
आदित्य ठाकरेंचा दौरा ऊर्जादायी
39889
सावंतवाडी ः येथे आयोजित पत्रकार परिषद बोलताना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ. बाजूला योगेश नाईक, गुणाजी गावडे आदी. (छायाचित्र ः रुपेश हिराप)
आदित्य ठाकरेंचा दौरा ऊर्जादायी
रुपेश राऊळ यांचा विश्वास; सावंतवाडीत स्वागतासाठी शिवसैनिक सज्ज
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३१ ः शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उद्या (ता.१) निष्ठा यात्रेनिमित्त सावंतवाडी गांधीचौक येथे होणारी सभा ही ‘न भुतो न भविष्यती’, अशी ऐतिहासिक सभा होईल. त्यांचा दौरा शिवसैनिकांसाठी ऊर्जा देणारा ठरेल, असा विश्वास आज शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी व्यक्त केला. सकाळी बाराला शहरातील चिटणीस नाका परिसरात सावंतवाडी तालुक्याच्यावतीने ठाकरे यांचे भव्य स्वागत केले जाईल, त्यासाठी कार्यकर्ते सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेच्या निमित्ताने उद्या बंडखोर आमदार दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात येत आहेत. यानिमित्त जिल्ह्यातून शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून सावंतवाडी गांधी चौक येथे होणाऱ्या जाहीर सभेसाठी जय्यत तयारी केली जात आहे. ही सभा नेमकी कशी असेल? कशाप्रकारे ठाकरेंचे सावंतवाडीत स्वागत केले जाईल? या संदर्भात शिवसेनेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख राऊळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी युवा सेनेचे योगेश नाईक, गुणाजी गावडे, अब्जू उर्फ विनायक सावंत आदी उपस्थित होते.
श्री. राऊळ पुढे म्हणाले, ‘‘राज्यातील राजकीय घडामोडीनंतर आणि शिवसेनेवर उद्भवलेल्या संकटानंतर ठाकरे यांनी राज्यात निष्ठा यात्रा काढण्याचा निर्धार केला. त्याला सुरुवातीपासूनच जनतेची भरभरून साथ मिळत आहे. या यात्रेनिमित्त ठाकरे उद्या बंडखोर आमदार केसरकर यांच्या होमपिचवर म्हणजेच सावंतवाडीत येत आहेत. त्यांचे दुपारी बाराला गांधी चौक परिसरात स्वागत करुन जाहीर सभा होणार आहे. गांधी चौकाला एक प्रकारे इतिहास आहे, तोच इतिहास पुन्हा एकदा उद्याच्या सभेनंतर समोर येणार आहे. एकूणच उद्याची ही सभा आत्तापर्यंतच्या झालेल्या सभेपेक्षाही ऐतिहासिक ठभा ठरेल याचा विश्वास आहे. कारण संपूर्ण जिल्ह्याभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक उत्साहाने कामाला लागले आहेत. ठाकरे यांचे सावंतवाडीत होणारे आगमनच कार्यकर्त्यांसाठी ऊर्जा देणारे असल्याने सर्वजण उत्साही आहेत. त्यामुळे त्यांचे जंगी स्वागत शहरात केले जाणार आहे.’’
राऊळ पुढे म्हणाले, ‘‘चिटणीस नाका, माने शॉप, भांगले पेट्रोल पंप, जयप्रकाश चौक आणि तेथून सभास्थळी ते पायी जातील. यावेळी ते नागरिकांशी हितगुज करतील. ठाकरे यांची रॅली सुरुवातीला शहरातील गवळी तिठा परिसरातून काढण्याची मानसिकता होती. कारण गवळी तिठा परिसराला राजा छत्रपती शिवाजी चौक असे नामकरण आहे. त्यामुळे या ठिकाणावरून त्यांचे भव्य स्वागत करून त्यांना सभास्थळी नेण्याचा निर्धार आम्ही केला होता. परंतु, या ठिकाणावरून बंडखोर आमदार केसरकरांचे निवासस्थान शंभर मीटर अंतरावर येत असल्याने कायदा व्यवस्थेचा विचार करत पोलिस प्रशासनाकडून या मार्गावरून रॅली काढू नका, अशी विनंतीवजा सूचना केली आहे. त्यांच्या विंनतीला मान देत ठाकरे यांचे स्वागत चिटणीस नाका येथे करण्याचे निश्चित केले आहे.’’
------------
चौकट
‘महाविकास’तर्फे होणार स्वागत
आदित्य ठाकरे यांचे उद्या महाविकास आघाडीतर्फे पालिकेसमोर भव्य स्वागत केले जाणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी दिली. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी अॅड. दिलीप नार्वेकर, अॅड. राघवेंद्र नार्वेकर, अॅड. गुरुनाथ आईर यांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्याशी याबाबत चर्चा केली असून शहरामध्ये प्रवेश करतात त्यांचे काँग्रेसच्यावतीने जयप्रकाश चौका जवळ स्वागत केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
-------------
कोट
आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त सावंतवाडी शहरामध्ये पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. उद्या कडक बंदोबस्त ठिकठिकाणी ठेवण्यात आला आहे.
- शंकर कोरे, पोलिस निरीक्षक, सावंतवाडी
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82733 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..