
रत्नागिरी ः उशिरा आणि अपुरा पोषण आहार
पोषण आहार आला उशिरा अन् अपुरा
---
दामले शाळेतील प्रकार; संस्थेवर कारवाईचा इशारा
रत्नागिरी, ता. ३ : शहरातील शाळांना दुपारच्या सुटीत देण्यात येणाऱ्या पोषण आहार वितरणातील गोंधळ संपता संपेना, अशी स्थिती आहे. आज पालिकेच्या दामले विद्यालयात दुपारची सुटी संपल्यावरही पोषण आहार आला नव्हता. शाळेतील छोटी-छोटी मुले भुकेने व्याकूळ झाली होती. पोषण आहारही अपुरा असल्याने अनेक विद्यार्थी वंचित राहिले. हा प्रकार पुढे आल्यावर पालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी सुनील पाटील यांनी पोषण आहार देणाऱ्या संस्कार महिला मंडळ संस्थेवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
रत्नागिरी शहरातील सर्व शाळांना शालेय पोषण आहार वितरणासाठी तीन संस्थांची नियुक्ती केली होती. त्यांच्यामार्फत सोमवार (ता. १)पासून शालेय पोषण आहार वाटपाचे काम सुरू झाले. पहिल्याच दिवशी संस्कार महिला मंडळामार्फत शिर्के प्रशालेत विद्यार्थ्यांना न शिजलेला भात दिल्याने खळबळ उडाली होती. पालकांसह संस्थाचालक आक्रमक झाले होते. त्यानंतर दोनच दिवसांत त्याच रत्नागिरी शहरातील दामले विद्यालयात संस्कार महिला मंडळामार्फत केल्या जाणाऱ्या वितरणात गोंधळ झाला. शाळेला दोन दिवस सुटी असल्याने आज पोषण आहार पुरविण्याचा संस्थेचा पहिलाच दिवस होता. दुपारी १.२० ला शाळेची सुटी सुरू झाली. त्यापूर्वी शाळेत पोषण आहार पोचणे अपेक्षित होते. मात्र, सुटी संपली तरीही पोषण आहार पोचला नाही. चिमुकले भुकेने व्याकूळ झाले होते. पोषण आहार मिळत असल्याने विद्यार्थ्यांनी डबे आणले नव्हते. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना उपाशीपोटी राहावे लागले. दुपारी अडीचच्या सुमारास आहार शाळेत आला, तोही अपुरा होता. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना उपाशीच राहावे लागले. या घटनेची माहिती मिळताच पालिकेचे प्रशासन अधिकारी सुनील पाटील यांनी तत्काळ दामले विद्यालयात धाव घेतली. त्यांनी संस्थेला तत्काळ आहार पुरविण्याची सूचना केली. अपुऱ्या आहारामुळे अनेक विद्यार्थी वंचित राहिल्याने संस्कार महिला मंडळ संस्थेवर कारवाई करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.
चौकट
‘सिद्धिविनायक’चे काम सुरळीत
पोषण आहार वितरित करण्यात एका संस्थेकडून गोंधळ उडालेला असतानाच सिद्धिविनायक महिला बचत संस्थेकडे जबाबदारी दिलेल्या शाळांमध्ये दर्जेदार आहार वेळेत पोच होत आहे. या संस्थेने स्थानिक शहर उपजीविका केंद्रातील बचतगटांचे सहाय्य घेतल्याने साखळी व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळे प्रशासन अधिकाऱ्यांसह शाळा व्यवस्थापनाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83679 Txt Ratnagiri1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..