माती परीक्षणाचे महत्त्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माती परीक्षणाचे महत्त्व
माती परीक्षणाचे महत्त्व

माती परीक्षणाचे महत्त्व

sakal_logo
By

14988-3
माती परीक्षण क्लिपआर्ट
--
४०४४३
डॉ. विलास सावंत

माती परीक्षणाचे महत्त्व

आपण ज्या जमिनीतून पीक घेतो, त्या जमिनीचा प्रकार कोणता व त्या जमिनीत कोणती अन्नद्रव्ये किती प्रमाणात आहेत, या सर्व गोष्टींची माहिती करून घ्यायची असेल, तर किमान वर्षातून एकदा तरी माती परीक्षण करणे गरजेचे असते. माती परीक्षणामुळे आपल्याला जमिनीची सुपीकता व उत्पादकता किती आहे व कोणती अन्नद्रव्ये किती प्रमाणात घालावीत, याची माहिती मिळते. माती परीक्षणानुसार खते व इतर पोषकद्रव्यांची योग्य पद्धतीने आवश्यकतेनुसार उपाययोजना करता येते. त्याने साहजीकच पीक उत्पादन वाढते.
- डॉ. विलास सावंत
................
माती परीक्षण म्हणजेच जमिनीतील अंगभूत रसायने व जैविकांचे विश्लेषण आहे. पिकांच्या वाढीसाठी अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. सामू, विद्युत वाहकता, चुनखडी, सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश, आयर्न, झिंक, मॅग्नीज, सल्फर, बोरॉन यापैकी एखादे जरी अन्नद्रव्य मातीत कमी-जास्त झाले, तर त्याचा परिणाम झाडावर दिसून येतो. जसे पाने पिवळी पडणे, पाने गळणे आदी. माती परीक्षणानुसार गैरवाजवी खते देण्यावर नियंत्रण करता येते. त्यामुळे पिकाच्या उत्पादन खर्चात बचत होते. जमिनीचा सामू नियंत्रित म्हणजे ६.५ ते ७.५ ठेवून पिकाची अन्नद्रव्यांची शोषण क्षमता वाढवता येते. खरीप पीक काढल्यानंतर लगेचच किंवा एप्रिल-मेमध्ये मातीचे नमुने घ्यावेत. पिकाला सेंद्रिय अथवा रासायनिक खत घातल्यानंतर तीन महिन्यांच्या आत मातीचा नमुना घेऊ नये. नमुना ओला असल्यास सावलीत वाळवून नंतर पिशवीत भरावा. मातीचा नमुना घेताना जमिनीचे क्षेत्र, विस्तार, स्थान, निचरा, रंग, घेण्यात येणारी पिके व जलसिंचन याचा प्रामुख्याने विचार करून त्यानुसार नमुना घ्यावा. नमुना घेताना शेताचे भाग पाडावेत. अर्धा ते दोन हेक्टरपर्यंत भागातील वेगवेगळे नमुने घ्यावेत. उदाहरणार्थ, कोरडवाहू जमीन, पाणथळ जमीन, उतारावरची जमीन याप्रमाणे प्रत्येक जमिनीचे वेगवेगळे नमुने घ्यावेत. नमुना काढण्यासाठी टिकाव, फावडे, खुरपे किंवा अगर, घमेली, पॉलिथिन किंवा ताडपत्रीचा तुकडा, गोणपाट, कापडी पिशवी या वस्तूंची जरुरी असते. पाण्याच्या पाटाजवळील मातीचा नमुना घेऊ नये. तसेच घराजवळील जागा, जनावरे बसण्याची जागा, खत आणि कचरा टाकण्याची जागा, दलदलीची जागा, बांध व झाडाखालील जागा या ठिकाणचे मातीचे नमुने घेऊ नयेत. मातीचा नमुना प्राथमिक असावा. भाग पाडलेल्या शेताच्या मध्यरेषेच्या दोन्ही बाजूस पाच ते सहा वळणे असलेल्या रेषा काढाव्यात. या रेषा जमिनीच्या लांबी-रुंदीप्रमाणे कमी-जास्त अंतरावर असाव्यात. प्रत्येक वळणावर टिकाव किंवा खुरप्याने खुणा कराव्यात. खुणा केलेल्या जमिनीवरील सर्व पालापाचोळा, तण काढून टाकावेत. त्या ठिकाणी पण २२.५ सेंटीमीटर चौकोनी खोल खड्डा घ्यावा. खड्ड्यातील सर्व माती हाताने अगर खुरप्याने काढून टाकावी. खड्ड्याचा आकार साधारणपणे इंग्रजी ''व्ही'' अक्षराप्रमाणे असावा. खड्ड्याच्या एका बाजूची साधारणपणे ४ सेंटीमीटर जाडीची माती खुरप्याने तासून घ्यावी व ती माती घमेल्यात गोळा करावी. अशा पद्धतीने दहा ते बारा ठिकाणांहून गोळा केलेली माती पॉलिथिनच्या किंवा ताडपत्रीच्या तुकड्यावर पसरून चांगले मिसळावे. मातीत असणारे खडे व वनस्पतींची मुळे काढून टाकावी आणि मोठी ढेकळे फोडून घ्यावीत. त्यानंतर त्याचे चार समान भाग पाडून समोरासमोरचे दोन भाग काढून टाकावेत. शेवटी दोन ओंजळी एवढी किंवा अर्धा किलो माती शिल्लक राहीपर्यंत ही प्रक्रिया करावी. विविध पिकांकरिता वेगवेगळ्या खोलीचे नमुने घ्यावेत. उदाहरणार्थ, हंगामी पिके भात, नागली, भुईमूग इत्यादी पिकांसाठी वीस ते पंचवीस सेंटीमीटर खोलीचे नमुने घ्यावेत. बागायती पिकांसाठी ३० ते ४० सेंटीमीटर, फळबाग पिकांसाठी ६० सेंटीमीटर खोलीपर्यंतचे नमुने घ्यावेत. मातीच्या नमुन्याबरोबर नमुना क्रमांक, नमुना घेतल्याची तारीख, शेतकऱ्याचे संपूर्ण नाव, शेतकऱ्याचा संपूर्ण पत्ता, नमुना किती खोलीपर्यंत घेतला त्याची माहिती, जमिनीचा उतार, जमिनीचा निचरा तसेच पुढील हंगामात घ्यावयाची पिके इत्यादी माहिती सोबत जोडावी. याप्रमाणे माहिती भरून झाल्यावर मातीचा नमुना पिशवीत भरून जवळच्या माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा. कृषी विज्ञान केंद्र आणि महाराष्ट्र शासन यांच्या माती परीक्षण प्रयोगशाळा प्रत्येक जिल्ह्यात आहेत. माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन केल्यास पिकाचे उत्पादन वाढते.

(लेखक किर्लोस कृषी विज्ञान केंद्रामध्ये संशोधक आहेत.)

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83489 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..