चिपळूण ः जंगल सत्याग्रह केशवराव जोशी हुतात्मा झाले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः जंगल सत्याग्रह केशवराव जोशी हुतात्मा झाले
चिपळूण ः जंगल सत्याग्रह केशवराव जोशी हुतात्मा झाले

चिपळूण ः जंगल सत्याग्रह केशवराव जोशी हुतात्मा झाले

sakal_logo
By

rat१६p२१.jpg
43471
ः केशवराव जोशी
....
स्वातंत्र्यलढ्यातील सुवर्णपाने ....लोगो
....
स्वकीयांवर गोळीबारास नकार;हुतात्मा झाले मामलेदार


खानूचे केशवराव जोशी; चिरनारचा जंगल सत्याग्रह, हुतात्मा स्मृतिस्तंभावर नाव
चिपळूण, ता. १६ ः देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक ठिकाणी सत्याग्रह झाला. त्यात कोकणातील स्वातंत्र्यसैनिकांचा सहभाग मोठा आहे. या सत्याग्रहामध्ये अनेकांना वीरमरण आले. देशभर गाजलेल्या जंगल सत्याग्रहात कोकणतील खानू गावचे रहिवासी केशवराव जोशी यांना वीरमरण आले. स्वकीय आंदोलकांवर गोळीबार करण्यास नकार दिला, म्हणून जोशींवर गोळ्या झाडण्यात आल्या, अशी माहिती इतिहास अभ्यासक प्रकाश देशपांडे यानी दिली.
खानूचे रहिवासी केशवराव शिक्षण पूर्ण होताच कलेक्टर कचेरीत नोकरीला लागले. पहिल्या महायुद्धात कार्यालयीन कामात तत्परता दाखवल्यामुळे त्यांना बढती मिळून ते राजापूर येथे मामलेदार झाले. १९३० ला त्यांची बदली पनवेलला झाली. त्याचवेळी स्वातंत्र्य आंदोलनाला धार आली होती. पनवेल तालुक्यात कल्हे आणि चिरनेर येथे ८ सप्टेंबर १९३० ला जंगल सत्याग्रह झाला. पोलिसांनी मामलेदार केशवराव जोशी यांच्याकडे गोळीबार करण्याची परवानगी मागितली. केशवरावांनी ठामपणे नकार दिला. २५ सप्टेंबरला चिरनेरलाच दुसरा सत्याग्रह ठरला. दोन-तीन हजार सत्याग्रहींनी प्रतिकात्मक सुरवात केली. पोलिस इन्स्पेक्टर पाटील फौजफाटा घेऊन धावले. सत्याग्रहींवर अमानुष लाठीहल्ला केला. मामलेदार जोशी सत्याग्रहाच्या स्थानी आले. त्यांनी लाठीमार बंद करून बेड्या काढायचा आदेश दिला. सत्याग्रही मामलेदाराच्या आदेशानुसार तोडलेल्या झाडासह आणि कोयते घेऊन अटक करून घ्यायला अक्का देवीच्या देवळाजवळ येऊ लागले. मामलेदार जोशी पाणी पिण्यासाठी जवळच्या विहिरीकडे गेले अन ती वेळ साधून पोलिस इन्स्पेक्टरने अचानक सत्याग्रहींवर गोळीबार करण्याचा आदेश दिला. गोळ्यांनी अनेकांचे प्राण घेतले. अनेकजण जखमी झाले. मामलेदार जोशी पोलिसांना आवरण्यासाठी पुढे धावले; मात्र इन्स्पेक्टर पाटील याने झाडाआडून मामलेदारांवरच गोळी चालवली. गोळी पाठीत घुसून छातीतून बाहेर आली. त्यांच्याजवळ उभा असलेला शेवडे नावाचा राऊंडगार्ड यालाही ठार मारले. स्वातंत्र्य आंदोलनाला सहकार्य करणाऱ्या केशवराव जोशी यांची हत्या करण्यात आली. चिरनेरला असलेल्या हुतात्मा स्मृतिस्तंभावर त्यांचे नाव आहे.
-------------
चौकट
..यांनाही आले वीरमरण
उरण (जि. रायगड) येथील चिरनेरला २५ सप्टेंबर १९३० ला या परिसरातील आगरी, कोळी, कातकरी हे वनवासी हक्काच्या जंगलातली लाकडे तोडण्यासाठी आले. इंग्रजांचा आदेश झुगारून जंगल सत्याग्रह केला. इंग्रजांच्या पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अनेकजण जखमी झाले तर परशुराम रामा पाटील, धाकू, गवत्या फोफरेकर, नाग्या महादू कातकरी, रामा बामा कोळी, आलू बेमट्या म्हात्रे, हसुराम बुधाजी घरत, रघुनाथ मोरेश्वर न्हावी, यांना वीरगती प्राप्त झाली. त्यांच्याबरोबरच केशव महादेव जोशी यांनाही वीरगती प्राप्त झाली.
--------------------------------
चौकट
अनेक स्वातंत्र्यसैनिक सहभागी
कोकणातील मालवण आणि शिरोडा येथे झालेल्या सत्याग्रहात कोकणातील अनेक स्वातंत्र्यसैनिक सहभागी झाले होते. शिरोडा सत्याग्रहाचे नेतृत्व कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांनी केले होते. सागरसान्निध्य नसलेल्या भागात जंगल सत्याग्रह करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87498 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..