पुरोगामी विचारांचे विनायक लक्ष्मण बर्वे तथा कवी आनंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरोगामी विचारांचे विनायक लक्ष्मण बर्वे तथा कवी आनंद
पुरोगामी विचारांचे विनायक लक्ष्मण बर्वे तथा कवी आनंद

पुरोगामी विचारांचे विनायक लक्ष्मण बर्वे तथा कवी आनंद

sakal_logo
By

इये साहित्याचिये नगरी............. लोगो

फोटो ओळी
-rat५p७.jpg-
40963
विनायक बर्वे
-rat५p८.jpg-
40964
प्रकाश देशपांडे
--------

पुरोगामी विचारांचे विनायक लक्ष्मण बर्वे तथा कवी आनंद

अपरान्त भूमीतील तिल्लोरी कुणबी बोलीला साहित्यात मानाचे पान देणारे आणि पुरोगामी विचार आणि तसेच वर्तन असलेले कोकण कवी आनंद. कवी आनंद तथा विनायक लक्ष्मण बर्वे यांचा जन्म चिपळूणला २९ नोव्हेंबर १८९६ ला झाला. वि. ल. बर्वे यांनी कविता, कथा, लघुनिबंध, कादंबरी, नाटक अशी विविधांगी साहित्यरचना केली. चिपळूणमधील तत्कालीन नामवंत वकील असलेल्या बर्वे यांनी इथल्या निसर्ग आणि जनजीवनाचे सगळे तपशील साहित्यातून व्यक्त केले. अत्यंत प्रगतीशील विचार आणि आचार हे त्यांचे वैशिष्ट्य होते.
- प्रकाश देशपांडे, चिपळूण

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना इंग्रजांनी रत्नागिरी जिल्ह्यात स्थानबद्ध केले. स्वातंत्र्यवीरांनी समाजात असलेली विषमता, अंधश्रद्धा, जातीयता यावर कठोर प्रहार केले. सहभोजनासारख्या उपक्रमातून समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. परंपरावाद्यांनी त्याला प्रखर विरोध केला. अशावेळी स्वातंत्र्यवीरांच्या चळवळीत ते सहभागी झाले. चिपळूणचे नगरशेट काशिरामशेट रेडीज यांनी सावरकरांना चिपळूणला येण्याचे निमंत्रण दिले. १ ऑक्टोबर १९३२ ला सावरकर चिपळूणला आले त्या वेळी त्यांची निवासव्यवस्था बर्वे यांच्या घरी केली होती. २ ऑक्टोबरला बाजारमारूतीच्या धर्मशाळेत सावरकरांचे ‘स्वदेशीच्या सात शृंखला’ या विषयावर भाषण झाले. सभेचे अध्यक्ष वि. ल. बर्वे होते. सभेनंतर धर्मशाळेत सावरकरांच्या समवेत विविध ज्ञातीतील सर्वांचे सहभोजन झाले. सहभोजनात सहभागी झालेल्यांवर परंपरावाद्यांनी बहिष्कार घातला. बहिष्काराला न जुमानता बर्वे पुरोगामी विचार आपल्या साहित्यातून व्यक्त करत होते.
सावरकरांप्रमाणेच विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशीसुद्धा बर्वे सहमत होते. बाबासाहेबांनी १३ एप्रिल १९२९ ला रत्नागिरी जिल्हा बहिष्कृत वर्ग परिषद घेतली. परिषदेलाही बर्वे यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला होता. त्याच रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमवेत बर्वे यांनी आपल्या घरी सर्वांचे सहभोजन आयोजित केले. बर्वे यांच्या साहित्यात त्यांच्या पुरोगामी विचारांची बैठक जाणवते. प्रेमविवाहाची तरफदारी करणारे ''माणिक एम ए'' हे नाटक ''मुचकुंद दरी'' ही ग्रामीण जीवनातील कथाव्यथा सांगणारी कादंबरी आणि ''वडाराचा संसार'', ''नंदकरी'', ''गोपाळ'' अशा कवितांमधून उपेक्षितांचे जीवन व्यक्त केले.
बर्वे यांचे सोनगाव हे गाव चिपळूणजवळचे बर्वे यांच्या खोतीचे गाव. खेड्यातले जनजीवन, तिथल्या अंधश्रद्धा, विषमता, शेतकरी आणि शेतमजुरांची सुखदुःखे त्यांनी जवळून अनुभवली होती. कोकणचा सागरकिनारा आणि नाविक जीवन यावर बर्वे यांनी लिहिलेल्या कविता यांचा शांताबार्इ शेळके यांनी गौरवाने उल्लेख केला. कवी माधवांनी तर त्यांचा ''कोकण कवी'' म्हणून सन्मान केला.
''विजा आणि मेघ'', ''कोवळी पोफळे'', ''कलमी आंबे'', ''पिसारा'' हे लघुकथा संग्रह ''लग्नमंडप'', ''माणिक एम् ए.'' ही नाटके ''आनंदाची कविता'' काव्यसंग्रह याशिवाय ''दख्खनशाही'', ''कबीर'', ''भिल्लीण'', ''मंगळसूत्र'' इ. नाटके रंगभूमीवर आली तथापी प्रकाशित झाली नाहीत. ''मुचकुंददरी'' कादंबरीपुढचा भाग त्यांनी लिहून नाशिकच्या प्रकाशकाला दिला होता. दुर्दैवाने बर्वे यांच्या निधनानंतर प्रकाशकाकडून गहाळ झाल्याने प्रसिद्ध होऊ शकला नाही. कवी माधवांनी याबाबत रेव्हरंड टिळकांचे सुपुत्र देवदत्त टिळक यांच्याशी याबाबत बराच पत्रव्यवहार केला होता.
वि. ल. बर्वे चिपळूणच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उत्साहाने भाग घेत. लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिराचे अनेक वर्षे ते अध्यक्ष होते. नेटिव्ह जनरल लायब्ररीचे नामांतर लो. टिळक स्मारक वाचनमंदिर करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने बर्वे यांच्या निवडक साहित्याचे कवीवर्य अरूण इंगवले यांनी संपादित केलेला ''आनंदाचे डोही'' हा ग्रंथ ग्रंथालयाने प्रकाशित केला. बर्वे यांची साहित्यनिर्मिती बहरात असतानाच वयाच्या ५२ व्या वर्षी २६ जानेवारी १९४८ ला निधन झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84233 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..