बीएसएनएलचा फोरजीसाठी ‘मास्टर प्लॅन’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बीएसएनएलचा फोरजीसाठी ‘मास्टर प्लॅन’
बीएसएनएलचा फोरजीसाठी ‘मास्टर प्लॅन’

बीएसएनएलचा फोरजीसाठी ‘मास्टर प्लॅन’

sakal_logo
By

44568

बीएसएनएलचा फोरजीसाठी ‘मास्टर प्लॅन’

धोंडी चिंदरकर ः जिल्ह्यातील ८४ गावांना मिळणार इंटरनेट सेवा

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २० : जिल्ह्यात संपर्कक्रांती करण्याच्या दृष्टीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून माजी खासदार नीलेश राणे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. माजी खासदार राणेंच्या मागणीनुसार बीएसएनएलने केलेल्या सर्व्हेनुसार जिल्ह्यातील ८४ गावे अद्यापही इंटरनेटपासून वंचित असून या गावांत ४ जी सेवा सुरू करण्यासाठी बीएसएनएलने ५०० दिवसांचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. या कालावधीत संबंधित गावात ४ जी मोबाईल सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी या गावात टॉवर उभारणीसाठी किमान २०० चौरस मीटर जागा उपलब्ध करून देण्याबाबत बीएसएनएलने सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र सादर केले आहे. याअंतर्गत मालवण तालुक्यात २३, तर कुडाळ तालुक्यात १२ गावांना ४ जी सेवेचा लाभ मिळणार असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावे आजही बीएसएनएलच्या ४ जी सेवेपासून वंचित आहेत. यामुळे संबंधित गावातील ग्रामस्थांबरोबरच शासकीय कामकाजातही अडथळे निर्माण होत आहेत. याबाबत भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार नीलेश राणे यांनी केंद्रीय लघू सूक्ष्म मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून दूरसंचार विभागाकडे पाठपुरावा करून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानुसार दूरसंचार विभागाने केलेल्या सर्वेत जिल्ह्यातील ८४ गावे अद्यापही ४ जी सेवेपासून वंचित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या गावांत ४ जी मोबाईल सेवा सुरू करण्यासाठी ५०० दिवसांचा कालबद्ध आराखडा दूरसंचार विभागाने तयार केला आहे. त्या अंतर्गत या कालावधीत संबंधित गावांमध्ये आवश्यकता भासल्यास टॉवर उभारून ४ जी सेवा सुरू केली जाणार आहे.
--
या गावांचा समावेश
संबंधित ८४ गावात टॉवर उभारणीसाठी २०० चौरस मीटर जागा उपलब्ध करून देण्याबाबत दूरसंचार विभागाने सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र सादर केले आहे.
मालवण तालुक्यातील बिळवस, हिवाळे, गोळवण, शिरवंडे, असरोंडी, महान, आंगणेवाडी, अपराधवाडी, बागवेवाडी, भोगलेवाडी, चिंदर, डिकवल, जुवा पाणखोल, खोटले, कुडोपी, कुंभारवाडी, माळगाव, ओवळीये, पलीकडीलवाडी, त्रिंबक, वाडी डांगमोडे, वायंगवडे, वेरळ या गावांचा समावेश आहे. कुडाळ तालुक्यातील कवठी, पुळस, उपवडे, साकीर्डे, वासोली, शिवापूर, आंजिवडे, नेरूर, चाफेली, तुळसुली, भरणी, ओरोस खुर्द या गावांचा समावेश आहे.