बांदा तपासणी नाका लवकरच सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांदा तपासणी नाका लवकरच सुरु
बांदा तपासणी नाका लवकरच सुरु

बांदा तपासणी नाका लवकरच सुरु

sakal_logo
By

swt४३१.jpg
४०८५३
बांदाः सटमटवाडी येथील अत्याधुनिक सीमा तपासणी नाक्याच्या परिसरात साफसफाईचे काम सुरु आहे.

swt४३०.jpg
४०८५२
बांदाः अधिकारी व कर्मचारी निवास इमारतीची रंगरंगोटी केली आहे. (छायाचित्रे ः निलेश मोरजकर)

बांदा तपासणी नाका लवकरच सुरु
१५ वर्षे वाद ः प्रलंबित कामे युध्दपातळीवर
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ४ः उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा बांदा-सटमटवाडी येथील गेली १५ वर्षे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला सीमा तपासणी नाका लवकरच सुरु होणार असल्याची माहिती येथे कार्यरत असलेल्या ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. गेले अनेक वर्षे विविध कारणांनी हा तपासणी नाका वादात सापडला होता.
राज्याच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सीमेवर अत्याधुनिक २२ तपासणी नाके उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये बांदा-सटमटवाडी येथील तपासणी नाक्याचा देखील समावेश आहे. मंजुरी मिळाल्यानंतर २००७ मध्ये प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली. मात्र, तपासणी नाक्यासाठी ३२ एकर क्षेत्र संपादित करण्यात आल्याने स्थानिक भूमिपुत्रांनी प्रचंड विरोध करत प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. प्रचंड पोलीस बंदोबस्तात व स्थानिक शेतकऱ्यांना स्थानबद्ध करत शासनाने भुसंपादन व सीमांकन प्रक्रिया पूर्ण केली. मात्र, शेतकऱ्यांचा विरोध कायम होता. नाक्याच्या परिसरात खनीज उत्खनन तसेच बेकायदा माती विक्री या विरोधात हरित लवाद व उच्च न्यायालयात शेतकऱ्यांनी याचिका दाखल केल्या होत्या. त्यामुळे सतत काही ना काही कारणांनी वादात अडकलेल्या या नाक्याचे काम गेली अनेक वर्षे रखडले होते.
महामार्गाच्या दुतर्फा दोन्ही मार्गांवर नाका उभारला आहे. यासाठी विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासासाठी संकुल उभारण्यात आले आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंसाठी दुकान गाळे उभारण्यात आले आहेत. नाका सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर सध्या याठिकाणी साफसफाई व रंगरंगोटीचे काम युद्धापातळीवर सुरु आहे. ठेकेदार कंपनीचे अधिकारी यावर सातत्याने लक्ष ठेऊन आहेत. त्यामुळे लवकरात लवकर तपासणी नाका सुरु होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

चौकट
वाहनांचे होणार डिजिटल स्कॅनिंग
या नाक्यावर आरटीओ, पोलीस, वनविभाग, उत्पादन शुल्क, महसूल, दहशतवाद विरोधी पथक तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक अशा सात विभागाचे कर्मचारी २४ तास सेवा बाजविणार आहेत. हा अत्याधुनिक तपासणी नाका असून या नाक्यावरून प्रवास करणारे प्रत्येक वाहन हे डिजिटल स्कॅनिंग होऊन बाहेर पडणार आहे. यामुळे दारू वाहतूक, अंमली पदार्थ वाहतूक याची तात्काळ माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84059 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..