
‘घरोघरी तिरंगा’चे पणदुरात नियोजन
41164
पणदूर ः ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ अंतर्गत विविध उपक्रमांचे नियोजन करताना सरपंच दादा साईल व इतर.
‘घरोघरी तिरंगा’चे पणदुरात नियोजन
ग्रामसभेस प्रतिसाद; प्रभात फेरी, वृक्षारोपणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ६ ः ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ अंतर्गत ‘स्वराज्य महोत्सव’ व ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रम पणदूर गावात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत, सर्व ग्रामस्थ आणि शासकीय, निमशासकीय, सहकार तसेच खासगी क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित सूक्ष्म नियोजन करून याबाबत विविधस्तरावर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सरपंच दादा साईल यांनी ही माहिती दिली.
हे उपक्रम पणदूर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात उत्साहात यशस्वी करण्यासाठी सभा घेण्यात आली. या सभेत गावातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत ‘स्वराज्य महोत्सव’ आणि १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘घरोघरी तिरंगा’ उत्सव साजरा करण्यासाठी नियोजन केले. सोमवारी (ता.८) विशेष ग्रामसभा घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात येईल. मंगळवारी (ता.९) समूह राष्ट्रगानमध्ये सकाळी अकराला एकाच वेळी राष्ट्रगीत गायन होईल. त्यामध्ये गावातील सर्व ग्रामस्थ, विद्यार्थी, शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होतील. त्याचप्रमाणे शाळांमध्ये आणि गावामध्ये गावातील स्वातंत्र्यसैनिकांचे सत्कार आणि मार्गदर्शन होईल. बुधवारी (ता.१०) विद्यार्थी, युवक मंडळे, महिला मंडळे आणि ग्रामपंचायतीच्यावतीने गावात स्वच्छता मोहीम आखली आहे. अंगणवाडी आणि शाळांमध्ये महिला मेळावा होईल. गुरुवारी (ता.११) महिला बचतगट मार्गदर्शन तसेच संपूर्ण गावाचा व राष्ट्राचा इतिहास जाणून घेण्यासाठी गावातील विद्यार्थी ज्येष्ठांकडून माहिती गोळा करतील. शुक्रवारी (ता.१२) शाळा, महाविद्यालय आणि ग्रामपंचायतीत ‘मोबाईलचे दुष्परिणाम’ यावर मार्गदर्शन व चर्चा, त्याचप्रमाणे जिल्हा बँकेमार्फत अर्थ साक्षरता विषयक मार्गदर्शन शिबिर होईल. शनिवारी (१३) ‘गोपाळांची पंगत’ हा कार्यक्रम गावातील अंगणवाड्यांमध्ये होईल. सेंद्रिय शेती आणि शेतकरी मेळावा मार्गदर्शन ग्रामपंचायतीमध्ये होईल. रविवारी (ता.१४) ‘पर्यावरण संवर्धन व शपथ’ हा कार्यक्रम ग्रामपंचायतीमध्ये होईल. ज्येष्ठ आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या हस्ते सार्वजनिक स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यात येईल. सोमवारी (ता.१५) सकाळी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी व त्यानंतर गावातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण होईल. युवक-युवती व विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा होतील. मंगळवारी (ता.१६)अंगणवाडी आणि शाळांमध्ये किशोरी मिळावे आणि देशभक्तीपर, सांस्कृतिक कार्यक्रमाने या कार्यक्रमाचा समारोप ग्रामपंचायतीमध्ये होईल.
यावेळी उपसरपंच बबन पणदूरकर यांनी आभार मानले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुविधा सावंत, अनघा गोडकर, अंकिता राऊळ, मयुरी पणदूरकर, आबा सावंत, ग्रामसेवक सपना मसगे, चंद्रकांत साईल, डॉ. संभाजी शिंदे, नरेश परब, निखिल सोनार, विरेंद्र गोसावी, तलाठी श्वेता दळवी, श्री. धामणकर, निकिता साळुंखे, सुमन कदम, प्रियांका खरात, प्रणया सावंत, रेश्मा पणदूरकर, दीक्षा साईल, मंगेश परब, धोंडी सुर्वे, संतोष जाधव, रोहित मायणीकर, व्ही. आर. धर्णे, एम. एन. गोसावी, शाम गोसावी आदी उपस्थित होते.
--
चौकट
ग्रामस्थांना आवाहन
गुणवंत विद्यार्थी, कर्मचाऱ्यांचा सत्कार तसेच गावातील दहावी आणि बारावी उत्तीर्ण, विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार होईल. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमात सर्व घरांवर राष्ट्रध्वजाचा मान व सन्मान राखून तिरंगा ध्वज फडकावण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत. कसलाच अनुचित प्रकार न घडता सर्व कार्यक्रम यशस्वी करावेत, असे आवाहन सरपंच साईल, पोलिसपाटील देऊ सावंत यांनी केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84592 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..