आता लढाई कोकणच्या विकासासाठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आता लढाई कोकणच्या विकासासाठी
आता लढाई कोकणच्या विकासासाठी

आता लढाई कोकणच्या विकासासाठी

sakal_logo
By

43139
सावंतवाडी ः येथे शनिवारी मंत्री दीपक केसरकर यांचा नागरी सत्कार करताना माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप. शेजारी अॅड. सुभाष पणदूरकर, खेमसावंत-भोसले.

पुढील लढाई कोकणच्या विकासासाठी
दीपक केसरकर : सावंतवाडी येथे नागरी सत्कार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता १३ : आम्ही तत्त्वासाठी राजकारण करू शकतो, तर विकासासाठी पदही सोडू शकतो. त्यामुळे या पुढची माझी लढाई ही कोकणच्या विकासासाठी असेल आणि हा विकास कोकणपुरता मर्यादित न राहता राज्यभर असेल, अशी ग्वाही नवनिर्वाचित मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.
महाराष्ट्रातील बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची लढाई कुठेतरी संपली म्हणून शिवसेनेचे दोन भाग झाले; मात्र आजही आम्ही शिवसेनेतच आहोत. जे कोण आरोप करतात ते खोटे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आम्ही एकत्र आहोत. त्यामुळे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आम्ही उभी केलेली तत्त्वाची लढाई लढू आणि जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मंत्रिपदी शपथ घेतल्यानंतर केसरकर यांचा येथील गांधी चौक येथे नागरी समितीतर्फे नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मंत्री केसरकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष अॅड. सुभाष पणदूरकर, संस्थानचे राजे खेमसावंत-भोसले, माजी केंद्रीय कायदा न्यायमंत्री अॅड. रमाकांत खलप, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, अॅड. दिलीप नार्वेकर, अनारोजीन लोबो, राजन पोकळे, अशोक दळवी, भारती मोरे, गजानन नाटेकर, बाबू कुडतरकर, जगदीश मांजरेकर, बबन राणे, गणेशप्रसाद गवस, प्रकाश बिद्रे, राजू निंबाळकर आदी उपस्थित होते.
मंत्री केसरकर पुढे म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यानंतर केवळ बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारामुळे आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रेमळ स्वभावामुळे मी राष्ट्रीय पक्षाची ऑफर झुगारून शिवसेनेत गेलो. माझे नेतृत्व संघर्षातून उभे झाले. संघर्षातूनच पुढे मी आमदार आणि मंत्री झालो. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर बाळासाहेबांच्या स्वप्नातील लढाई मी लढलो आणि खऱ्या अर्थाने जिंकलोही; मात्र आज जे मी शिवसेना सोडली म्हणून आरोप करत आहेत, ते चुकीचे आहेत. कुठेतरी बाळासाहेबांची हिंदुत्वाची लढाई थांबल्याने आम्ही शिवसेना सोडली. आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो नाही तर आजही शिवसेनेतच आहोत. मला आज मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रिपद दिले. त्याचा उपयोग जिल्ह्याचा व कोकणचा कायापालट करण्यासाठी करेन. माझी लढाई कोकणच्या विकासासाठी असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने तसेच भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये असलेल्या ऐक्याने बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी प्रयत्न करेन.’’
ते म्हणाले, ‘‘कोकणातील शेतकरी, महिला, बेरोजगारांच्या हाताला रोजगार मिळण्यासाठी माझी धडपड असेल. ही लढाई राजकीय नसून कोकणच्या विकासासाठी आहे. नम्रता ही सावंतवाडीची संस्कृती आहे. ही नम्रता कायम ठेवून जिल्ह्याचा व राज्याचा विकास करेन.’’
माजी केंद्रीय मंत्री खलप म्हणाले, ‘‘गोव्यातील भविष्यातील समस्यांचा विचार करता सिंधुदुर्ग पर्यायाने कोकणचा विकास होणे आवश्यक आहे. आज केसरकर यांच्या रूपाने सिंधुदुर्गला कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. त्यामुळे ही जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. केसरकर यांच्या बोलण्यामध्ये कधीच गर्व नसतो. कोकणाने अनेक नवरत्ने दिली आहेत, त्यापैकीच एक केसरकर आहेत. त्यांनी कोकणासाठी दिलेल्या योगदानाचे फलित म्हणून त्यांच्या गळ्यात मंत्रिपद आले आहे. त्यांच्याकडे हृदयाचा संवाद साधण्याची असलेली कला भविष्यात त्यांना मुख्यमंत्रिपदापर्यंत घेऊन जाईल."
यावेळी खेमसावंत-भोसले, ॲड. दिलीप नार्वेकर, विकास सावंत यांनी केसरकर यांना मिळालेल्या मंत्रिपदाचा गौरव करत त्यांना भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या नागरी सत्काराला सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित झाले होते. भर पावसातही नागरिकांनी केसरकरांचे विचार ऐकले. यावेळी ॲड. नीता सावंत, आबा केसरकर, नंदू गावडे, नंदू शिरोडकर, चंद्रकांत नाईक, कीर्ती बोंद्रे, शर्वरी धारगळकर, माधुरी वाडकर, अन्नपूर्णा कोरगावरकर, शुभांगी सुकी, सुरेंद्र बांदेकर, सुरेश बागवे, प्रा. दिनेश नागवेकर, विनायक दळवी, मंगेश तळवणेकर, बाळा शिरसाट, विनया बाड, सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई, कुणकेरी सरपंच विश्राम सावंत, नाणोस सरपंच जीजी जोशी, रोणापाल सरपंच सुरेश गावडे, देवसू सरपंच अब्जू सावंत, नारायण हिराप, शैलेश नाईक, संजय पेडणेकर, शिवानी पटेकर, अभिजित मेस्त्री, बाळ बोर्डेकर, रमेश बोद्रे, संजय पांगम, देव्या सूर्याजी आदींसह मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87031 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..