दीपक केसरकरांना आवरा, राणे समर्थकांची फडणवीसांकडे मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deepak Kesarkar vs Narayan Rane
कणकवली : तेली प्रेस

दीपक केसरकरांना आवरा, राणे समर्थकांची फडणवीसांकडे मागणी

कणकवली - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर आमच्या नेत्‍यांबाबत बेताल वक्तव्ये करत आहेत. त्‍यामुळे त्‍यांच्या वक्तव्यावर आवर घालावा, अशी मागणी जिल्‍हा भाजपच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे, अशी माहिती भाजप जिल्‍हाध्यक्ष राजन तेली यांनी आज दिली.

येथील भाजप कार्यालयात श्री. तेली यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बबलू सावंत उपस्थित होते. तेली म्‍हणाले, ‘केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात केसरकर हे आरोप करत आहेत. राज्‍यात युतीची सत्ता आल्‍यानंतर गरज नसतानाही ते अनेक विषयांवर बोलत आहेत. वस्तुत: राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर हजारो कोटींची कामे शिंदे गटाच्या अनेक आमदारांनी आपल्या मतदारसंघात नेली. केसरकरांना त्यापैकी एकही रुपयाचा निधी जिल्ह्यात किंवा मतदारसंघात आणता आला नाही. त्यामुळे आपले अपयश लपवण्यासाठी केसरकर राणेंवर आरोप करत आहेत.’

श्री. तेली म्हणाले, ‘आमच्या नेत्‍यांनी काय बोलावे काय करावे, याचे अधिकार त्यांना आहेत. त्यांच्यावर बोलणारे तुम्ही कोण? केसरकर यांनी स्वतःच्या मतदारसंघात जनतेने साधे स्वागतही केले नाही, याचे आत्मपरीक्षण करावे. शिंदे गटातील ३९ आमदारांचे भव्य स्वागत आणि जाहीर मेळावे त्याच्या जिह्यात झालेत. केसरकर हे एकमेव व्यक्ती आहेत की त्यांचे मतदारसंघात स्वागतही झाले नाही.’

तिरंगा ध्वज विक्रीत भ्रष्‍टाचार

राज्‍यात ग्रामपंचायतींना पंचवीस रुपयेप्रमाणे तिरंगा ध्वजाची विक्री केली, तर सिंधुदुर्गातील ग्रामपंचायतींना तीस रुपये या दराने ध्वज विकला जात आहे. त्‍यामुळे प्रत्‍येक ध्वजामागे पाच रुपयांचा भ्रष्‍टाचार होत आहे. सिंधुदुर्गात अडीच लाख झेंडे एका एजन्सीमार्फत पुरवले जाणार आहेत. त्‍यामुळे यात लाखोंचा भ्रष्‍टाचार झाला असून, त्‍याची चौकशी करावी,’ अशी मागणी जिल्‍हाधिकाऱ्यांकडे केल्याचे श्री. तेली म्‍हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84596 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..