
वीज कंत्राटींची कुडाळात सभा
40362
कुडाळ ः रघुवीर पांचाळ यांना नियुक्तीपत्र देताना अशोक सावंत.
वीज कंत्राटींची कुडाळात सभा
मालवण ः सिंधुदुर्ग वीज कंत्राटी कामगार संघटनेची मासिक सभा नुकतीच कुडाळ येथे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्ह्यातील काही कंत्राटी कामगारांना महावितरणच्या ८५ टक्केच्या परिपत्रकामुळे कमी केले होते. यात कमी केलेल्या काही कामगारांना काही दिवसांपूर्वी, तर आज देवगड येथील रघुवीर पांचाळ या कामगाराला सिंधुदुर्ग वीज कंत्राटी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सावंत यांच्या हस्ते येथे नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी कंत्राटी कामगार धोंडू पवार, रुपेश जाधव, हरेश लांबोरे आदी उपस्थित होते. यावेळी कामगार हिताचे निर्णय मांडण्यात आले. संपूर्ण राज्यात ९५ टक्के नव्हे तर १०० टक्के कंत्राटी कामगार भरतीसाठी संघटना प्रयत्नशील राहणार आहे. आपली लढाई खूप जवळ आली आहे. शासनाकडून फक्त तोंडी आश्वासने नको, तर कृती हवी असून यासाठी आपली संघटना बांधिल आहे. त्यामुळे येणारा काळ हा नक्कीच कंत्राटी कामगारांच्या भवितव्याचा काळ असेल, असे श्री. सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.
---
40379
करंजे ः येथील भातशेतीचे गव्यांनी केलेले नुकसान.
करंजेत गव्यांकडून नुकसान
कणकवली ः तालुक्यातील करंजे - तेलीवाडी येथील भास्कर कदम यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या भात शेतीचे गव्यांच्या कळपाने मोठे नुकसान केले. लावणी केलेल्या भात शेतीच्या रोपांमध्ये गव्यांचा कळप फिरल्याने भात रोपे तुडवली गेली आहेत. त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे मागणी सरपंच मंगेश तळगावकर यांनी केली आहे. या कळपाला हुसकावून लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
--
केईएममध्ये चोरांचा सुळसुळाट
मुंबई : कोविडनंतर पालिकेच्या केईएम रुग्णालयातील गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचा गैरफायदा मोबाईल चोर उठवत आहेत. केईएम रुग्णालयात गेल्या एका महिन्यात मोबाईलसह इतर वस्तू चोरण्याच्या घटनांचे प्रमाण वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण जुलै महिन्यात चोरीच्या एकूण २१ घटना नोंदवण्यात आल्या आहेत; तर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाही मोबाईल आणि बॅग चोरीला गेल्याची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे. केईएम रुग्णालयात गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या एका परिचारिकेची बॅग क्लार्क ऑफिसजवळ ठेवलेल्या कठड्यावरून उचलून नेण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
----
आॅनलाईन सेवेचा गैरवापर
मुंबई : शिकावू वाहन परवाना मिळवण्यासाठी आरटीओ कार्यालयात जाण्याची आणि चाचणी देण्याची गरज नसल्याचा दावा सायबर कॅफे चालकांकडून केला जात आहे. परिवहनच्या ऑनलाईन धोरणाचा गैरफायदा घेऊन ‘फोटो व आधार कार्ड द्या आणि लर्निंग लायसन्स मिळवा’ अशा जाहिरातीही केल्या जात आहे. वाशी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील सहाय्यक प्रादेशिक अधिकारी गजानन गावंडे यांनी अशा प्रकारे बेकायदा दावा करून परवाने देणाऱ्यांवर कारवाई केली आहे. परिवहनच्या ऑनलाईन धोरणाचा कुठेही गैरवापर होऊ नये, यासाठी आरटीओ कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या महा ई-सेवा केंद्र, इंटरनेट कॅफे व मोटार ड्रायव्हिंग स्कूल अशा संस्थांची तपासणी करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83318 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..