सिंधुदुर्गच्‍या पाऊलखुणा : ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Footprints of Sindhudurg
‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’

सिंधुदुर्गच्‍या पाऊलखुणा : ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’

बापूसाहेब महाराज साधूसंतांच्या प्रवचनात लीन व्हायचे. धार्मिक कार्याला शक्य तितका हातभार लावायचे. त्याकाळात सावंतवाडीत श्री संत गाडगेबाबांची प्रवचने व्हायची. त्यातही ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’च्या सुरात स्वतः महाराज मंत्रमुग्ध व्हायचे. ते पाहून लोकांना महाराजांच्या उच्चकोटीच्या आध्यात्मिकतेची प्रचिती यायची.

धार्मिक वृत्तीच्या बापूसाहेब महाराजांचे या क्षेत्रातील कार्य मोठे होते. त्यांनी मंदिर उभारणी किंवा तत्सम भौतिक गोष्टी उभ्या करण्यापेक्षा धार्मिकतेचा शुद्ध विचार आपल्या संस्थानात मजबूत करण्यावर भर दिला. त्यामुळे समाजप्रबोधन करणाऱ्या अनेक साधुसंतांना सावंतवाडी संस्थानचे द्वार कायम खुले असायचे. मानवतेशी जोडलेल्या धार्मिकतेला महाराजांची सढळ हातांनी साथ असायची. त्याकाळात श्री संत गाडगे महाराज गावोगाव आपल्या शिष्यांसह कीर्तन करत फिरायचे. गावात माधुकरी मागून एकवेळ अन्न घ्यायचे. मग संध्याकाळी गावातील अस्वच्छ, उकिरडा असलेली जागा साफ करायचे. गावात मासळी बाजार असेल, तर तेथे स्वतः जाऊन सफाई करायचे. ते स्वच्छता करू लागले की गावातील लोकही झाडू-खोरी घेऊन त्यांना मदत करायचे. मग अशा स्वच्छ केलेल्या जागेत रात्री कीर्तन व्हायचे.

सावंतवाडीत आल्यानंतर त्यांचे कीर्तन गाडीतळावर होत असे. गाडीतळ म्हणजे नगरपालिकेच्या इमारतीमागे (सध्या इंदिरा गांधी संकुल उभे असलेली जागा) मोठे वडाचे झाड होते. त्याला पार बांधलेला होता. सावंतवाडीत येणारे बैलगाडीवाले तेथे उतरायचे. येथेच गाडगे महाराजांचे कीर्तन होत असे. महाराजांचे कीर्तन सुरू झाले की, शहरात असतील तर बापूसाहेब महाराज आवर्जून तेथे यायचे. ते सर्वसामान्य लोकांसोबतच जमिनीवर बसायचे. अर्थात महाराजांसाठी लोड ठेवला जाई. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ असे कीर्तनाचे धृपद असायचे. तेही महाराज सगळ्या लोकांसोबत टाळ्या वाजवत तल्लीन होऊन म्हणायचे. गाडगे महाराज कोणाला आपल्या पायाला हात लावून नमस्कार करू देत नसत. यामुळे कीर्तनाच्या शेवटी ‘गोपाला गोपाला’ची धुन सुरू झाली की लोकांच्या नकळत गाडगे महाराज तेथून निघून जायचे; मात्र सरकार असले तर ते उठून जाईपर्यंत गाडगे महाराज कीर्तनातून जात नसत. त्यांच्या मागूनच जायचे.

महाराजांच्या धार्मिक वृत्तीबाबत अनेक किस्से आहेत. गोव्यातील दिगंबरदास कामत यांनी अशीच एक आठवण लिहून ठेवली आहे. यानुसार त्या काळात गोव्यात पोर्तुगीजांनी तांदळावर कंट्रोल कायदा आणला होता. यामुळे गोरगरीब सोडाच, पैसे असणाऱ्यांनाही तांदूळ विकत मिळणे कठीण बनले होते. याच काळात विचित्र तापाची साथ पसरली. त्यामुळे माणसे मरू लागली. काही सामाजिक कार्य करणाऱ्यांनी अन्नदान सुरू केले. दिगंबरदास कामत यातीलच एक. एकाक्षणी या अन्नदानासाठी त्यांना पैशांची कमतरता भासली. पैसे देणार होते त्यांनी अचानक नकार दिला. यामुळे कामत हे कवळे येथील मठाचे मठाधिश परमपूज्य गौडपादाचार्य श्रीमत्पूर्णानंद सरस्वती महाराज यांच्याकडे गेले व त्यांना विनंती केली. त्यांनी अगदी प्रेमाने कामत यांना १०१ रुपये दिले. हे पैसे चार-सहा महिन्यांत परत देण्याचे वचन कामत यांनी महाराजांना दिले; मात्र यानंतर ते दहा महिने झाले तरी पैसे जमवू शकले नाहीत. याचवेळी त्यांना एक स्वप्न पडले. त्याचा अर्थ लावत ते आधी वेंगुर्ले आणि तेथून बापूसाहेब महाराजांच्या भेटीला सावंतवाडीत आले.

ओळखदेख नसताना महाराज इतके पैसे देतील, असा विश्‍वास कामत यांनाही नव्हता. तरीही ते एक दिवस राजवाड्यात गेले. अत्यंत साधा वेश परिधान केलेल्या कामत यांचे महाराजांनी प्रसन्न मुद्रेने स्वागत केले. महाराजांना त्यांनी आपल्याला माझ्यासाठी किती वेळ आहे, असा प्रश्‍न विचारला. यावर महाराजांनी केवळ पंधरा मिनिटे असल्याचे सांगितले; मात्र कामत यांच्या संभाषणाने ते प्रभावीत झाले. त्यांनी सांगितलेली काही वाक्ये महाराजांनी वहीत लिहून ठेवली. बराचवेळ झाल्यानंतर कामत यांनी सगळा प्रसंग सांगत शंभर रुपयांची मदत मागितली. महाराजांनी कौन्सिल मेंबरकडे हे मांडून दोन दिवसांत कळवतो, असे सांगितले. कौन्सिलमध्ये आपली ओळख नाही. तुमच्या खासगीतून मिळतील तर बरे होईल, असे कामत म्हणाले. दुसऱ्याच दिवशी महाराजांनी कामत यांना त्यांनी मागितलेले पैसे पाठवून दिले.

राजा आणि प्रजेतील समानतेचे नाते
आणखी एक प्रसंग बेळगावच्या नि. ना. देशपांडे यांनी लिहून ठेवला आहे. एकदा ते पंढरपूरच्या आषाढी यात्रेला चालले होते. यावेळी बेळगाव स्टेशनवर बापूसाहेब महाराजही पंढरपूरला जाण्यासाठी आल्याचे त्यांना कळले. चौकशी करायला ते प्लॅटफॉर्मकडे गेले असता अतिशय साध्या वेशात महाराज तेथे फिरत असलेले त्यांना दिसले. ओळख नसणाऱ्यांना ते अगदी सर्वसामान्य प्रवासीच वाटले असतील. देशपांडे यांनी त्यांना अभिवादन केले. महाराजांनी हसतमुखाने ते स्वीकारले. पंढरपूरला संस्थानमधील आणखी कोणकोण मंडळी चालली आहेत, असे विचारले.

आपला तेथे उतरण्याचा पत्ता देत भेटायला यायला सांगितले. यानंतर रेल्वे निघाली. बेळगावपासून मिरजेपर्यंत जास्त काळ थांबणाऱ्या स्टेशनवर महाराज उतरून संस्थानमधील यात्रेकरूंची अगत्याने चौकशी करत होते. श्री. देशपांडे व इतर यात्रेकरू पंढरपुरात महाराजांना भेटायला त्यांच्या मुक्काम असलेल्या ठिकाणी गेले. तेथे त्यांचा पांढराशुभ्र वेश, कपाळी लावलेला बुका, चेहऱ्यावरची प्रसन्नता पाहून सगळेजण मुग्ध झाले. त्यांनी सगळ्यांना खाली बसवून स्वतःही समोर बसले. यानंतर संस्थानातील धार्मिक चळवळीबाबत चर्चा केली. राजा आणि प्रजा यांच्यातील हे समानतेचे नाते या यात्रेकरूंनी पंढरपुरात अनुभवले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84585 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..