
Govind Pansare Murder Case : दोषारोप निश्चितीबाबत २३ ला सुनावणी
कोल्हापूर : कॉ. गोविंद पानसरे हत्येच्या तपास ‘एटीएस’कडे वर्ग झाला आहे; मात्र त्याचा लेखी आदेश अद्याप आलेला नाही. त्यामध्ये काय उल्लेख आहे, हे समजल्याशिवाय पुढील आरोप निश्चितीबाबत कामकाज चालवणे योग्य होणार नाही. त्यामुळे पुढील तारीख मिळावी, असा विनंती अर्ज सरकारपक्षातर्फे आज विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी न्यायालयात सादर केला. याला संशयितांचे वकील समीर पटवर्धन यांनाही काही मुद्दे उपस्थित करत आदेशाची वाट पाहण्यास हरकत नसल्याचे न्यायालयात सांगितले. यानंतर आरोप निश्चितीबाबत पुढील सुनावणी २३ ऑगस्टला होईल, असे जिल्हा न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पानसरे हत्याप्रकरणी १२ जणांवर गुन्हे दाखल आहेत.
पैकी दोघांचा शोध सुरू आहे. कारवाई केलेल्या दहा जणांवर दोष निश्चिती करण्यासंदर्भातील प्रक्रिया जिल्हा न्यायालयात सुरू आहे. पानसरे कुटुंबीयांनी विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) ‘एटीएस’ (दहशतवादी विरोधी पथक) कडे तपास हस्तांतरित करावा, अशी मागणी उच्च न्यायालयात केली होती. त्याला उच्च न्यायालयाने मंजुरीही दिली. गत सुनावणीवेळी न्यायालयाने सर्व संशयितांना न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज संशयित अमोल काळे, वासुदेव सूर्यवंशी, भारत कुरणे, अमित डेगवेकर, अमित बद्दी आणि गणेश मिस्कीन यांना बंगरूळ येथून तर शरद कळसकर आणि सचिन आंदुरेला पुण्यातील येरवडा कारागृहातून पोलिस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. संशयित समीर गायकवाड आणि वीरेंद्रसिंह तावडे यांना याप्रकरणी जामीन मंजूर झाला आहे. तेही या सुनावणीला हजर होते.
बंगरुळ ते कोल्हापूर अशा लांबच्या प्रवासात हातात बेड्या आणि बाजूबंद घालून आणण्यात आले. त्याचा प्रवासात त्रास होतो. या बेड्या न घालण्याबाबत संशयित अमित बद्दीने न्यायालयाकडे विनंती केली. संशयितांचे वकील पटवर्धन यांनी संशयितांना त्यांच्या नातेवाईकांना भेटण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली. न्यायालयाकडून ती देण्यात आली. त्यानुसार पोलिस बंदोबस्तात संशयितांची नातेवाईकांनी भेट घेतली. सुनावणीवेळी मेघा पानसरे, दिलीप पवार, सतीशचंद्र कांबळे उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84358 Txt Sindhudurg1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..