त्यामुळे नव्या हंगामात मासेमारीची दमदार सुरुवात होईल. परराज्यातील हायस्पीड पर्ससीन एलईडीधारकांची जिल्ह्याच्या सागरी हद्दीत मोठ्या प्रमाणात घुसखोरी होण्याची शक्यता आहे. शासनाने कडक कायदा केला आहे; मात्र त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक सुसज्ज अशी गस्ती नौका नसेल तर कायद्याचा उपयोगच काय, असा प्रश्न पारंपरिक मच्छीमारांना पडला आहे. मत्स्य व्यवसाय खात्याने लवकरात लवकर सुसज्ज अशी गस्ती नौका उपलब्ध करून घ्यावी; अन्यथा दरवर्षीप्रमाणे समुद्रात संघर्ष अटळ आहे..
- मिथुन मालंडकर, पारंपारिक मच्छीमार

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82730 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..