‘मोहन तोंडवळकर’ नावाचं ‘कलावैभव’! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘मोहन तोंडवळकर’ नावाचं ‘कलावैभव’!
‘मोहन तोंडवळकर’ नावाचं ‘कलावैभव’!

‘मोहन तोंडवळकर’ नावाचं ‘कलावैभव’!

sakal_logo
By

नाट्यनिपुण सिंधुदुर्ग (फॉरमॅट ३ आॅगस्टला सिंधु टुडे तीनवरून घ्या)
---------------

42094
श्रीनिवास नार्वेकर

‘मोहन तोंडवळकर’
नावाचं ‘कलावैभव’!

मोहन तोंडवळकर (नाट्यवर्तुळात मोहनशेठ) नाव घेतलं की एकाहून एक सरस नाटकं आपल्या डोळ्यांसमोर उभी राहतात. त्या नाटकांमधून मोहनशेठनी मराठी रंगभूमीला दिलेले अनेक कलावंत, जे नंतर प्रचंड नामवंत झाले, आपल्या डोळ्यांसमोर येतात. मोहन तोंडवळकर हे नाव आणि त्यांची ‘कलावैभव’ नाट्यसंस्था मराठी रंगभूमीवरली मैलाचा दगड असूनही त्याचा कधीही अहंभाव न बाळगणारे मोहनशेठ! असे मोहन तोंडवळकर आपल्या सिंधुदुर्गातले आहेत, हे आपले परमभाग्य!
- श्रीनिवास नार्वेकर
.................
तोंडवळकर मालवणातल्या रेवंडीतले. वडिलांकडून मिळालेलं नाटकाचं बाळकडू त्यांनी आयुष्यभर पुरवलं. मालवणी माणसाच्या रक्तातच नाटक असतं. हे रक्तात असलेलं नाटकच तोंडवळकरांना नाट्यव्यवसायाकडे घेऊन गेलं. सुरुवातीला कंत्राटावर नाटकं घ्यायला सुरुवात करून नंतर ते स्वत: नाट्यनिर्माते बनले. निर्माते बनल्यानंतरही त्यांनी केवळ पैशांकडे लक्ष न देता खर्‍या अर्थाने दर्जेदार आणि मराठी रंगभूमीला ललामभूत ठरलेली नाटकं दिली. त्यांनी निर्मिती केलेल्या किती म्हणून नाटकांची नावं घ्यावीत? काचेचा चंद्र, पुरुष, महासागर, बॅरिस्टर, एक हट्टी मुलगी, नातीगोती, लग्नाची बेडी, गेला माधव कुणीकडे, नयन तुझे जादुगार, प्रेमा, तुझा रंग कसा, हिमालयाची सावली, वाडा चिरेबंदी, छूमंतर, अपूर्णांक, जास्वंदी, मला उत्तर हवंय, माणसाला डंख मातीचा, सावित्री, दुसरा सामना, पर्याय, वन रुम किचन, कार्टी काळजात घुसली, प्रासंगिक करार... यातली बहुतेक नाटकं चाकोरीबाहेरची आहेत. ‘ताई-भाऊची नाटकं करण्यात मला स्वारस्य नाही,’ असे ते म्हणायचे. विक्रम गोखले, नाना पाटेकर, मधुकर तोरडमल यांच्यासारखे अनेक कलाकार ‘कलावैभव’च्या नाटकांमधून व्यावसायिक रंगभूमीवर स्थिरावले आणि या सर्वांनीच नाट्य-चित्रपटसृष्टीत आपलं राज्य निर्माण केलं. अन्य कुणी निर्माता सहजासहजी वळणार नाही, अशी अनवट नाटकं तोंडवळकरांनी निर्माता म्हणून केली. दर्जा आणि व्यवसाय याचं नेमकं गणित त्यांच्यामध्ये मुरलेलं होतं. व्यवसाय होत नसेल, तर स्वत:ला आवडणारं नाटकही त्यांनी जबरदस्तीने चालवलं नाही; पण नाटकाच्या (आणि काही अंशी चोख व्यवसायाच्याही) प्रचंड आवडीपायी नोकरीत असताना तोंडवळकरांनी चक्क मित्रांकडून, सहकार्‍यांकडून कर्जाऊ पैसे घेऊन नाटकांची निर्मिती केली. अर्थात, घेतलेल्या पैशांचा तोंडवळकरांचा व्यवहारही चोख असल्यामुळे त्याबाबतीत त्यांना कधीही अडचण आली नाही की नामुष्कीची वेळ आली नाही. उत्तम वाचन असलेला निर्माता असं नेहमीच तोंडवळकरांच्या बाबतीत म्हटलं जातं. कोणीही नवीन लेखक समोर आला की त्यांचा प्रश्‍न असायचाच, काय वाचतोयस सध्या? कोणत्याही संहितेचं वाचन सुरु असतानाच ते नाटक त्यांना ‘कळायचं’ आणि तेव्हाच हे नाटक करायचं की नाही, याबद्दलचा त्यांचा निर्णय व्हायचा. जयवंत दळवी-विजय तेंडुलकरांपासून राजीव शिंदे, योगेश सोमणपर्यंत आणि विजया मेहतांपासून संतोष पवारपर्यंत लेखक-दिग्दर्शकांना आजमावून पाहणारा हा निर्माता. राज्य नाट्य स्पर्धा नेमाने पाहणारा आणि त्या स्पर्धांमधून गुण ओळखून लेखक-दिग्दर्शक-कलाकार उचलणारा हा निर्माता. धंदेवाईक पध्दतीने नाटक न करता उत्तम, दर्जेदार नाटक अधिकाधिक व्यावसायिक पध्दतीने कसं करता येईल, याकडे काळजीपूर्वक लक्ष देणारा निर्माता!
ताज्या दमाच्या नव्या लेखक-दिग्दर्शक-कलाकारांकडे त्यांचं लक्ष असे. किरण पोत्रेकर, योगेश सोमण या नव्या लेखकांची नाटकं त्यांनी केली. कानेटकरांचं ''छूमंतर'' त्यांनी नंतर संतोष पवारला दिग्दर्शक म्हणून घेऊन केलं. अमोल कोल्हे अभिनीत ''शंभुराजे''चं दिग्दर्शन त्यांनी अनिल गवसकडे सोपवलं. नव्या लोकांवर विश्‍वास टाकून त्यांना त्यांच्या पध्दतीने काम करू दिलं तोंडवळकरांनी. ''पल्लवी अॅडव्हर्टायझिंग'' ही त्यांची जाहिरात संस्था. या संस्थांद्वारे वर्तमानपत्रांना दिल्या जाणार्‍या जाहिरातींवरचं कमिशन त्या संस्थांना मिळतं; पण स्वत:ची जाहिरात संस्था असूनही पहिल्या काही प्रयोगांसाठी केलेल्या मोठ्या जाहिरातींनंतर ''कलावैभव''च्या नाटकांची जाहिरात सिंगल कॉलमवर येई. एकदा लोकांना नाटक कळलं की मग मोठ्या जाहिरातींची काय गरज, असा त्यांचा मुद्दा असायचा. त्यांच्या पंच्याहत्तरीच्या निमित्ताने अरुण घाडीगावकर आणि रामविजय परब यांनी ''मोहनशेठ'' या पुस्तकाचं संपादन केलं. त्यामध्ये मराठी रंगभूमीवरल्या दिग्गजांनी तोंडवळकरांबद्दल लिहीलं आहे. या निमित्ताने खरं तर मोहन तोंडवळकर आणि कलावैभव या दोन संस्थांचं दस्तावेजीकरण झालं आहे, ही फार समाधानाची बाब आहे. हा लेख आज १० ऑगस्टला प्रकाशित होतोय. बारा वर्षांपूर्वी परवाच्या ६ ऑगस्टलाच मोहन तोंडवळकर गेले, तेव्हा मराठी रंगभूमीवरलं आणखी एक पर्व संपल्याचं मी लिहीलं होतं. मार्च २०१० ते जानेवारी २०११ या एकाच वर्षाच्या काळात मराठी रंगभूमीला वैभव प्राप्त करून देणारे तीन बिनीचे शिलेदार आपल्यातून निघून गेले, मोहन वाघ, मोहन तोंडवळकर आणि प्रभाकर पणशीकर! मराठी रंगभूमी खर्‍या अर्थाने पोरकी झाली. ''मोहन तोंडवळकर'' नावाचं ''कलावैभव'' आजच्या पिढीला पाहता आलं नाही, याचं वाईट वाटणं आहेच, पण त्यांची ''नजर'' असलेला ''नाटकवाला निर्माता''ही आज दुर्मिळ आहे, हेही तितकंच खरं आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85664 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..