आंतरजिल्हा बदल्यांची प्रतीक्षा संपली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंतरजिल्हा बदल्यांची प्रतीक्षा संपली
आंतरजिल्हा बदल्यांची प्रतीक्षा संपली

आंतरजिल्हा बदल्यांची प्रतीक्षा संपली

sakal_logo
By

आंतरजिल्हा बदल्यांची प्रतीक्षा संपली

प्रक्रिया सुरू; स्वगृही परतणाऱ्या शिक्षकांची घालमेल

तुषार सावंत ः सकाळ वृत्तसेवा
कणकवली,ता. २ ः राज्याने प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षे रखडलेला हा आंतरजिल्हा बदलीचा कार्यक्रम आजपासून सुरू झाला आहे. जिल्ह्यात शिक्षकांची पदे रिक्त आहेत. तरीही स्वगृही परतणाऱ्यांची संख्या कमालीची आहे. त्यामुळे या बदली प्रक्रियेत कुणाला संधी मिळणार आणि कुणाला इच्छितस्थळी जाता येणार हे निश्चित होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षकांचे रोस्टर बिंदू नामावली ही बदलीसाठी खास विकसित केलेल्या अॅपवर अपलोड केली जाणार आहे. आजपासून ही प्रक्रिया सुरू होत आहे. यासाठी दोन दिवसांचा कालावधी आहे. प्रतिवर्षी प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्या २०१९ पर्यंत झाल्या होत्या; परंतु, मार्च २०२० पासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला आणि राज्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली. परिणामी मागील दोन वर्षांत बदली प्रक्रियेला स्थगिती दिली होती. आता राज्यातील सरकारमध्ये बदल झाला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने बदली प्रक्रियेला मान्यता दिल्याने नवीन धोरण निश्चित करून या बदल्यांचा कार्यक्रम राबविला जाणार आहे. त्यामुळे शिक्षक वर्गात आनंदाचे वातावरण आहे. आंतरजिल्हा बदल्या या शासनाच्या नवीन धोरणानुसार होणार आहेत. यासाठी नव्याने अॅप विकसित केले आहे.
कोरोनामुळे २०१९-२१ या दोन वर्षांच्या कालावधीत एकाही शिक्षकाची बदली झालेली नाही. शिवाय यंदा बदल्यांची संगणक प्रणाली पूर्णपणे विकसित न झाल्याने आतापर्यंत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू होऊ शकली नव्हती. आता शाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र, बदलीसाठी उत्सुकता असलेल्या शिक्षकांची या नव्या प्रणालीमुळे संभ्रमावस्था संपुष्टात आली आहे. आता हा कार्यक्रम १३ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने जिल्ह्यात किती शिक्षक राहणार?, शिक्षक पदे रिक्त होणार का? याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
जिल्ह्यातील शिक्षक हे बहुतांशी परजिल्ह्यातीलच आहेत. ही संख्या ७० टक्के पेक्षा अधिक आहेत. नव्याने शिक्षक म्हणून सेवेत रूजू झालेल्यांना स्वगृही परतण्याची ही संशी असते. या संधीची प्रतिक्षा मागील दोन वर्षांपासून होती. विविध प्रवर्गातील शिक्षक आपल्या जिल्ह्यात किंवा विभागात पतरण्यासाठी इच्छुक असतात तर काही शिक्षक मंडळी परजिल्ह्यातील असले तरी ते या जिल्ह्यात स्थायिक राहतात. पण, नव्याने भरती झालेल्या शिक्षकांना आपल्या जिल्ह्यात परतण्याची ही एक संधी असते. यंदा ही ऑनलाईन बदली प्रक्रीया होत असल्याने वसुलेबाजीची गरज नाही. निकषाप्रमाणे ही बदली प्रक्रिया पारर्दशक पद्धतीने राबवली जाणार आहे.
---------
कोट
जिल्हा परिषदेच्या बदल्यांची प्रक्रिया शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे होत आहे. याची माहिती बिंदू नामावलीप्रमाणे अपलोड केली जात आहे. मात्र, जिल्ह्यात १४ टक्के शिक्षकांच्या रिक्त जागा आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाली तरी जोपर्यंत नवीन शिक्षक भरती केले जात नाहीत, तोपर्यंत दहा टक्केपेक्षा कमी रिक्त जागा ठेवून शिक्षकांना कार्यमुक्त केले जाणार नाही.
- मुस्ताक शेख, प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी
----
असा आहे कार्यक्रम
* अॅपवर बिंदू नामावलीप्रमाणे माहिती अपलोड करणे ः २ व ३ ऑगस्ट
* बिंदूनामावली प्रसिद्ध करणे ः ४ ऑगस्ट
* बिंदूनामावली शिक्षकांसाठी अवलोकन ठेवणे ः ४ व ५ ऑगस्ट
* शिक्षकाने आंतर जिल्ह्यासाठी अर्ज करणे ः ६ ते ९ ऑगस्ट
* आंतरजिल्हा बदलीची प्रत्यक्ष कारवाई ः १० ते १२ ऑगस्ट
* बदली आदेश देणे ः १३ ऑगस्ट

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83133 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..