
मालवणात १०ला गीतगायन स्पर्धा
मालवणात १०ला
गीतगायन स्पर्धा
मालवण ः कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बुधवारी (ता.१०) जिल्हास्तरीय देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धा पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी, नववी ते बारावी, महाविद्यालयीन व खुल्या अशा गटात होईल. एका गटात ६ ते १० स्पर्धक असतील. प्रत्येक गटातून विजेता व उपविजेता संघ निवडला जाईल. गट १ व २ मधील विजेत्यांना प्रत्येकी ७५०, तर उपविजेत्यास ५५० रुपये, गट ३ व ४ मधील विजेत्यास १ हजार, तर उपविजेत्यास ७५० रुपये देण्यात येणार आहे. संजय पेंडुरकर, समीर चांदरकर यांच्याशी रविवार (ता.७) पर्यंत संपर्क साधावा.
---
शिक्षकेतरांचा
उद्या सत्कार
ओरोस ः जिल्हा उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम व्होकेशनल शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे शुक्रवारी (ता. ५) सकाळी बाराला जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रमण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा कार्यालय ओरोस येथे निवृत्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे. यावेळी पी. के. चौकेकर (निवृत्त लिपिक, टोपीवाला हायस्कूल मालवण), सायमन फर्नांडिस (एसएमएस स्कूल, कणकवली), बाबुराव आरोलकर (निवृत्त चतुर्थश्रेणी कर्मचारी, शिरोडा हायस्कूल) व लक्ष्मण पंडित (चतुर्थश्रेणी कर्मचारी, आरपीडी हायस्कूल, सावंतवाडी) यांचा सन्मान होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनाध्यक्ष मिलिंद जाधव, सचिव भानुदास परब यांनी केले आहे.
--
कणकवलीत
लोक अदालत
कणकवली ः महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधी सेवा शाखेतर्फे येथे शनिवारी (ता.१३) लोक अदालतीचे आयोजन केले आहे. तालुका विधि समिती आणि दिवाणी न्यायालयाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोक अदालत दिन साजरा होत आहे. दिवाणी, फौजदारी विभागातील प्रलंबित प्रकरणे, महावितरण, बीएसएनएल, राष्ट्रीयकृत बँका, ग्रामपंचायतीची प्रकरणे यात घेण्यात येतील. पक्षकार, नागरिकांनी लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कणकवली विधी समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती टी. एच. शेख यांनी केले आहे.
---
सीएनजी गॅस
दरवाढीचा फटका
कणकवली ः वाहन चालकांनी आर्थिकदृष्ट्या परवडणारे वाहन म्हणून सीएनजी गॅसवर चालणारी वाहने खरेदी केली; मात्र, हळूहळू सीएनजी गॅसच्या किमतीतही वाढ होऊ लागली आहे. महानगर गॅस कंपनीने दोन ऑगस्ट पासून सीएनजी गॅस दरात किलोमागे सहा रुपयांनी वाढ केली आहे. या दरवाढीमुळे सीएनजीचा दर ८६ रुपये प्रतिकिलो झाला आहे. त्यामुळे इंधन दरवाढीसह सीएनजीचे दर वाढल्याने वाहन चालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83478 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..