सिंधुदुर्गातील भाजी मार्केटचे अर्थकारण परजिल्ह्याच्या हातात..! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

economy of vegetable market in Sindhudurga is in hands of others
भाजीचे अर्थकारण परजिल्ह्याच्या हातात

सिंधुदुर्गातील भाजी मार्केटचे अर्थकारण परजिल्ह्याच्या हातात..!

कणकवली : सिंधुदुर्गातील आठवड्याला जवळपास पंचवीस लाख उलाढालीचा भाजी व्यवसाय परजिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या हातात गेला आहे. स्थानिक बेरोजगारांची या व्यवसायाबाबतची अनास्था, कष्ट करण्याच्या मर्यादा आणि नियोजनाच्या अभावामुळे रोजगाराची संधी असलेले हे मोठे क्षेत्र स्थानिकांपासून दूर आहे.जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ ही नित्याचा भाग आहे. राजकीय परिस्थिती किती बदलली तरी जगाच्या बाजारावर देशाच्या आर्थिक उलाढालीचा वेग अवलंबून असतो. त्यामुळे सातत्याने जीवनावश्यक वस्तूंची दर वाढ ही होतच असते. अलीकडच्या कालावधीत त्यात जीएसटीची भर पडली आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये दरवाढ झाली आहे. याचा थोडाफार परिणाम बाजारपेठेच्या तेजीमंदीवर जाणवतो. मात्र भाजी सारख्या अत्यावश्यक गरजेचे मार्केट कधीच मंदीत नसते. त्यामुळे जिल्ह्यात भाजी व्यापाराला मोठी संधी आहे.

जिल्ह्यात ब्रिटिश काळात किनारपट्टी भागात बाजारपेठा भरत होत्या. सह्याद्री पट्ट्यांमध्ये थेट घरापर्यंत जाऊन व्यापार केला जात असे. हळूहळू बाजारपेठा स्थिरावू लागल्या आणि सत्तरच्या दशकामध्ये आठवडा बाजार या संकल्पना सुरू झाल्या. त्या काळामध्ये ग्रामपंचायत स्तरावरती आठवडा बाजार भरवला जात असे. कालांतराने नगरपालिका अस्तित्वात आल्या. त्यानंतर भाजी मार्केट ही संकल्पना आली. पण, शहरी भागांमधल्या ग्रामपंचायतीने भाजी मार्केट ही संकल्पना अस्तित्वात आणून तेथे भाजी व्यवसायिकांना जागा उपलब्ध करून दिल्या. अशाच पद्धतीने स्थानिक बाजारपेठांमध्ये आठवडा बाजार ही संकल्पना रुजू झाली. आठवड्या बाजारात बेळगाव आणि कोल्हापूर येथून भाजी व्यापारी आपले बस्तान मांडत राहिले. हळूहळू कर्नाटकी राज्यातील बेळगाव परिसरातील अनेक तरुण सिंधुदुर्गाच्या विविध बाजारपेठांमध्ये स्थायिक झाले. आज जिल्ह्याचा विचार करता तब्बल ८० टक्के भाजी व्यावसायिक हे कर्नाटक राज्यातील आहेत. ते जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील बाजारपेठांमध्ये स्थायिक झाले आहेत.

बेळगाव आणि कोल्हापूर, सांगली जिल्ह्यावरच इथला भाजीपुरवठा अवलंबून आहे. परंतु, या व्यवसायाकडे जिल्ह्यातील तरुणांनी म्हणावा तसा लक्ष दिलेला नाही. त्यामुळे परजिल्ह्यातील आणि परराज्यातील व्यापाऱ्यांच्या हातात हा व्यवसाय आहे. जिल्ह्याच्या आठही तालुक्यात आणि त्या तालुक्यातील पंचक्रोशी स्तरावर आठवडा बाजार तसेच दैनंदिन बाजारात मोठ्या प्रमाणात भाजीची विक्री होते. यासाठी बेळगाव भाजी मार्केटमधून साधारण दोडामार्ग, सावंतवाडी आणि वेंगुर्ले या तीन तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भाजी पुरवठा होतो. कोल्हापूर, सांगली, वडगाव या भागातील भाजीचा पुरवठा हा कणकवली, देवगड, वैभववाडी, मालवण आणि कुडाळ तालुक्यांमध्ये होतो. ही सगळी उलाढाल आणि नित्याची आहे. जिल्ह्याच्या आठ तालुक्याचा विचार करता सरासरी दहा ट्रक भाजी आठवड्याला विकली जाते. आजच्या बाजारभावाप्रमाणे एक ट्रक भाजी ही जवळपास अडीच लाख रुपये किमतीची असते. असे दहा ट्रक आठवड्यामध्ये जिल्ह्याच्या विविध बाजारपेठांमध्ये भाजी उतरवत असतात. हा सगळा दलाल आणि एजन्सीचा व्यापार असून यामध्ये स्थानिकांचा मात्र समावेश अत्यल्प आहे. बेळगाव मार्केटमधून नियमित भाजी खरेदी करून ती जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये विक्री करणारे तरुण हे सर्रास कर्नाटक राज्यातील आहेत. त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून भाजी व्यवसायामध्ये आपला पाय रोवला आहे. त्यात स्थानिक बेरोजगारांनी किंवा व्यापाऱ्यांचा यात फारसा लक्ष नसल्याचे चित्र आजवर तरी आहे.

अशी होते भाजी खरेदी
बेळगाव येथे मोठी भाजी मंडई आहे. येथे भाजीचे दर तेथील शेतकरी सोसायटी निश्चित करत असते. येथे सर्व व्यवहार हे थेटपणे भाजी मंडईत केले जातात. कर्नाटक राज्यातील भाजीचे उत्पादनाची बहुतांशी विक्री ही बेळगाव भाजी मार्केटमधून होते. त्यामुळे तेथे दर हा इतर भाजी मार्केट पेक्षा कमी येतो. कर्नाटकातील व्यापारी हे थेटपणे घाऊक भाजी खरेदी करून ती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विकतात. यासाठी तेथे आठवड्यातून तीन वेळा भाजी खरेदी करून ती जिल्ह्याच्या विविध कानाकोपऱ्यात पोहोचवली जाते.

कोल्हापूरचे मार्केट
कोल्हापूर जिल्ह्यात निपाणी, भुदर्गड, वडगाव आणि सांगली येथे भाजी विक्रीची मोठी मंडई आहे. येथे कृषी उत्पन्न बाजार समिती भाजीचे दर दररोज निश्चित करत असतात. पुरवठा आणि मागणीच्या आधारावरती तेथे दर निश्चित होतात. मात्र, हे करत असताना तेथील एजन्सीला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे नोंदणीकृत बाजार समितीची एजन्सी भाजीचा दर निश्चित करून तो घाऊक विक्रेत्यांना देत असतात. हे विक्रेते जिल्ह्यातील विविध बाजारपेठांमध्ये भाजी पोचवत असतात.

व्यवसायातील मक्तेदारी
जिल्ह्यात भाजी व्यापार हा आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचला आहे. कोरोनाच्या कालखंडानंतर घरपोच सेवेमुळे भाजी व्यापारीचे विस्तारीकरण झाले आहे. त्याचा परिणाम शहरातील भाजी विक्रेत्यांवर होऊ लागला आहे. आता ग्रामीण भागांमध्ये काही तरुण आणि काही कुटुंबे भाडीच्या व्यवसायामध्ये उतरली आहेत. मात्र, हे सगळे व्यावसायिक कर्नाटकातीलच घाऊक विक्रेत्यांकडून भाजी खरेदी करून ते गावामध्ये विकत आहेत. परप्रांतीयांनी या भाजी व्यापारावर जिल्ह्यात आपले चांगले बस्तान मांडले आहे. अशा कर्नाटकी कुंटुंबीयांनी अनेक वाहने भाजी व्यवसायासाठी खरेदी केली आहेत. जिल्ह्यात काही कुंटुंबे कायमची स्थाकिय झाली आहेत. त्यामुळे या भाजी व्यापाऱात त्यांची मक्तेदारी आहे.

गणेशोत्सवात मोठी उलाढाल
सिंधुदुर्ग जिल्ह्यात घरोघरी गणेश उत्सव साजरा केला जातो. साधारण ६८ हजार घरगुती गणपती मुर्तीची प्रतिष्ठापना होते. त्यामुळे प्रत्येक घरात गणेश उत्सव कालावधीमध्ये सरासरी शंभर ते दोनशे रुपयाची भाजी खरेदी केली जाते. गणेशोत्सवाच्या दहा दिवसाच्या कालावधीत तब्बल अडीच कोटी रुपयांची भाजीची उलाढाल होत असते. मात्र, या उलाढालीत सिंधुदुर्गातील तरुणांचा वाटा अत्यल्प आहे.

मी गेली ३५ वर्षे भाजी व्यापारात आहे. माझ्या आईने सत्तरच्या दशकामध्ये कणकवलीत भाजी व्यापार सुरू केला. सध्या बाजारपेठेची परिस्थिती, वातावरणातील बदल या भाजी विक्रीतून अधिक नुकसान होऊ लागले आहे. त्यातच परराज्यातील आणि परजिल्ह्यातील विक्रेत्यांनी सिंधुदुर्गात पाय रोवल्याने स्थानिक बाजारपेठेतील व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे.
- यशवंत गावडे, भाजी व्यवसायिक, वागदे

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87450 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..