
टुडे पान एक अँकर-''गोकुळ''ने घेतली दुधाची हमी
धवलक्रांती खुणावतेय ः भाग ५
---
‘गोकुळ’ने घेतली दुधाची हमी
हक्काचे मार्केट; जिल्ह्यातील व्यावसायिकांना खराडेंकडून मार्गदर्शन
विनोद दळवी ः सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २ ः दूध हे नाशिवंत आहे. दुधावर वेळीच प्रक्रिया झाली नाही तर ते खराब होऊ शकते. त्यामुळे उत्पादित झालेले दूध वेळेत विक्री झाले पाहिजे, अन्यथा शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होऊ शकते. परंतु, सिंधुदुर्गात उत्पादित होणाऱ्या दुधाला गोकुळ संघासारखे हक्काचे मार्केट आहे. त्यामुळे जिल्ह्यात तरी दुधाचा धंदा शाश्र्वत आहे. कितीही व कोठेही दुधाचे उत्पन्न घेतले तरी ते जाग्यावर येऊन नेण्याची हमी कोल्हापूर गोकुळ संघाने जिल्हा बँकेला दिलेली आहे. २०१३ पासून सातत्याने दूध खरेदी करीत ते गोकुळ दूध संघाने सिद्ध केले आहे, असे ‘गोकुळ’चे अधिकारी व कोल्हापूर येथील यशस्वी दुग्ध व्यावसायिक योगेश खराडे यांनी ‘सकाळ’ला सांगितले.
खराडे हे सध्या जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायात येत असलेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. जिल्हा बँक आपण आयोजित करीत असलेल्या मेळाव्यात त्यांना मार्गदर्शक म्हणून बोलवत आहेत. खराडे यांचे मार्गदर्शन हे केवळ तांत्रिक बाबींशी निगडीत नाही. स्थानिक वातावरण, स्थानिक उपलब्धता याच्याशी सुसंगत ते मार्गदर्शन करतात. ते तांत्रिक मुद्यांवर मागदर्शन न करता स्थानिक गोष्टींशी सांगड घालून कशाप्रकारे व्यवसाय करू शकतो, याची माहिती देतात. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन सध्या जिल्ह्यातील दूध व्यावसायिकांना चांगले भावत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार दिवसाला किमान ३०० मिलिलीटर दूध प्रत्येक माणसाच्या शरीराला आवश्यक आहे; मात्र, सध्या ते १२० मिलिलीटर मिळेल, एवढेच उत्पादित होत आहे. म्हणजे अजून १८० मिलिलीटर दूध उत्पादित करण्याची गरज आहे. आपल्या देशाच्या १४० कोटी लोकसंख्येला पुरेसे दूध उत्पादन आपल्याकडे होत नाही. महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरात दुधाची तहान भागत नाही. दुधाचा व्यवसाय तोट्यात नाही, हे सांगताना खराडे यांनी या व्यवसायात हुकमी पैसे मिळतात. विशेष म्हणजे यासाठी महिनाभर वाट पाहण्याची गरज नाही. कारण गोकुळ दूध संघ दर दहा दिवसांनी दूध उत्पादकांच्या बँक खात्यात पैसे जमा करते. त्यामुळे आर्थिक उलाढाल थांबत नाही. शेतकऱ्याला पैशांसाठी आर्थिक ओढाताण करावी लागत नाही.
खराडे म्हणाले, ‘‘२०१३ मध्ये गोकुळ दूध संघाने जिल्ह्यात दूध खरेदी करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी अवघे २५० लिटर मिळत होते. तरीही ‘गोकुळ’ने दूध खरेदी बंद केले नाही. मधल्या काळात तर अन्य ठिकाणी दूध विक्री होत होती. तरीही गोकुळ संघाने आपली सेवा सुरू ठेवली होती. यावरून ‘गोकुळ’ला जिल्ह्यातील दूध खरेदी बंद करायची नाही, हे सिद्ध झाले आहे. कितीही दूध उत्पादन वाढले तरी त्यासाठी गोकुळ सज्ज आहे. विशेष म्हणजे गोकुळ दूध संघ दूध उत्पादकांची नेहमी काळजी घेते. दुधाची उचल करण्यासाठी दूध संघ आहे का ? याचा विचार करीत नाही. ज्या ठिकाणी दूध उत्पादन होत आहे तेथे केंद्र तयार करून दूध खरेदी करते. त्यामुळे कोणत्याही दूध उत्पादकाला दुधाची विक्री होत नाही, हे कारण सांगण्याची गरज नाही.’’
‘सकाळ’शी बोलताना खराडे यांनी जिल्हा बँकेचे विशेष आभार मानले. ते म्हणाले, ‘‘जिल्हा बँक शेतकऱ्यांची बँक म्हणून नेहमी सांगितले जाते; परंतु, शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतेच निर्णय जिल्हा बँका घेत नाहीत. घेतले तर दाखविण्यापुरते असतात; मात्र, सिंधुदुर्ग जिल्हा बँक खऱ्या अर्थाने शेतकरी हिताच्या योजना राबवित आहे. अन्य जिल्ह्यात दुधाळ जनावरे खरेदी करण्यासाठी कर्ज द्या म्हणून जिल्हा बँकेच्या मागे लागावे लागते. मात्र, सिंधुदुर्गात जिल्हा बँक कर्ज घ्या म्हणून शेतकऱ्यांच्या घरी जात आहे. ही गोष्ट अभिनंदनास पात्र असून यामुळे शेतकऱ्यांची नाळ या जिल्हा बँकेशी जोडलेली आहे.’’
-------------
चौकट
कृत्रिम रेतन सेवकांसाठी जिल्हा बँकेचा पुढाकार
खराडे यांनी, दुधाळ जनावरे घेतल्यानंतर पशु डॉक्टरची उपलब्धता असणे गरजेचे आहे. ही जनावरे आजारी पडल्यावर तत्काळ डॉक्टर उपचार झाले पाहिजेत. सिंधुदुर्गात शासकीय पशु डॉक्टर कमी आहेत. अनेक पदे रिक्त आहेत. याचा विचार करून गोकुळ दूध संघाकडे कृत्रिम रेतन सेवक प्रशिक्षणासाठी काही युवकांची जिल्हा बँकेने निवड केली आहे. त्यांचा प्रशिक्षण खर्च जिल्हा बँक उचलणार आहे. यामुळे पशु डॉक्टरांची असलेली उणीव सुद्धा भरून निघणार असल्याचे खराडे म्हणाले.
------------
चौकट
...तरच व्यवसाय वाढवा
खराडे म्हणाले की, नव्याने दूध उत्पादन क्षेत्रात उतरणाऱ्या शेतकऱ्यांनी एकदम मोठा व्यवसाय करण्याच्या नादी लागू नये. त्यात नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. केवळ एक ते दोन म्हैशी घेऊन व्यवसाय सुरू करावा. कारण यामुळे अनेक चुका सुधारता येतात. नुकसान होण्याचे प्रमाण कमी राहते. यात यशस्वी झाल्यावर अजून जनावरे आणून व्यवसाय वाढविता येतो.
-------------
कोट
४०२१२
दुग्ध व्यवसायासाठी मजुरांची गरज नाही. केवळ पती-पत्नी हे हा व्यवसाय करू शकतात. यासाठी प्रचंड मेहनतीची गरज नाही. केवळ योग्य नियोजनाची गरज आहे. मी गोकुळ दूध संघात नोकरी करून हा व्यवसाय करतो. सकाळचा दीड तास व सायंकाळी दीड तास यासाठी देतो. यातून महिन्याला सरासरी २० हजार रुपये कमावतो.
- योगेश खराडे, अधिकारी, गोकुळ दूध संघ
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83136 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..