
मूल्यांकनाअभावी ३१ खातेदार वंचित
मूल्यांकनाअभावी भरपाई मिळेना
चौपदरीकरणाचीही कामे थांबली, कणकवलीतील ३१ प्रकल्पग्रस्त वंचित
कणकवली, ता.६ : महामार्ग चौपदरीकरणांतर्गत कणकवली तालुक्यात ३१ खातेदारांना अजूनही त्यांच्या जागेचा मोबदला मिळालेला नाही. या खातेदारांना जागा संपादन करत असल्याच्या नोटिसा देण्यात आल्या; मात्र त्या जागा मालकांचे बाधित होणारे एकूण क्षेत्र, त्यातील मालमत्ता, झाडे आदींचे मूल्यांकन झालेले नाही. हे मूल्यांकन करणाऱ्या विभागांना प्रांताधिकारी कार्यालयातून वारंवार स्मरणपत्रे पाठविण्यात आली; मात्र मूल्यांकनाची कार्यवाही होत नसल्याने कणकवली तालुक्यातील ३१ खातेदार अजूनही मोबदल्यापासून वंचित आहेत. तसेच मोबदला मिळत नसल्याने अनेक ठिकाणचे सेवा रस्ते, एका बाजूची मार्गिका, गटारे, फुटपाथ आदींची कामे थांबल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
महामार्ग चौपदरीकरणात अनेक गावांमध्ये मिसिंग प्लॉट राहिले. या जागा मालकांना मोबदला मिळाला नसल्याने कणकवली शहरालगतच्या वागदे गावातील एका मार्गिकेचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. याखेरीज साकेडी, नांदगाव या भागातील सेवा रस्ते देखील रखडले आहेत. कणकवली तालुक्यात अजूनही ३१ खातेदारांचे प्लॉट अजूनही मिसिंग आहेत. यात कणकवली शहरातील ३, वागदे गावातील ५ आणि ओसरगाव मधील २३ खातेदारांचा समावेश आहे.
३१ खातेदारांना प्रांताधिकारी कार्यालयाकडून भू-संपादनाच्या नोटिसा आल्या आहेत; मात्र बाधित क्षेत्राची मोजणी प्रक्रिया, बाधित क्षेत्रामध्ये येणारी फळझाडे, जंगली झाले, कच्ची आणि पक्की बांधकामे, विहिर, नळयोजना आदींची नोंद घेऊन त्यांचे मूल्यांकन होण्याची प्रक्रिया शिल्लक आहे. भूमी अभिलेख विभाग, वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणी पुरवठा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या खात्यांनी बाधित होणाऱ्या क्षेत्राचे मूल्यांकन करायचे आहे.
----------
प्रांताधिकारी कार्यालयाच्या मते...
मूल्यांकनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रांताधिकारी कार्यालयाकडून हा अहवाल राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे सोपवला जाणार आहे. तर मूल्यांकनाला केंद्र शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर भूमीराशी पोर्टल मार्फत निवाड्याची रक्कम थेट खातेदारांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. मिसिंग प्लॉट जमीन मालकांची जागा आणि त्या जागेत असणाऱ्या मालमत्तांचे मूल्यांकन करून द्यावे यासाठी संबधित खात्यांना अनेकदा पत्रे पाठविली; मात्र या खात्यांकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती प्रांताधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.
--
कोट
महामार्ग चौपदरीकरणासाठी आमची जागा संपादीत झाल्याची नोटिस भूसंपादन विभागाकडून पाठविण्यात आली. बँकेची कागदपत्रेही मागविली. तसेच मोबदला रक्कम थेट खात्यावर जमा होईल असेही सांगितले. तीन महिन्यांपासून बँकेत फेऱ्या मारतोय; पण अद्यापही मोबदला रक्कम जमा झाली नाही.
- सखाराम घाडीगावकर, प्रकल्पग्रस्त, वागदे
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84591 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..