सदर ः खाद्यसंस्कृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सदर ः खाद्यसंस्कृती
सदर ः खाद्यसंस्कृती

सदर ः खाद्यसंस्कृती

sakal_logo
By

टुडे २ वा पा २
....
-rat14p1.jpg
43167
ः राजीव लिमये.
----------
इंट्रो
लोणचं म्हटलं की, तोंडाला पाणी सुटणार नाही, असा माणूस असेल का? वजन आणि कोलेस्टेरॉलची काळजी करण्याच्या जमान्यातही लोणचं खाण्याचा मोह टाळणे कठीणच आहे. डाव्या बाजूला पानात असलेले लालजर्द लोणचेच पहिली नजर वेधून घेते. पारंपरिक पानं वाढण्याच्या शास्त्रात लिंबू, दही वाढल्यानंतर लगेच मान येतो तो लोणच्याचा. आंब्याचे वैपुल्य असणाऱ्या आपल्या कोकणात सर्व आर्थिक स्तरात लोणचे तितकेच प्रिय आहे. केवळ जेवणातच नव्हे तर न्याहरीतही लोणच्याचे स्थान अढळ आहे.
........................
-राजीव लिमये, कर्ले- रत्नागिरी
------------------------------------------
लोणच्यात लोणचे आंब्याचे ः त्याची कहाणी!

शेतावरच्या न्याहरीतील फोडणीच्या भाताबरोबरची आंब्याच्या लोणच्याची फोड असो किंवा आजारपणात मऊ भाताबरोबरची लिंबाच्या लोणच्याची फोड असो लोणच्यांचे स्थान आपल्या आहारात पक्के आहे. एकवेळ भाजी नसेल तरी चालेल, अशावेळी लोणच्याबरोबर भात किंवा अगदी पोळी किंवा भाकरी चविष्ट लागते. लोणची अशाच अडचणीच्या वेळी, घरात हुकुमी उपलब्ध असतात. बाजारात, शॉपीजमध्ये मोठ्या प्रमाणावर येणारी राजस्थानी लोणची तात्पुरती चविष्ट भासली तरी त्यांच्या विशिष्ट तेलांच्या वापरामुळे पुन्हा घरच्या लोणच्यांकडेच आपण वळतो.
आपल्याकडे, कोकणात लोणचं घालायची जुनी परंपरा आहे. ग्रामीण संस्कृतीत तर लोणचं विकतही नसत तर त्याची देवाणघेवाणच केली जायची. ग्रामीण कृषी संस्कृतीत अजूनही ती प्रथा अव्याहत आहे. पावसाळ्यात शेतात कामे करणाऱ्या पैऱ्यांना दुपारी लोणचे द्यायची रीत आहे अजूनही! अगदी मच्छीमार समाजात, कष्टकरी समाजातही आंब्याचे लोणचे प्रिय आहे. आंब्याच्या फोडींना नुसते मीठ अन् हळद लावून बरणीत ठेवायचे आणि पाहिजे तेव्हा त्यात मसाला घालून फोडणी देऊन लोणचे करायचीही व्यावसायिक पद्धत उपयुक्त आहे. राजापूर तालुक्यातून कच्चे आंबे पूर्वीपासून खास पद्धतीने बंद करून सर्वत्र पाठवले जातात, लोणच्यासाठी. आंब्याचे गोडे लोणचे फारसे टिकावू नसले तरी हंगामात ताटात असतेच. आंब्याच्या हंगामाच्या सुरवातीला तात्पुरत्या वापरासाठी घातलेल्या कैरीच्या लोणच्याची चव आगळीच असते. पडीच्या आंब्यांचे तुकडे उन्हात वाळवून केलेल्या आंबोशीचे गोडसर लोणचेही वैविध्यात भर घालते.
बेगमीसाठीचे, निवडक, जून आंब्याचे लोणचे मे महिन्याच्या अखेरीला घालायची पद्धत आहे. किंबहुना आपल्याकडे पहिला पाऊस पडल्यावरच असे लोणचे घालतात. लोणचे घालायला विशिष्ट झाडाच्या रायवळ आंब्याला प्रथम पसंती दिली जाते. महाग असल्याने असेल बहुतेक; पण कोकणात लोणचे घालताना तेलही हात राखून वापरले जायचे. माझ्या वडिलांना त्यांच्या आजोळचेच असे पारंपरिक पद्धतीने घातलेले लोणचे खूप आवडायचे. ते खातांना कदाचित त्यांना त्यांच्या आजीची, पणजीची सय येत असावी. अशा पदार्थांसोबतचे भावनिक बंध दडलेले असतात. गावातील अनेक घरांतून वर्षानुवर्षाच्या अनुभवाने कोणत्या झाडाचे आंबे लोणच्यासाठी वापरायचे ते ठरलेले असते. आता अशी रायवळची झाडेही दुर्मिळ होत चालली आहेत म्हणा. अर्थात हापूस आंब्याचेही लोणचे चांगले होते, असा अनुभव आहे. आंब्याच्या करकरीत फोडी, लालभडक तिखट, मीठ, पिवळीजर्द मोहरीच्या डाळीची पावडर आणि खारं तयार होण्यासाठी तळलेली मेथीची पावडर अन् त्यावर पूर्ण थंड करून घातलेली तेला-हिंगाची भरपूर फोडणी या सर्वांच्या साहचर्यातून टिकाऊ अन रूचकर लोणचे जन्माला येते. लोणचे टिकण्यासाठी वापरायचे मीठ त्यातील बाष्प उडण्यासाठी किंचित भाजून घेतात. फोडणीचे प्रमाण सांगायचे तर बरणीतील लोणच्यावर अर्धा इंच वर तेलाचा थर यायलाच हवा, असे अनुभवी गृहिणी सांगतात. लोणचे घालून झाले की, ते फिरकीची झाकणे असलेल्या मोठ्या आकाराच्या चिनी मातीच्या बरण्यांत, बरणीच्या तोंडाला फडक्याचे दादरे बांधून अंधाऱ्या थंड तापमानाच्या बेगमीच्या खोलीत नीट ठेवले जाते. दररोजच्या वापरासाठी घरातली मोठी स्त्री सकाळच्या वेळी आंघोळ झाल्यावर या बरण्यातून साताठ दिवसांसाठी पुरेल एव्हढेच लोणचे काढून ठेवत असे. लोणचे टिकवण्यासाठीची अनावश्यक हाताळणी टाळणारी, स्वच्छतेची आणि काळजी घेण्यासाठी ही पद्धत असावी. प्रत्येक गृहिणीने केलेल्या लोणच्याची एक वेगळी अशी चव असतेच. घरच्या मंडळींनी असो किंवा पाहुणे मंडळींनी लोणच्याची स्तुती केली की, गृहिणीचे मन सुखावत असते. मग त्या पाहुण्यांना आठवणीने छोट्या बरणीत लोणचे भेट म्हणून आवर्जून दिले जाते. पूर्वी कोकणात मुंबईचे चाकरमानी भाऊ मे महिन्यात आले की, परत जाताना हटकून वर्षभरासाठीचे लोणचे घेऊन जात असत. अर्थात, जमलेल्या सगळ्या नणंदा-जावा, सासूच्या मार्गदर्शनाखाली एकोप्याने घरच्या आंब्याचे लोणचे घालीत असल्याच्या हृद्य आठवणी अनेकांच्या असतील. अशा एकत्रित कुटुंबांच्या कथा आता दुर्मिळ झाल्या असल्या तरी अजूनही अशा प्रथा कोकणातील अनेक घरांत आहेत. या सर्वांमध्ये जीवनातील एक प्रकारची गोडी असते. ती चव, ती गोडीच त्या पदार्थामध्ये उतरत असेल ना बहुतेक. तर अशी ही आंब्याच्या लोणच्याची कहाणी सुफळ संपूर्ण!!
-------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87097 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..