पाऊलखुणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाऊलखुणा
पाऊलखुणा

पाऊलखुणा

sakal_logo
By

पाऊलखुणा ः भाग - ८१
-----
43131
श्री सद्गुरू साटम महाराज
--

साटम महाराजांशी बापूसाहेब महाराजांचे जुळले नाते

लिड
बापूसाहेब महाराज यांच्या धार्मिक जीवनातील सुवर्णपान म्हणजेच दाणोलीचे सद्गुरू साटम महाराज यांच्याशी त्यांचे जुळलेले नाते. साटम महाराज हे अवलिया म्हणून ओळखले जायचे. महाराजांची त्यांच्यावर निस्सीम श्रद्धा होती. साटम महाराजांच्या भेटीपासून पुढे आयुष्यभर त्यांच्या भक्तिरसात महाराज न्हाऊन निघाले. या नात्याचा बंध सविस्तर समजून घेण्याचा हा प्रयत्न.
--------------------
सिंधुदुर्गाच्या धार्मिक विश्‍वात भालचंद्र महाराज, राऊळ महाराज, टेंब्ये स्वामी, साटम महाराज आदींची नावे अग्रक्रमाने घेतली जातात. साटम महाराज हे बापूसाहेब महाराजांचे समकालीन. त्यांचे जीवनचरित्र अनेक चमत्कारांनी भारलेले आहे. बापूसाहेब महाराज यांच्याशी असलेला गुरु-शिष्याचा ऋणानुबंध हा या सत्पुरुषाच्या चरित्रातील महत्त्वाचा भाग म्हणता येईल. साटम महाराजांचे मुळ नाव शंकर नारायण साटम. त्यांचा जन्म मसुरे-कोहीळ (ता. मालवण) येथे १८७२ ते ७७ च्या दरम्यान झाला. वडील नारायण आणि आई लक्ष्मी यांना शिवभक्तीनंतर झालेला हा द्वितीय पुत्र. त्यामुळे त्यांचे नाव शंकर ठेवले गेले. मुलं थोडी मोठी झाल्यानंतर त्यांचे आई-वडील पोटापाण्यासाठी मुंबईत गेले. पुढे मोठे झाल्यानंतर साटम महाराजांचे लग्न लावून देण्यात आले. त्यांच्या पत्नीचे नाव काशिबाई. महाराज मात्र धार्मिक गोष्टींकडे झुकले होते. त्यांचे संसारात लक्ष लागत नव्हते. यातच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. यामुळे ते मनाने खचले. त्या पाठोपाठ प्लेगने त्यांचा भाऊ व भावजय देवाघरी गेली. त्यामुळे महाराजांचे संसारातील लक्षच उडाले. त्यांच्या या अवस्थेमुळे पत्नीही माहेरी निघून गेली. महाराजांची मनस्थिती विमनस्क झाली. ते इकडे-तिकडे भटकू लागले. यातच त्यांची भेट एका नागपंथी सिद्ध पुरुषाशी झाली. त्यांच्या सहवासात महाराजांची कुंडलीही शक्ती जागृत झाली. ते मुंबई बाहेर पडून भटकू लागले. अन्न, वस्त्र, निवाऱ्याचे भान हरवले. ते फिरत फिरत १९९०च्या दरम्यान सावंतवाडीत आले. १९१४ पर्यंत ते शहरातील गाडीतळ परिसरात फिरायचे. कधी कधी भिक्षा मागायचे. डोक्यावर जटाभार वाढला होता. सुरुवातीला लोक त्यांना वेडे समजायचे. हळूहळू त्यांच्यातील दैवी शक्तीची प्रचिती लोकांना येऊ लागली. १९१४ ते १९१६ च्या दरम्यान ते सावंतवाडीहून दाणोलीत येऊन राहिले. त्यांच्यातील अद्भूत शक्तीची जाणीव एव्हाना लोकांना येऊ लागली होती. हळूहळू त्यांची कीर्ती वाढू लागली. ते दाणोलीत बाबा मेस्त्री यांच्या घरी राहू लागले.
बापूसाहेब महाराज आणि साटम महाराजांची भेट १९२२ च्या दरम्यान झाली. या बाबत नेमकी माहिती उपलब्ध नसली तरी मौखिक माहितीनुसार याबाबतचा प्रसंग सांगितला जातो. हा काळ बापूसाहेब महाराजांसाठी ब्रिटिशांशी कायदेशीर संघर्षाचा होता. राज्याधिकार मिळविण्यासाठी ते प्रयत्न करत होते. असेच एकदा ते दिल्लीला जाण्यासाठी निघाले होते. सरकारांची स्वारी मोटारीतून दाणोलीमार्गे पुढे जात होती. दाणोलीत एक अर्धनग्न व्यक्ती गाडीपुढे आडवा आला. त्याच्या एका हातात लाकडी सोटा होता व दुसऱ्या हातात नारळाची करवंटी. महाराजांची गाडी अडवणे ही तशी मोठी गोष्ट होती. महाराजांना सुरुवातीला तो वेडा वाटला. बाजूला जाईपर्यंत त्यांनी गाडी थांबवली. तो थोडा दूर जाताच पुन्हा सुरू केली. मग तो पुन्हा गाडीसमोर आला. परत परत हा प्रकार घडत होता. गाडीत महाराजांसोबत चिटणीस होते. त्यांना खाली उतरून चौकशी करायला सांगितले. तिथल्या लोकांनी तो अवलिया आहे, असे सांगितले. सरकारांनी गाडी पुन्हा चालू केली. यावेळी ती व्यक्ती गाडीसमोर आडवा आली आणि हाताने गाडीचा मार्ग अडवत म्हणाला, ‘दिल्लीला पळतोस कशाला? तुझं ताट वाड्यावर निवून चाललं आहे.’ या उद्गारांनी महाराज आश्‍चर्यचकित झाले. ते दिल्लीला जाणार हे ठराविक लोकांनाच माहीत होते. या अवलियाला कसे कळले? हा प्रश्‍न त्यांना पडला. त्यांनी गाडी फिरवली. पुन्हा राजवाड्यात आले. ते जी कागदपत्र आणण्यासाठी दिल्लीला जाणार होते, ती काही वेळापूर्वीच राजवाड्यात पोहोचली होती. या गोष्टीने महाराज प्रभावित झाले. त्या क्षणापासून ते साटम महाराजांचे भक्त बनले. पुढे साटम महाराजांचे भक्त वाढत गेले. बापूसाहेब महाराजच नाहीत, तर राणीसाहेब व पूर्ण कुटुंबच त्यांचे भक्त बनले. उत्सवाला तसेच सुख-दुखःच्या प्रसंगी ते साटम महाराजांच्या भेटीला जायचे. या दोघांमध्ये एक वेगळेच पवित्र नाते तयार झाले.
बापूसाहेब महाराज बेळगाव-आंबोलीहून जाता-येता कायम साटम महाराजांचे दर्शन घ्यायचे. तेथील आश्रमावर नजर टाकून जायचे. साटम महाराजांच्या आश्रमात एकदा दोन अनोळखी बायका घुटमळताना महाराजांना दिसल्या. त्या महाराजांच्या सेवेसाठी आल्याचे सांगत होत्या. साटम महाराज अवलिया अवस्थेत असायचे. कोणी सोन्याची अंगठी दिली तर कौतुकाने बोटात घालायचे आणि तेथेच कोणालातरी देऊन टाकायचे. कधी गादीवर लोळत, तर कधी तापलेल्या वाळूत उघड्या अंगाने झोपत. कोणी पाया पडायला गेला, तर श्रीमुखात मारून हाकलून लावीत; पण मार खालेल्यांचे पुढे चांगले होते. त्यामुळे तो आशीर्वाद असल्याचे भाविक मानत. लोक नारळ, पेढे, फुले, उदबत्त्या वाहत. तेथे अचानक आलेल्या या बायका हळूहळू कारभार आपल्याकडे सरकवू लागल्या. बापूसाहेब महाराजांना त्यांच्या वर्तणुकीचा संशय आला. त्यांनी सावंतवाडीत आल्यावर मुख्य पोलिस अधिकारी शेखबाबा यांना बोलावून त्या बायकांची चौकशी करायला सांगितली. चौकशीत त्या मुंबई, पुण्यात राहून अनेकांना टोप्या घालून येथे आल्याचे स्पष्ट झाले. महाराजांनी त्यांना लगेच हाकलून दिले. महाराज गुरु पूजनाला दाणोलीत जात. सर्व भक्तांसोबत ‘रामकृष्ण हरी’ हे भजन म्हणत. साटम महाराजांशी त्यांचे खूप दृढ असे नाते तयार झाले होते.
----------------
चौकट
ज्ञानेश्‍वरीशी नाते
बापूसाहेब महाराज ज्ञानदेवांचे भक्त होते. त्यांना ज्ञानेश्‍वरीचा मोठा छंद होता. पाटील नावाचे एक गृहस्थ सरकारी नोकरीत होते. त्यांनाही ज्ञानेश्‍वरीचा छंद होता. ते ज्ञानेश्‍वरीचा अर्थ चिकित्सक पद्धतीने सांगत असत. महाराजांचा मुक्काम सावंतवाडीत असला तर ते वेळ काढून मंगळवार किंवा शुक्रवारी सायंकाळी श्री. पाटील यांच्याकडे येऊन ज्ञानेश्‍वरी समजून घेत. काझी शहाबुद्दीन सभागृहाच्या मागे एक सरकारी बंगला होता. तो त्यांना राहण्यासाठी दिला होता. ज्ञानेश्‍वरीप्रमाणे तुकारामांचे अभंग, एकनाथ, नामदेवांचे अभंग तसेच दासबोध याचे वाचन ते करायचे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87020 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..