चिपळूण ः महात्मा गांधींच्या चलेजाव आंदोलनात चिपळूणचा सहभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः महात्मा गांधींच्या चलेजाव आंदोलनात चिपळूणचा सहभाग
चिपळूण ः महात्मा गांधींच्या चलेजाव आंदोलनात चिपळूणचा सहभाग

चिपळूण ः महात्मा गांधींच्या चलेजाव आंदोलनात चिपळूणचा सहभाग

sakal_logo
By

स्वातंत्र्यलढ्यातील चिपळूणची सुवर्णपाने ................लोगो
........
इंट्रो
येत्या १५ ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात कोकणचे वेगळे स्थान आहे. ९ ऑगस्ट १९४२ ला महात्मा गांधी यांनी इंग्रजांच्या विरोधात चले जाव तसेच करेंगे या मरेंगेचा नारा दिला होता. त्या आंदोलनात चिपळूणचा सहभाग मोठा होता. येथील २३ देशभक्त स्वातंत्र्यसैनिकांच्या विरोधात खटला चालवण्यात आला. त्यांना शिक्षाही झाली. या जाज्वल्य इतिहासातील सुवर्णपाने ठरावीत, अशा काही घटना, प्रसंगाचा जागर इतिहास अभ्यासक प्रकाश देशपांडे करत आहेत.याबाबतच्या मालिकेतील हा पहिला भाग.
- मुझफ्फर खान, चिपळूण
-----------------------
पोलिस विरूध्द स्वातंत्र्यसैनिक असा रोमहर्षक संघर्ष

चिपळुणात चलेजाव; काँग्रेसच्या २३ कार्यकर्त्यांना अटक

चिपळूण, ता. १३ ः चिपळूण तालुक्यातील जनतेने स्वातंत्र्य समरात दिलेले योगदानही लक्षणीय आहे. १९३० ला झालेल्या मिठाच्या सत्याग्रहात चिपळूण तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिक सहभागी झाले होते. त्यांनी कारावासही सहन केला. ९ ऑगस्ट १९४२ ला महात्माजींनी इंग्रजांविरुद्ध ''चले जाव'' आणि ''करेंगे या मरेंगे'' हा स्फूर्तिदायी मंत्र दिला. मुंबईच्या गवालिया टॅंक मैदानातून या आंदोलनाची सुरवात झाली. देशभर या आंदोलनाचा वणवा पेटला. एक हजाराहून अधिक देशभक्त प्राणाला मुकले. अनेकजण लाठीहल्ल्यात जखमी झाले. चिपळूण शहरही या आंदोलनात हिरीरिने सहभागी झाले.
याबाबत माहिती देताना देशपांडे यानी सांगितले, ७ सप्टेंबर १९४२ ला चिपळूण शहरात मिरवणूक काढण्यात आली. गांधीचौकात तत्कालीन काँग्रेसने शांतारामभाऊ तांबट यांचे भाषण झाले. पोलिसांनी शांतारामभाऊंना अटक केली आणि त्यानंतर पोलिस आणि स्वातंत्र्यसैनिक यांचा रोमहर्षक संघर्ष झाला. ९ ऑगस्ट १९४२ ला बॉम्बे सरकारने मुंबई इलाख्यात सार्वत्रिक मिरवणूक काढण्यास मनाई करणारे नोटिफिकेशन प्रसिद्ध केले होते; मात्र चिपळूणच्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारी नोटिफिकेशनचा भंग करणारी सार्वत्रिक मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला. म्हणून पोलिस अधिकाऱ्यांनी गांधीचौकात काही पोलिस कॉन्स्टेबल्सना उभे केले. गांधीचौक हा काँग्रेसच्यादृष्टीने लोकांच्या चळवळीचा मुख्य केंद्र बनला होता.
७ सप्टेंबर १९४२ ला पोलिस गांधीचौकात उभे असताना हेलेकर नाक्यातून मिरवणूक गांधीचौकात आली. तेथे शांताराम नावाच्या माणसाने युद्धविरोधी भाषण दिल्याने त्यांना अटक करण्यात आली. हेडकॉन्स्टेबल कृष्णाजी याने मिरवणूक काढणाऱ्यांना तेथून जाण्यास सांगितले. मिरवणूक काढणारे तेथून हेलेकर नाक्यात गेले. तेथून पुन्हा मारवाडी गल्ली, भेंडीनाका गल्लीतून मिरवणूक काढून ते गांधीचौकात आले. तेथे पोलिस आणि मिरवणूक काढणारे यांच्यात दंगल झाली. मिरवणुकीत सामील असणाऱ्यानी पोलिसांवर हल्ला चढवला. त्यांना खूप मारले. बऱ्याचजणांच्या टोप्या, चपला, काठ्या गायब झाल्या होत्या. विशेष म्हणजे पुढे ज्यांनी १९६३ ला काही दिवसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषवले त्या (कै.) पी. के . सावंत यांचे वडील कृष्णाजी सावंत हे त्या वेळी पोलिस हेडकॉस्टेबल होते. या संघर्षात त्यांना व त्यांच्यासमवेत असलेल्या पोलिसांना मारहाण झाली होती, अशी माहिती देऊन देशपांडे यानी सांगितले की, पोलिसांनी या घटनेतील आरोपींची शाहनिशा करून काँग्रेसच्या २३ कार्यकर्त्यांना अटक केली आणि त्यांना न्यायालयात नेण्यात आले.
----------------------------------
चौकट
पंधराजणांना केले मुक्त
जिल्हा न्यायालयात ही केस गेली तेव्हा एन. एम. मियाभाय हे न्यायाधीश होते. न्यायालयात झालेल्या या खटल्यात पंधराजणांना मुक्त करण्यात आले. देशभक्त ज्ञानू बळवंत देशमुख, सीताराम भिकू कन्हाळ, गोपाळ लक्ष्मण लवेकर, नारायण रामचंद्र वेल्हाळ, रामकृष्ण महादेव गांधी, अनंत नारायण हटकर, सदाशिव विठ्ठल शेट्ये, रामकृष्ण सखाराम रेडी यांना शिक्षा झाली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86881 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..