‘त्या’ ४० जणांची माणुसकीशी गद्दारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘त्या’ ४० जणांची माणुसकीशी गद्दारी
‘त्या’ ४० जणांची माणुसकीशी गद्दारी

‘त्या’ ४० जणांची माणुसकीशी गद्दारी

sakal_logo
By

40069
सावंतवाडी ः येथील गांधी चौकात सोमवारी आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभेस झालेली गर्दी.

‘त्या’ ४० जणांची माणुसकीशी गद्दारी
---
आदित्य ठाकरे; हिंमत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा लढा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ ः महाराष्ट्राचे राजकारण ४० लोकांनी बदलले आहे. माझे वडील आजारी असताना यांनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. ही गद्दारी त्यांनी शिवसेनेशी केली नसून, माणुसकीशी केली आहे. त्यामुळे ते गद्दार तर आहेतच; पण भविष्यातही ते गद्दारच म्हणून ओळखले जातील. थोडी लाज आणि हिंमत असेल, तर त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे, असे आव्हान शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज येथे दिले. त्यांच्या जाहीर सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मला पुन्हा एकदा राजकारण बदलायचे असून, महाराष्ट्र नव्याने घडवायचा आहे, अशी साद घालत २०१४ मध्ये शिवसेनेत आलेले आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत. शिवसेनेने त्यांना ओळख दिली, पद दिले. मात्र, ते बेईमान निघाले, अशी टीका त्यांनी आमदार दीपक केसरकर यांचे नाव न घेता केली.
राज्यातील राजकीय घडामोडीनंतर आदित्य यांनी सुरू केलेली निष्ठा यात्रा आज येथे आली. गांधी चौकातील सभेत त्यांनी शिवसैनिकांना संबोधित केले. या वेळी व्यासपीठावर शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत, शिवसेना नेते गौरीशंकर खोत, अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, आमदार राजन साळवी, आदेश बांदेकर, प्रदीप बोरकर, सतीश सावंत, अतुल रावराणे, संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, सावंतवाडी संपर्कप्रमुख शैलेश परब, विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत, डॉ. जयेंद्र परुळेकर, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, महिला तालुकाप्रमुख अपर्णा कोठावळे आदी उपस्थित होते.
श्री. ठाकरे म्हणाले, “घडामोडींनंतर मी निष्ठा यात्रा सुरू केली. त्याला ठिकठिकाणी प्रचंड प्रतिसाद आहे. मात्र, असे असताना मला कुठेच आनंद येत नाही. या ४० लोकांना आपलं समजून त्यांच्यावर विश्वास ठेवला, हेच आमचं चुकलं. सत्तेत बसल्यावर आम्हाला राजकारण समजले नाही. आज उभ्या महाराष्ट्राचे राजकारण ४० लोकांनी बदलले आहे. पातळी सोडून राज्याचे राजकारण एका वेगळ्या वाटेवर चालले आहे. या ४० लोकांना आम्ही काय कमी केले? त्यांना ओळख दिली, पदे दिली. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजारी असताना या गद्दारांनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. हे करीत असताना काहींना आमिषे दाखविण्यात आली; तर काहींवर ‘ईडी’चे दडपण होते. त्यामुळे आज चांगली माणसे राजकारणात येतील का? रडायचे नाही तर लढायचे, हे माझ्या आजोबांनी मला शिकविले आहे. त्यामुळे मी लढणार आणि जिंकणारच.”
ते म्हणाले, “आज राज्यात आलेले सरकार बेईमानांचे, गद्दारांचे आहे. ते नक्कीच कोसळणार. यापुढे मी पाठीवर नाही, तर छातीवर घाव घ्यायला तयार असेन. मात्र, माझ्या वडिलांसोबत जे घडलं, ते मी कधीच विसरणार नाही. येणाऱ्‍या काळात मी पुन्हा महाराष्ट्र घडविणार असून, बदनाम झालेले राजकारण बदलणार आहे.”
खासदार राऊत म्हणाले, “उद्धव ठाकरे यांची सभा झाली नसती, तर मागच्या निवडणुकीतच आमदार दीपक केसरकरांचे विसर्जन झाले असते. शिवसेनेत ज्येष्ठ मंडळी असताना काल-परवा आलेल्या केसरकरांना मंत्रिपद दिले. मात्र, सावंतवाडीच्या पवित्र भूमीत गद्दार जन्माला आला. केसरकर आज हिंदुत्वाची भाषा बोलत आहेत. मात्र, ज्या सावंतवाडीकरांनी यांना बोटं पकडून राजकारणात आणलं, ज्या ‘राष्ट्रवादी’ने यांना आधार दिला, त्यांच्याशीही यांनी दगाफटका केला. चार घरची चव चाखणारी केसरकरांसारखी माणसे तुमची-आमची कधीच होणार नाहीत. मात्र, आज याठिकाणी जमलेला जनसमुदाय आणि त्याचे प्रेम आम्ही खोक्याच्या मागे गेलो असतो तर दिसले नसते. त्यामुळे आजही आम्ही शिवसेनेतच आहोत, या केसरकरांच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष देऊ नका. आजची ही सभा गद्दारीला गाडून टाकणारी आणि उद्याच्या नव्या चेहऱ्‍याच्या विजयाची सभा ठरेल.”
केसरकर यांच्या अंगातच गद्दारी अशी टीका करताना माजी नगरसेवक उमेश कोरगावकर यांनी सावंतवाडी पालिकेत नगराध्यक्ष होताना कोणासोबत कशी गद्दारी केली, याचा उलगडा करणारे आरोप केले.


आवाज शिवसेनेचा
सभेला मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. दुपारी रखरखत्या उन्हात गांधी चौक परिसर गर्दीने खचाखच भरून गेला होता. चिटणीस नाका परिसरात आदित्य यांचे सावंतवाडी तालुका शिवसेनेतर्फे भव्य स्वागत करण्यात आले. तेथून आदित्य चालतच सभास्थळी आले. यादरम्यान त्यांनी शहरातील नागरिकांशी हस्तांदोलन करीत संवाद साधला. ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘आदित्य ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘उद्धव ठाकरे तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है,’ ‘हा आवाज कोणाचा, शिवसेनेचा,’ ‘झिंदाबाद झिंदाबाद, शिवसेना झिंदाबाद’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

तर केसरकर माझे वय काढतील...
ज्या माणसांना शिवसेनेने ओळख दिली, मंत्रिपद दिले, तीच माणसे आज आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत. माझ्यासोबत फिरताना आपण त्यांना मानसन्मान दिला. कधीच मला ‘साहेब’ म्हणा, असे सांगितले नाही. मात्र, त्या माणसानेही गद्दारी केली. आपण त्यांचे नाव घेणार नाही. कारण उद्या ते माझे वय काढतील, अशी टीका आमदार दीपक केसरकर यांचे नाव न घेता आदित्य यांनी केली.

गद्दारांचे पीक पुन्हा नाही
सावंतवाडी पवित्र भूमी आहे. त्यांनी शिवसेनेसोबत गद्दारी करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला. अशा गद्दारांचे पीक पुन्हा या मतदारसंघात कधीच उगवणार नाही. येथील शिवसैनिकांनी शिवसेनेवर मनापासून प्रेम केले. हीच प्रेम करणारी जनता या गद्दारांना या भूमीत नक्कीच गाडतील, असा विश्वास शिवसेनेचे नेते गौरीशंकर खोत यांनी व्यक्त केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82970 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top