
क्राईम पट्टा
नागावेतील घरातून मोबाईलची चोरी
चिपळूण ः नागावे येथे घरातून अज्ञात चोरट्याने मोबाईल चोरल्याची घटना ५ ऑगस्टला घडली. याबाबत प्रगती संजय शिरसाट यांनी अलोरे शिरगाव पोलिस ठाण्यात खबर दिली. शिरसाट या नागावे येथे शासकीय कॉलनीमध्ये राहतात. त्यांच्या घराच्या खिडकीतून हात घालून कोणीतरी सुमारे १६ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरल्याचे त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.
----------------
ओखा एक्स्प्रेसमधून पर्सची चोरी
चिपळूण ः कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या ओखा एक्स्प्रेसमधून १९ जुलैला चोरट्याने किशोरभाई गांधी यांची पर्स चोरली. त्यात असलेला ३७ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. सावर्डे येथे ही गाडी क्रॉंसिंगसाठी थांबली होती. त्या वेळी हा प्रकार घडला. गांधी यांच्या पर्समध्ये ८ हजार रुपये रोख रक्कम आणि दोन मोबाईल होते तसेच ३ ग्रॅम वजनाची चैन होती.
-------------
एसटीतील प्रवाशाचा मोबाईल पळवला
चिपळूण ः मुंबई-गोवा महामार्गावरून एसटीने प्रवास करणारे नीलेश सखाराम सुखी यांचा २० हजाराचा मोबाईल चोरट्याने चोरी केला. नीलेश सुखी हे ५ ऑगस्टला वालोपे रेल्वे स्थानकावर उतरले. तेथून ते एसटीने चिपळूणकडे येण्यासाठी प्रवास करत असताना त्यांचा मोबाईल चोरीला गेला.
-------------
वाहतुकीला अडथळा; स्वारावर गुन्हा
चिपळूण ः तालुक्यातील शिरगाव येथील नाक्यात वाहतुकीला अडथळा होईल, अशाप्रकारे दुचाकी उभी करणाऱे संकेत अनंत सोलकर (वय. ३२, रा. शिरगाव, सोलकरवाडी) यांच्यावर शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ५ ऑगस्टला शिरगाव नाक्यात त्यांनी वाहतुकीला अडथळा होईल अशाप्रकारे आपली दुचाकी उभी केली होती म्हणून पोलिस कर्मचारी अशोक पवार यांनी ही कारवाई केली.
---------
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी स्वारावर गुन्हा
रत्नागिरी ः बेदरकारपणे दुचाकी चालवून अपघात करत पाठीमागे बसलेल्या महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. या प्रकरणी चालकाविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २७ जुलैला सायंकाळी ७ वाजता चाफेरी गवळीवाडी रस्त्याच्या अलीकडे घडली होती. सुलतान मुहम्मद डिंगणकर (५५, रा. जांभारी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. या अपघातात मेहराज यासिन डिंगणकर (४५, रा. जांभारी, रत्नागिरी) यांचा मृत्यू झाला होता. २७ जुलैला सुलतान आपल्या ताब्यात दुचाकीवरून (एमएच-४६-वाय-९९६९) मेहराज डिंगणकरला सोबत घेऊन जयगड ते खंडाळा असा भरधाव जात होता. तो चाफेरी गवळीवाडी रस्त्याच्या अलीकडे आला असता कुत्रा आडवा आल्याने सुलतानने गाडीचा ब्रेक लावला. अचानक ब्रेक लावल्याने गाडी घसरून हा अपघात झाला होता. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कळेकर करत आहेत.
-------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84673 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..