पान एक-जिल्हा परिषदेचे आरक्षण पुन्हा बदलणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-जिल्हा परिषदेचे आरक्षण पुन्हा बदलणार
पान एक-जिल्हा परिषदेचे आरक्षण पुन्हा बदलणार

पान एक-जिल्हा परिषदेचे आरक्षण पुन्हा बदलणार

sakal_logo
By

जिल्हा परिषदेचे आरक्षण पुन्हा बदलणार
सदस्य संख्या मूळ पदावर ः पंचायत समितीची रचनाही पूर्वीप्रमाणे
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ४ ः महविकास आघाडी सरकारने जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य संख्या वाढविण्याचा घेतलेला निर्णय विद्यमान सरकारने रद्द करीत २०१७ च्या प्रभाग रचना व संख्येनुसार पुढील निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची सदस्य संख्या पुन्हा ५० व आठही पंचायत समितीची सदस्य संख्या १०० झाली आहे. यामुळे पुन्हा प्रभाग आरक्षण काढावे लागणार आहे. सलग दुसऱ्या वेळी अनुसूचित जातीसाठी आरक्षित झालेले ओरोस व शिरगाव हे दोन्ही जिल्हा परिषद मतदारसंघाचे आरक्षण बदलणार आहे.
लोकसंख्या वाढल्याने महविकास आघाडी सरकारने जिल्हा परिषदेसाठी कमीतकमी ५५ मतदारसंघ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याची जिल्हा परिषद सदस्य संख्या ५५ झाली होती. यापूर्वी जिल्ह्याची सदस्य संख्या ५० होती. ती पाच संख्येने वाढली आहे. परिणामी जिल्ह्यातील आठ पंचायत समितीत मिळून १० पंचायत समिती मतदारसंघ वाढले होते. या वाढलेल्या मतदारसंघासाठी जुन्या मतदारसंघांची फोड करीत नव्याने ५५ मतदारसंघ तयार केले होते. त्यानंतर त्यावर हरकत घेत जिल्हाधिकारी यांनी अंतिम यादी सुद्धा प्रसिद्ध केली होती.
५५ सदस्य संख्येसाठी प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आली होती. यामध्ये चार अनुसूचित जाती, १४ नागरिकांचा मागास प्रवर्ग, १९ सर्वसाधारण महिला असे प्रभाग आरक्षित झाले होते. त्यावर हरकती सुद्धा मागविण्यात आल्या होत्या. त्यावर सुनावणी होऊन एक दोन दिवसांत अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार होती. त्यापूर्वी राज्य शासनाने २०१७ च्या प्रभाग रचनेनुसार निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रशासनाने वाढीव पाच प्रभाग तयार करण्यापासून ते अंतिम करणे, जाहीर करणे, हरकतींवर सुनावणी घेवून अंतिम यादी जाहीर करणे तसेच प्रभाग आरक्षण सोडत काढणे यासाठी घेतलेली मेहनत वाया गेली आहे. प्रशासनाला पुन्हा आरक्षण सोडत काढावी लागणार आहे.


ओरोस, शिरगाव मतदारसंघ वगळणार
पाच गट वाढल्याने जिल्ह्यातील आठ पैकी पाच तालुक्यांतील गटात फोडाफोडी झाली होती. त्यामुळे गावे या गटातून दुसऱ्या मतदारसंघात गेली होती. यामुळे मागच्या पाच वर्षांत अनुसूचित जाती आरक्षण असतानाही सलग दुसऱ्या वेळी ओरोस व शिरगाव गटात पुन्हा तेच आरक्षण पडले होते; परंतु आता पुन्हा ५० गट राहिल्याने व २०१७ च्या प्रभाग रचनेनुसार निवडणूक होणार असल्याने नव्याने काढण्यात येणाऱ्या आरक्षणात अनुसूचित जाती राखीवमधून ओरोस व शिरगाव गट वगळले जाणार आहेत. त्यामुळे नाराज स्थानिक राजकीय पुढाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.


हुकलेली संधी मिळण्याची शक्यता
५५ मतदारसंघासाठी आरक्षण काढल्यानंतर अनेक प्रस्थापित राजकीय लोकांना दणका बसला होता. मतदारसंघ आरक्षित झाल्याने हक्काचा मतदारसंघ गमवून दुसऱ्या मतदारसंघाचा पर्याय निवडण्याची वेळ आली होती. आता पुन्हा आरक्षण सोडत निघणार आहे. त्यामुळे हुकलेली संधी अनेकांना प्राप्त होणार आहे. काहींना ५५ च्या आरक्षण सोडतीत मिळालेली संधी गमवावी लागणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84072 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..