
चिपळूण ः प्रकल्पग्रस्तांची वयोमर्यादा येतेय संपुष्टात
ratchl२२.jpg
चिपळूणः आंदोलनाची भूमिका मांडताना माजी आमदार सदानंद चव्हाण, तालुकाप्रमुख प्रताप शिंदे व प्रकल्पग्रस्त तरुण.
प्रकल्पग्रस्तांची वयोमर्यादा येतेय संपुष्टात
२२४ जणांचे भवितव्य अंधारात; बेमुदत उपोषणाचा इशारा
चिपळूण, ता. २ः कोयना प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर वारंवार पाठपुरावा केला. त्यास काही अंशी यशदेखील आले; मात्र अजूनही २२४ प्रकल्पग्रस्तांना महानिर्मितीत प्रकल्पग्रस्त म्हणून सामावून घेतले जात नाही. वारंवार केवळ आश्वासने दिली जातात. प्रकल्पग्रस्तांची आता वयोमर्यादा संपुष्टात येत असून, तरुण प्रकल्पग्रस्तांचे जीवन अंधकारमय होण्याची चिन्हे आहेत. यासाठी आता आर या पार लढाई करावी लागणार आहे. त्यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या साथीने १४ ऑगस्टपासून पोफळी येथे महानिर्मिती कंपनीसमोर बेमुदत उपोषण छेडणार असल्याचा इशारा माजी आमदार सदानंद चव्हाण आणि तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
कापसाळ येथे कोयना प्रकल्पग्रस्त तरुण, तालुकाप्रमुख शिंदे व माजी आमदार चव्हाण यांनी आंदोलनाची भूमिका माडंली. ते म्हणाले, गेल्या काही वर्षापासून प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. माजी आमदार सदानंद चव्हाण, खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून मंत्रालयात तत्कालीन ऊर्जामंत्र्यांच्या उपस्थितीत अनेक बैठका झाल्या. ऊर्जा विभागाच्या सचिवासोबतही चर्चा झाली. त्याचे फलित म्हणून काही प्रकल्पग्रस्तांना सामावून घेण्यात आले; मात्र अद्यापही त्यांची समस्या सुटलेली नाही. महानिर्मिती, महावितरण व महापारेषण हे आपापली जबाबदारी झटकत आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या सर्व जमिनी कोयना प्रकल्पासाठी संपादित झाल्या. त्यांना आता घरे बांधायलादेखील जमीन नाही. वारंवार पाठपुरावा करूनही प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळत नाही.
प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत २०१७ पर्यंत प्रकल्पग्रस्तांना प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण घेतलेल्या काही प्रशिक्षणार्थींना नोकरीत सामावून घेण्यात आले; मात्र २०१७ पासून शासनाने ही योजनाच बंद केली आहे. ती पुन्ही सुरू करावी, अशी आमची मागणी आहे. नोकरीत सामावून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी येथील कोयना प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पग्रस्त म्हणून दाखले दिले; मात्र नोकरभरतीत त्यांना संधी मिळत नाही.
चौकट
कर्मचाऱ्याला कंपनीत जाऊ देणार नाही
एकीकडे या प्रकल्पग्रस्त तरुणांचे वय वाढत चालल्याने ते निराशाच्या छायेत आहेत. यासाठीच आता आम्ही प्रकल्पग्रस्तांच्या साथीने आर या पार लढाई सुरू केली आहे. त्यानुसार पोफळी येथील महानिर्मिती कंपनीसमोर १४ ऑगस्टपासून बेमुदत बेमुदत उपोषण केले जाणार आहे. या वेळी कंपनीत कार्यरत असलेल्या एकाही अधिकारी व कर्मचाऱ्याला कंपनीत सोडणार नाही. उपोषणाचे निवेदन संबंधित सर्व विभागांना दिले असल्याचे प्रताप शिंदे यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83284 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..