प्रशासकीय चौकटीतच कार्यवाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रशासकीय चौकटीतच कार्यवाही
प्रशासकीय चौकटीतच कार्यवाही

प्रशासकीय चौकटीतच कार्यवाही

sakal_logo
By

प्रशासकीय चौकटीतच कार्यवाही

प्रकाश रसाळ : एसटी प्रशासनावर आरोप चुकीचे

कणकवली, ता. २० : एसटी महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाचे प्रमुख म्‍हणून कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या प्रशासकीय चौकटीत बसवून पूर्ण केल्‍या जात आहेत, तर कुणी चुकीचे वागत असेल तर महामंडळाच्या जनहिताच्या दृष्‍टीने कारवाईचेही अधिकार प्रमुख या नात्‍याने मला आहेत. आज हीच कारवाई होण्याची कुणकुण लागल्याने कुणी आरोप करत असेल तर ते अयोग्य आहे, अशी भूमिका एसटी विभागाचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी आज मांडली.
एसटी सिंधुदुर्ग विभागातील काही कर्मचारी नेत्‍यांनी विभाग नियंत्रकांच्या कार्यपद्धतीबाबत टीका केली होती. त्‍यावर श्री. रसाळ यांनी आज आपली भूमिका स्पष्‍ट केली. ते म्‍हणाले की, एसटी महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या ज्या न्याय्य मागण्या आहेत त्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. प्रशासकीय चौकटीत कामकाज करताना प्रत्येक वेळी आम्ही सांगतो तेच करा, असे कुणी सांगत असेल तर ते कधीही शक्य होत नाही. एखाद्या कर्मचाऱ्याची किंवा अधिकाऱ्याची बदली करताना किंवा कामगिरीवरून काढताना त्या कर्मचाऱ्याच्या विनंतीचा विचार करावयाचा असतो; मात्र तसे न करता एखादा निर्णय घेणे म्हणजे त्या कर्मचाऱ्यावर अन्याय करण्यासारखेच आहे. त्यामुळे कुणी मागणी केली व कार्यवाही झाली नाही म्हणून प्रशासन चुकीचे काम करते, असे म्हणणे उचित नाही.
ते म्‍हणाले की, प्रशासकीय प्रमुख या नात्याने सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने काम करणे गरजेचे असते. त्याचे तंतोतंत पालन सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक या नात्याने करत आहोत. तसेच कर्मचाऱ्यांनी भेटण्यासाठी वेळ मागितल्यावर त्याचे पालन दोन्ही बाजूकडून व्हायला हवे. ते न झाल्यास अधिकारी उपलब्ध होत नाहीत, असे म्हणणे संयुक्तिक नाही. दरम्‍यान, प्रशासनावर आरोप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटीवेळी प्रशासनाच्या सहकार्याबद्दल धन्यवाद द्यायचे आणि नंतर प्रशासनावर आरोप करायचे हे नियमाच्या चौकटीला धरून नाही.
---
...तर कारवाईचा अधिकार
एखाद्या कर्मचाऱ्याने महामंडळाच्या हिताला बाधा उत्पन्न होईल, असे काम केले असेल तर त्यावर प्रशासकीय कारवाईचा अधिकारही आम्हाला आहे; मात्र अशा कारवाईबाबत कुणकुण लागल्याने प्रशासनावर कोणी आरोप करत असेल तर महामंडळाच्या हिताला बाधा निर्माण करणाऱ्यांबाबत कारवाईची प्रक्रिया यामुळे निश्‍चितच थांबणार नाही, असेही श्री. रसाळ यांनी स्पष्ट केले.