चिपळूण ः नरक समजून घेण्यासाठी ‘गावभवरा’ वाचायला हवं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः  नरक समजून घेण्यासाठी ‘गावभवरा’ वाचायला हवं
चिपळूण ः नरक समजून घेण्यासाठी ‘गावभवरा’ वाचायला हवं

चिपळूण ः नरक समजून घेण्यासाठी ‘गावभवरा’ वाचायला हवं

sakal_logo
By

rat2p21.jpg -
L40174
चिपळूणः श्रीराम दुर्गे यांच्या ‘गावभवरा’ या कथासंग्रहाचे प्रकाशन करताना डॉ. रेखा देशपांडे, सोबत डॉ. यतीन जाधव आदी.
------------
नरक समजून घेण्यासाठी ‘गावभवरा’ वाचायला हवं
ज्येष्ठ साहित्यिका डॉ. रेखा देशपांडे ; भटक्या लोकांच्या शोकांतिका
चिपळूण,ता. ३ ः श्रीराम दुर्गे सरांचा ‘गावभवरा’ हा कथासंग्रह वाचल्यावर नरक म्हणजे काय ते कळलं. पशुतुल्य जीवन हाही शब्द वापरता येणार नाही इतकं या लोकांचं जीवन भयावह आहे. गावकुसाबाहेरील या समाजाचं जीवन साक्षात नरक आहे. हक्काचा आश्रय नसलेली ही मंडळी अशा वस्तीत राहतात की ‘कीडे’ बरे म्हणावेत, अशी स्थिती आहे. नरक या संकल्पनेतील अंगावर शहारा आणणारी जी रौद्र, बीभत्स वर्णनं आपण ऐकतो ती सारी आपल्याला गावभवरातील कथांत आढळतात. सामान्यत: वाचवणार नाहीत अशा या कथा एक शोकांतिका आहेत. प्रचलित व्यवस्थेला प्रश्न विचारणारे काही आशेचे किरण यातील काही कथांत भेटतात. नरक संकल्पना समजून घेण्यासाठी ‘गावभवरा’ वाचायला हवं असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. रेखा देशपांडे यांनी केले.
ज्येष्ठ साहित्यिक श्रीराम दुर्गे यांच्या प्रथम स्मृतीदिन कार्यक्रमात ‘गावभवरा’ या कथासंग्रहाचे प्रकाशनप्रसंगी देशपांडे म्हणाल्या, कथासंग्रहात भेटणारे वैदू, पारधी, वासुदेव, पिंगळा, लमाणी, गोंधळी, कैकाडी, दरवेशी, मदारी, अस्वलाचे खेळ करणारे, नंदीबैलवाले, भोरपी, बहुरूपी, मसनजोगी आदी भटके लोक हे उत्तम कलाकार आहेत. गावं ओसाड पडू लागल्यावर, करमणुकीची साधनं वाढल्यावर यांचं जीवन जगण्याचं गणित बिघडत गेलं. या लोकांचं जीवन नक्की कसं आहे याचं दर्शन आपल्याला या कथासंग्रहातून घडतं.
या कथासंग्रहातील साऱ्या समाजात अंधश्रद्धा प्रचंड आहेत. यांची प्रत्येकाची स्वतंत्र संस्कृती आहे. आख्यायिका जोडलेल्या आहेत. दैवत वेगळं आहे. दैवताचे मिळणारे आदेश वेगळे आहेत. कथेतील समाजांचं सगळं आयुष्य एक शोकांतिका आहे. आजच्या काळात गाववाले या लोकांना ‘चोर’ समजतात. संग्रहातील दुष्काळाची वर्णनं आपल्याला वाचवत नाहीत. दुर्गे सरांनी भटक्या लोकांची मनात रेंगाळत राहिलेली दुःख, वेदना स्वतंत्रपणे मांडण्यासाठी ‘गावभवरा’ कथा लिहिल्यात. त्या वाचताना मन सुन्न होत जातं. अंगावर शहारे येतात.
गावकुसात राहणाऱ्या लोकांना ‘पाटीलपांडे’ म्हणतात, आपले धनी, मालक मानतात. गावकुसाच्या आत राहणाऱ्यांनी बाहेरच्यांना जगवायचं असतं. भटक्यांना गावकुसाच्या बाहेर राहणाऱ्या मातंग आणि नवबौद्ध समाजाने सांभाळायचं असतं. भटक्यांनी कोणत्याही गावात आपलं ‘पाल’ टाकण्यापूर्वी गावाच्या पोलीस पाटलांना आपण आल्याचं कळवायचं अशा स्वरुपाची मांडणी असलेलं वेगळं जग या कथासंग्रहात अनुभवायला मिळतं. गावचे पाटील देतील अशा उकिरड्यावर, गटाराच्या कडेला आदी जागांवर यांना ‘पालं’ ठोकावी लागतात. कोणत्या भटक्या समाजाने कोणत्या गावात केव्हा जायचं? किती दिवस त्या गावात राहायचं? कोणत्या गावात, कोणत्या महिन्यात कोणता कलाकर असेल? कोणत्या जाती-जमातीची ‘पालं’ पडलेली असतील याचं अलिखित वेळापत्रक आपल्याला या कथासंग्रहात भेटतं. हे सारं वंशपरंपरागत पिढ्यानपिढ्या चालत आलेलं.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83536 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top