जिल्ह्याला पालकमंत्री भाजपचाच हवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्याला पालकमंत्री भाजपचाच हवा
जिल्ह्याला पालकमंत्री भाजपचाच हवा

जिल्ह्याला पालकमंत्री भाजपचाच हवा

sakal_logo
By

44302
सावंतवाडी ः पत्रकार परिषदेत बोलताना राजन तेली. शेजारी पुखराज पुरोहित, दत्तू नार्वेकर आदी.


जिल्ह्याला पालकमंत्री भाजपचाच हवा

राजन तेली ः शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांशी जुळवून घेण्याची तयारी

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ ः राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार लक्षात घेता जिल्ह्यातील विकासकामांसाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी निश्चितच जुळवून घेऊ. परंतु, भारतीय जनता पार्टी या नात्याने या जिल्ह्याचा पालकमंत्री हा भाजपाचाच असावा, अशी आमची मागणी असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे स्पष्ट केले.
आगामी गणेशोत्सव सण लक्षात घेता रस्ते वाहतुकीसाठी सुरळीत व्हावे, यासाठी व अन्य जिल्ह्यातील रखडलेल्या कामासाठी आमदार नितेश राणे व भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांच्यासोबत विविध मंत्र्यांची भेट घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
येथील माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा प्रवक्ते परब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरात आलेल्या भाजप जिल्हाध्यक्ष तेली यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी संजू परब, भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी पुखराज पुरोहित, आंबोली उपसरपंच दत्तू नार्वेकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी आदी उपस्थित होते.
श्री. तेली म्हणाले, ‘‘ठाकरे सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात जिल्ह्यातील अनेक प्रश्न प्रलंबित राहिले. यात प्रामुख्याने सावंतवाडी तालुक्यातील विविध राज्यमार्ग व ग्रामीण रस्ते, दोडामार्ग आडाळी एमआयडीसी, आंबोली गेळे कबुलायतदार गावकर प्रश्न, सावंतवाडी पंचायत समितीची इमारत, पालिकांचे विविध प्रलंबित व अपूर्ण राहिलेले प्रकल्प हे प्रश्न मागील अडीच वर्षात रखडले गेले. दोडामार्ग एमआयडीसी ही तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मंजूर केली होती; मात्र, सुभाष देसाई उद्योगमंत्री झाल्यानंतर हा प्रकल्प रखडला. श्री. राणे केंद्रीय उद्योगमंत्री झाल्यानंतर तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी त्यासाठी प्रयत्न केला. मात्र, देसाई यांनी त्यांना साथ दिली नाही. आता कोकणचे सुपुत्र उदय सामंत हे उद्योगमंत्री असल्याने या दोघांच्या माध्यमातून आडाळी एमआयडीसीचा प्रश्न त्वरित मार्गी लावण्यात येईल. यासाठी दोनच दिवसांपूर्वी मंत्री सामंत यांच्यासोबत बैठक झाली असून प्लॉट डिस्ट्रीब्यूशन ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्याची तसेच गोवा व अन्य भागातील काही उद्योजकांसोबत अधिकाऱ्यांची एकत्र बैठक घेण्याची मागणी आम्ही केली आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘गणेशोत्सव तोंडावर आल्याने महामार्गावरील तसेच राज्य मार्ग व अन्य महत्त्वाच्या मार्गावरील पडलेले खड्डे त्वरित दुरुस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली असून त्यांच्यासोबत तशी चर्चा केली आहे. येत्या २२ ऑगस्टला मंत्री चव्हाण हे यासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेणार असून हे काम त्वरित मार्गी लागेल, असे अभिवचन त्यांनी दिले आहे. सावंतवाडी पंचायत समिती इमारतीचा प्रश्नही गेले अनेक वर्षे प्रलंबित राहिला आहे. त्यामुळे या इमारतीचा प्रश्न त्वरित निकाली लागावा यासाठी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली असून येत्या अर्थसंकल्पात त्यासाठी निधी मंजूर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्याचप्रमाणे सावंतवाडी व वेंगुर्ले पालिकेच्या रखडलेल्या प्रकल्पासंदर्भात देखील नगरविकास मंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली असून त्यासाठीही निधी उपलब्ध करण्यात येणार आहे.’’
-----------
चौकट
कबूलायतदार गांवकर प्रश्न लवकरच मार्गी
आंबोली कबूलायतदार गांवकर प्रश्न सद्यस्थितीत अंतिम टप्प्यात आला आहे. यासाठी मंत्री दीपक केसरकर यांनी बैठक घेतल्यास आम्ही देखील या बैठकीस उपस्थित राहू. शेवटी हा प्रश्न निकाली लागणे महत्त्वाचे असून नव्या सरकारच्या माध्यमातून हा प्रश्न निश्चितच मार्गी लागेल, असा विश्वासही श्री. तेली यांनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88549 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..