अस्सल मालवणी खेळीया ‘लिलाधर कांबळी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अस्सल मालवणी खेळीया ‘लिलाधर कांबळी’
अस्सल मालवणी खेळीया ‘लिलाधर कांबळी’

अस्सल मालवणी खेळीया ‘लिलाधर कांबळी’

sakal_logo
By

नाट्यनिपुण सिंधुदुर्ग
...............................
swt२६.jpg
L४०२१३
श्रीनिवास नार्वेकर

अस्सल मालवणी खेळीया ‘लिलाधर कांबळी’

लीड
मागल्या लेखात आपण मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांच्याबद्दल बोललो. आजच्या या लेखात रंगभूमी, मालिका, चित्रपट या तिन्ही क्षेत्रांत आपला ठसा उमटवणार्‍या ‘लिलाधर कांबळी’ नावाच्या अस्सल मालवणी खेळीयाबद्दल बोलणार आहोत. कोणतेही अंगविक्षेप किंवा वेडेवाकडे चाळे न करता अस्सल विनोदनिर्मिती करणारे जे काही कलाकार आपल्याकडे होऊन गेले, त्यामध्ये लिलाधर कांबळी हे एक महत्वाचे नाव आहे. केवळ मराठीच नाही, तर इंग्लिश रंगभूमीवरही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. कोणतीही भूमिका छोटी किंवा मोठी न मानता वाट्याला आलेल्या कोणत्याही भूमिका त्यांनी समर्थपणे पेलल्या आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या लक्षात राहतील, अशा अजरामर करुन दाखवल्या.
- श्रीनिवास नार्वेकर
------------
मच्छिंद्र कांबळींप्रमाणेच लिलाधर कांबळीदेखील मालवणातल्या रेवंडी गावचे. केवळ मालवण, सावंतवाडी, कुडाळच काय, अख्खा कोंकणच नाट्यरत्नांची खाण. त्या खाणीतला हा आणखी एक हिरा. राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकातून कलाकार म्हणून झालेली त्यांची सुरुवात त्यांच्या नाट्यक्षेत्रातल्या प्रवेशाला कारणीभूत ठरली. सिंधुदुर्गातला हा हिरा मराठी रंगभूमीला अनेक उत्तमोत्तम नाटकं आणि कलावंत देणार्‍या मोहन तोंडवळकरांच्या नजरेस पडला आणि ‘कलावैभव’मधून लिलाधर कांबळींची नाट्यक्षेत्रातली वाटचाल सुरु झाली. पूर्वीच्या काळी नाटकांचे जे मोठे दौरे होत, त्यात ‘कलावैभव’चे व्यवस्थापक म्हणून ते काम बघत. एकदा ‘नयन तुझे जादूगार’ नाटकाच्या दौर्‍यावेळी जयंत सावरकरांना तो दौरा करणं शक्य झालं नाही आणि तोंडवळकरांनी कांबळींना सांगितलं. कांबळी त्या प्रयोगाला उभे राहीले आणि त्यांनी तो प्रयोग खणखणीत वाजवलाही.
‘नयन तुझे जादूगार’पासून सुरु झालेली कांबळींची वाटचाल अगदी अलिकडे म्हणजे साधारण २०१६-१७ पर्यंत सुरुच होती. मराठी रंगभूमीवर प्रचंड गाजलेल्या अनेक नाटकांमध्ये कांबळींनी भूमिका केली. वात्रट मेले, दुभंग, हिमालयाची सावली, प्रेमा तुझा रंग कसा, लेकुरे उदंड झाली, काचेचा चंद्र, वस्त्रहरण, वन रुम किचन, आमच्या या घरात, चालगती किती म्हणून नावं सांगावीत. ‘प्रेमा तुझा रंग कसा’वर आधारीत भरत दाभोळकरांनी केलेल्या ‘फनी थिंग कॉल्ड लव्ह’ या इंग्लिश नाटकातला लिलाधर कांबळींचा डिकास्टा तर अमराठी प्रेक्षकांनी उचलून धरला. इंग्लिशवर प्रभुत्व नसतानाही या नाटकात त्यांनी उडवलेली धमाल आश्‍चर्यकारक होती.
गंमत म्हणजे ‘रिप्लेसमेंट’च्या भूमिकांनी सुरुवात केलेल्या कांबळींच्या वाट्याला नंतरही बर्‍याच ‘रिप्लेसमेंट’च्या भूमिका करण्याची वेळ आली. पण, त्यांनी बाकीच्या भूमिकांप्रमाणेच आपल्या अंगीभूत अभिनयाने त्या चोख वाजवल्या. अशीच एक त्यांनी ‘रिप्लेसमेंट’ केलेली आणि अवघ्या मराठी नाट्यरसिकांच्या मनामध्ये आजही घर करुन राहीलेली भूमिका म्हणजे दिलीप प्रभावळकरांच्या ‘हसवाफसवी’मधली वाघमारेंची भूमिका. मी वर म्हटल्याप्रमाणे कोणतेही वेडेवाकडे चाळे न करता अगदी सहजपणे घरंदाज विनोदनिर्मिती कशी करावी, याचं लिलाधर कांबळी हे मूर्तिमंत उदाहरण आहे.
मालवणी भाषेला जागतिक पातळीवर पोहोचवणाऱ्या ‘वस्त्रहरण’मधली जोशी मास्तरांची लिलाधर कांबळींनी केलेली भूमिका ज्यांनी पाहीली असेल, ते रसिक तो अनुभव विसरणं नक्कीच शक्य नाही. ‘वात्रट मेले’मधली मामांची भूमिका असो किंवा ‘केला तुका झाला माका’मधली मास्तराची भूमिका असो, या भूमिकांच्या आणि लिलाधर कांबळींच्या उल्लेखाशिवाय मराठी रंगभूमीचा इतिहास पूर्ण होणार नाही. मच्छिंद्र कांबळींप्रमाणेच मालवणी भाषेचा अभिमान बाळगणारा आणि मालवणी व्यक्तिरेखांमधून रसिकांच्या मनामध्ये आपलं स्थान निर्माण करणारा हा खेळीया.
भाकरी आणि फूल, गोट्या, बे दुणे तीन या आणि अनेक हिंदी-मराठी मालिका तर सिंहासन’पासून अनेक चित्रपटही केले. पण खर्‍या अर्थाने ते रमले नाटकातच. स्थिरस्थावर होण्यासाठी पत्करलेली मुंबई पोर्ट ट्रस्टमधली नोकरी सांभाळून ते नाटका-मालिकांमध्ये कामं करत राहीले, मिळतील त्या भूमिका करत राहीले. छोटी भूमिका मिळाली म्हणून त्यांनी वाईट वाटून घेतलं नाही की मोठी भूमिका मिळाली, ती गाजली म्हणून कधी अहंकार मिरवला नाही. हा माणून साधाच होता, अखेरपर्यंत साधाच राहीला.
‘पडदा उघडण्यापूर्वी’ या आत्मचरित्राच्या निमित्ताने त्यांनी आपला एकूणच रंगपट रसिकांसमोर मांडला. नाटकांच्या, नाटकवाल्यांच्या आणि एकूणच नाट्यक्षेत्राबाबतच्या अनेक अनुभवांनी हे आत्मचरित्र भरलेलं आहे. आजच्या नव्या पिढीसाठी त्यातल्या कितीतरी गोष्टी पथदर्शी आहेत. विनोदी भूमिका किती संयत करावी, हे दाखवून देणारे लिलाधर कांबळी आजच्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहेत, असायला हवेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83142 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..