
सदर ः मत्स्य विक्री व्यवस्थापन
२९ जुलै टु ४ वर सदर लागले
-
rat४p१३.jpg
2L40716
ः डॉ. सुहास वासावे
........
आधुनिक मत्स्यपुराणः लोगो
.................
मत्स्य विक्री व्यवस्थापन
आपण उत्पादित केलेल्या मासळीला त्याच्या दर्जानुसार योग्य मोबदला मिळवून देणे म्हणजेच मत्स्यविक्री व्यवस्थापन होय! कोणती बाजारपेठ उपलब्ध आहे? बाजारात आपण पकडलेल्या मासळीची उलाढाल कशी चालते? मासळीची विक्री वाढवण्याकरता कसे सहभागी होऊ शकतो? हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
......
मासळीची किंमत ः आपल्या मासळीचा सुयोग्य दर मिळवण्याकरिता बाजारात त्या मासळीच्या विक्रीकरिता असलेली स्पर्धा, जास्तीत जास्त हंगामी आवक व बाजारातील मागणी आदी बाबींचा सखोल अभ्यास करणं आवश्यक आहे.
बाजारपेठ ः बाजारपेठेपर्यंत मासा पोहोचताना तो चांगल्या स्थितीत पोहोचला पाहिजे. मासा दूरच्या ठिकाणी विक्रीसाठी पाठवताना तो सुयोग्य वातावरणात ठेवणे गरजेचे आहे. सुयोग्य विक्री साखळीचा वापर केला पाहिजे. आपल्या मासळीला ज्या भागात अधिक मागणी आहे, त्या ठिकाणी नियोजित वेळेत पोहोचण्याकरिता सुदृढ विक्री व्यवस्थापन निर्माण करणे आवश्यक आहे.
ग्राहक ः ग्राहकाची गरज आणि आवड व्यवस्थित ओळखता येत असेल तर मासळीची विक्री सहजपणे होऊ शकते. काहीवेळा गुणवत्तापूर्ण व मोठ्या प्रमाणात मासा बाजारात आणला जातो. आपण पकडलेल्या मासळीला किती प्रमाणात मागणी आहे तसेच तो मासे खरेदी करणारा ग्राहक कोणता? बाजारात असलेली मागणी पूर्ण करण्याच्यादृष्टीने व ग्राहकांची गरज भागवण्याइतका मासळीचा पुरवठा होणे गरजेचे आहे.
गुणवत्ता ः आपण विक्री करत असलेला मासा जर दर्जेदार असेल तर ग्राहक तो सहजपणे खरेदी करेल. आपण मासळीची गुणवत्ता राखली नाही तर ग्राहक असा मासा खरेदी करणार नाही. त्यामुळे मासळी पकडल्यापासून ते ग्राहकाच्या हातात जाईपर्यंत शीतसाखळी अबाधित ठेवणे आवश्यक असते. ग्राहक त्याच्या पैशाचे मोल हे मासळीच्या गुणवत्तेत शोधण्याचा प्रयत्न करतो.
नफा ः कोणताही मासा विकताना उत्तम नफा मिळेल, असे उद्दिष्ट असावे. आपल्याला जास्त नफा थोड्या कालावधीसाठी जरी मिळत असला तरी तो व्यवसाय वृद्धिंगत करण्याकरिता योग्य ठरत नाही. जर व्यवसाय वाढवायचा असेल तर शाश्वत नफा मिळत राहणे आवश्यक आहे.
ग्राहकांचे समाधान ः ग्राहकाने मासा खरेदी करण्याकरिता पैसे खर्च केलेले असतात. त्यांनी खर्च केलेली किंमत त्यांना योग्य मोबदला मिळवून देत असेल, तर ग्राहकांचे समाधान होते; परंतु त्या मासळीच्या खरेदीतून अपेक्षित असलेला आनंद त्यांना मिळाला नाही तर ग्राहक समाधानी होत नाही.
विक्री साखळी ः सुयोग्य विक्री व्यवस्थापनासाठी मजबूत विक्री साखळी असणं आवश्यक आहे. जर विक्री साखळीची निवड योग्य पद्धतीने झाली नाही तर त्याचा परिणाम विक्रीवर होतो. विक्री साखळीतील प्रत्येक दुवा (मध्यस्थ) हा सक्षम, अभ्यासू, मत्स्यव्यवसायाची पूर्णपणे माहिती असलेला आणि व्यवसायवृद्धीसाठी सहकार्य करणारा असायला हवा. जर एखादा दुवा कमकुवत असेल तर त्याचा थेट परिणाम विक्री व्यवस्थापन व्यवस्थेवर होतो. त्यामुळे संपूर्ण विक्री साखळी कोलमडू शकते.
सहकारातून मत्स्य विक्री व्यवस्थापन ः मत्स्यविक्री ही एकट्याने करण्यापेक्षा ती जवळपास असणाऱ्या मच्छीमारांनी एकत्रितपणे करावी. त्यामुळे अपेक्षित दर मिळण्याकरिता मत्स्य खरेदीदारावर अपेक्षित सुविधा आणि दर मिळण्याकरिता दबाव निर्माण होईल. त्याचप्रमाणे मासे सुस्थितीत ठेवणे तसेच वाहतूक करण्याकरिता येणारा खर्च कमी होईल; परंतु यासाठी मत्स्य उत्पादकामध्ये (मच्छीमारांमध्ये) समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे.
विक्रीपश्चात सेवा ः एकदा आपण मासा विकला की, ग्राहक आणि उत्पादक यांचा संपर्क दृढ झाला पाहिजे. जर ग्राहकाला खरेदी केलेल्या मासळीबद्दल तक्रार असेल किंवा काही शंका असतील तर त्या दूर करण्याची क्षमता मासे विक्री करणाऱ्या घटकांमध्ये असणे आवश्यकता आहे. ग्राहकांच्या संपर्कात राहून विक्री केलेल्या मासळीतील त्रुटी जाणून घेणे भविष्यात मार्गदर्शक ठरतात. विक्रीपश्चात सेवा देणे हे प्रत्येक व्यवसायात त्याकरिताच अनिवार्य आहे.
(लेखक मत्स्य महाविद्यालय शिरगाव, रत्नागिरी येथे सहयोगी प्राध्यापक आहेत.)
------------------------------------
चौकट
यशस्वी मत्स्यविक्री व्यवस्थापनाची गुरूकिल्ली
•योग्य बाजारपेठेची निवड
•बाजारपेठेचा सखोल अभ्यास
•आपल्या मासळीची बाजारपेठेतील पत
•जाहिरातीत मत्स्यपदार्थांच्या गुणवत्तेवर भर
•आपला ग्राहक मिळवणे, तो टिकून ठेवणे
----------------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83882 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..