गणेशोत्सवात आंबोलीतून जड वाहतूक बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवात आंबोलीतून जड वाहतूक बंद
गणेशोत्सवात आंबोलीतून जड वाहतूक बंद

गणेशोत्सवात आंबोलीतून जड वाहतूक बंद

sakal_logo
By

44508
सावंतवाडी ः शांतता समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर. सोबत तहसीलदार श्रीधर पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळंके, सावंतवाडी पोलिस निरीक्षक शंकर कोरे आदी.


गणेशोत्सवात आंबोलीतून जड वाहतूक बंद

सावंतवाडी शांतता समितीची बैठक; सणासुदीत काळजी घेण्याच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २० ः गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर आंबोली घाटातील अवजड वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय आज येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत घेण्यात आला. कोरोनाचे अनेक निर्बंध शासनाने शिथिल केले आहेत; मात्र कोरोना अजूनही पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे सणासुदीच्या काळात काळजी घ्या. सोशल डिस्टन्सिंगसह मास्कचा वापर करा. ज्यांना आजार आहे, त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, असे आवाहन प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांनी केले.
येथील तहसीलदार कार्यालयात प्रांताधिकारी पानवेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळंके, सावंतवाडी पोलिस निरीक्षक शंकर कोरे, बांदा पोलिस निरीक्षक शामराव काळे, सार्वजनिक बांधकाम अधिकारी अनिल आवटी, पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर, पोलिस हवालदार अमित राऊळ, माजी नगरसेवक राजू बेग, अफरोज राजगुरू, अॅड. नकुल पार्सेकर, बांदेकर आरोग्य विभाग, वीज अधिकारी, आगार व्यवस्थापक आदी उपस्थित होते.
सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी मोठ्या नदीवर गणपती विसर्जन केले जाते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सायंकाळी सातपूर्वी विसर्जन करा, असेही आवाहन प्रांताधिकाऱ्यांनी केले. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांची गैरसोय होणार नाही, याकडे महावितरण, बीएसएनएलने लक्ष द्यावे. एसटी विभागाने सुरळीतरित्या गाड्यांचे नियोजन करावे. या काळात कुठल्याही प्रकारे शांतता भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात चाकरमानी जिल्ह्यात दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आंबोली व मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात गणेशोत्सव काळात आरोग्य यंत्रणेची पथके ठेवण्यात येणार आहेत. प्रवाशांची तपासणी करूनच त्यांना बाहेर सोडण्यात येणार आहे, यासाठी त्यांना पोलिस प्रशासनाचे सहकार्य राहील, असे सांगण्यात आले. तर रेल्वे व एसटी प्रशासन यांच्यात अनेकदा सुसूत्रता नसल्यामुळे प्रवाशांना ताटकळत राहावे लागते. ही गैरसोय दूर करण्यासाठी एसटी प्रशासनाने रेल्वे स्थानकाशी संपर्क साधून वेळापत्रक मागवून घ्यावे व त्यानुसार रेल्वेच्या वेळेत त्या ठिकाणी एसटी सोडाव्या. रात्री उशिरापर्यंत ही सेवा द्यावी, जेणेकरून कोणत्याही प्रवाशांची गैरसोय होणार नाही, अशा सूचना एसटी प्रशासनाला देण्यात आल्या. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र पोलिस यंत्रणा अलर्ट राहिली पाहिजे. त्यासाठी नाक्यानाक्यावर तसेच गणेश विसर्जनस्थळी पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात यावा. रेल्वे स्टेशन परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त असावा, अशा सूचना यावेळी पोलिस प्रशासनाला देण्यात आल्या. घाटातून मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक लक्षात घेता त्या ठिकाणी दोन दिवसांत रिप्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक लावा, अशा सूचना सार्वजनिक बांधकामला देण्यात आल्या. तालुक्यातील प्रत्येक सार्वजनिक विसर्जनस्थळी विद्युत दिव्यांची सुविधा उपलब्ध करावी, अशीही सूचना देण्यात आली. शहरात पार्किंगची सुविधा योग्य पद्धतीने करण्यासाठी नियोजन करण्यात आले.
---
पोलिसांची करडी नजर
गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने सोशल मीडियावर कोणीही धार्मिक स्थळांबाबत संदेश किंवा समाजामध्ये, धर्मामध्ये तेढ निर्माण करणारा कोणताही संदेश प्रसारित करू नये. वाद होतील असे फलक लावू नयेत. या सगळ्यावर पोलिस यंत्रणेची करडी नजर राहील, असे उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळंके यांनी सांगितले.