
गुहागर ः नांगरणी स्पर्धेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल
नांगरणी स्पर्धेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल
झोंबडीतील घटना; वाद झाल्याने स्पर्धा अर्ध्यावर रद्द
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. ६ ः तालुक्यातील झोंबडी येथे काळभैरव ग्रामस्थ मंडळातर्फे भात लावणी व नांगरणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी परवानगी घेतलेली नसल्याने गुहागर पोलिसांनी समीर तावडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याची तक्रार मनोहर दत्ताराम चाळके (रा. सती चिंचघरी, चिपळूण) यांनी गुहागर पोलिस ठाण्यात दिली होती.
५ ऑगस्टला झोंबडी येथे काळभैरव ग्रामस्थ मंडळातर्फे भात लावणी व नांगरणी स्पर्धेचे आयोजन समीर तावडे यांनी केले होते. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला होता. सुमारे ५० बैलजोड्या घेऊन शेतकरी या स्पर्धेसाठी झोंबडीमध्ये उपस्थित होते. स्पर्धेच्या उद्घाटनासाठी भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू, गुहागर तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे आदी आले होते. स्पर्धेदरम्यान सहभाग घेण्यावरून स्पर्धकांमध्येच वादावादी झाली. त्यामुळे ही स्पर्धा कोणत्याही निर्णयाविना अर्ध्यावरच रद्द करावी लागली.
दरम्यान, स्पर्धा पाहण्यासाठी आलेले मनोहर चाळके यांनी आयोजक समीर तावडे यांच्याकडे नांगरणी स्पर्धेकरिता शासनाची परवानगी घेतली आहे का, याची चौकशी केली. ही परवानगी घेतलेली नसल्याने चाळके यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात संपर्क साधला. त्यानंतर चिपळूणचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. हे घटनास्थळ गुहागर पोलिस कार्यक्षेत्रात येत असल्याने चाळके यांना सोबत घेऊन चिपळूण पोलिस गुहागर पोलिस ठाण्यात आले. तेथे मनोहर चाळके यांनी तक्रार दिली.
...
चौकट
वेदना होतील, अशा पद्धतीने पळवले..
तक्रारीत चाळके यांनी म्हटले आहे की, शासनाची परवानगी न घेता व मनाई आदेश असताना नांगरणी स्पर्धेचे आयोजन समीर तावडे यांनी केले होते. याद्वारे बैलांना नांगरासह चिखलात त्रास होईल, अशा पद्धतीने पळण्यासाठी मैदात तयार करण्यात आले होते. या मैदानात बैलांना नांगराला जुंपून यातना व वेदना होतील, अशा पद्धतीने पळवण्यात आले. म्हणून समीर तावडे व इतरांविरुद्ध आपण तक्रार करत आहोत. या तक्रारीनंतर प्राण्यांना निर्दयतेने वागवणे या प्रतिबंधात्मक अधिनियमाखाली समीर तावडेंवर गुहागर पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
-----------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84672 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..