संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

झारापला दुकान,
हॉटेलमध्ये चोरी
कुडाळ ः झाराप तिठ्यानजीकच्या किराणा मालाचे दुकान, हॉटेल फोडून चोरट्याने रोख ८७५० रुपयांची चोरी केली. तसेच चार एटीएम कार्ड लंपास केली. ही घटना सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास निदर्शनास आली. याबाबतची फिर्याद सिद्धेश आवळेगावकर यांनी येथील पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. झाराप तिठ्यापासून काही अंतरावर रेल्वे स्टेशन रस्त्यालगत झाराप सामंतवाडी येथे महादेव होडावडेकर यांच्या मालकीच्या एका गाळ्यात आवळेगावकर यांचा जनरल स्टोअर्स तसेच होडावडेकर यांचे हॉटेल आहे. कुडाळचे पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. हवालदार एस. एन. टाकेकर व हनुमंत धोत्रे यांनी पंचनामा केला. अधिक तपास धोत्रे करत आहेत.
---------------------
पेंडुरसाठी कंत्राटी वायरमनची नियुक्ती
मालवण ः गेली अनेक वर्षे पेंडुर गावात महावितरणचा एकच कंत्राटी कर्मचारी कार्यरत होता. गावाची भौगोलिक रचना मोठी असल्याने एकच कर्मचारी लोकांना सेवा योग्य प्रकारे देऊ शकत नव्हता. वीज समस्या निर्माण झाल्यास ती वेळेत सोडविली जात नव्हती. यासाठी गेले अनेक महिने पेंडुर सोसायटीचे माजी चेअरमन सतीश पाटील पाठपुरावा करत होते. कर्मचारी उपलब्ध व्हावा, यासाठी कंत्राटी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांनी माजी खासदार नीलेश राणे यांच्याकडे मागणी केली होती. वीज वितरण ठेकेदार कंपनीने ती मान्य करून दीपक वायंगणकर यांची पेंडुर गावात कंत्राटी कामगार म्हणून नियुक्ती केली. याबाबतचे कंपनीकडून प्राप्त झालेले नियुक्तीपत्र राणे यांच्या हस्ते वायंगणकर यांना देण्यात आले. अशोक सावंत, वित्त व बांधकामचे माजी सभापती संतोष साठविलकर, संजू परब, दादा साईल आदी उपस्थित होते.
-----------------
कणकवलीत १३ ला चित्रकला स्पर्धा
कणकवली ः व्यापारी संघ कणकवलीतर्फे चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन १३ ऑगस्टला सकाळी ९.३० वाजता प. पू. भालचंद्र महाराज संस्थानातील सभागृहात प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार रमेश पवार, नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. ही स्पर्धा पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशी दोन गटात होणार आहे. गट एकसाठी ''शाळेच्या प्रांगणातील ध्वजारोहणाचा प्रसंग'', गट २ साठी ''स्वातंत्र्य लढ्यातील कोणताही एक प्रसंग'' हा विषय आहे. इच्छुक स्पर्धकांनी १० ऑगस्टपर्यंत प्रसाद राणे, राजेश राजाध्यक्ष यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर यांनी केले आहे.
----------------
सांगेलीत १४ ला रक्तदान शिबिर
ओटवणेः भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त सांगेली माजी विद्यार्थी संघटना आणि सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ला सांगेली केंद्रशाळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात पडवे येथील लाईफटाइम हॉस्पिटल रक्तपेढीच्यावतीने रक्त संकलन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
..

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85630 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..