चिपळूण-ट्रकखाली चिरडून कोंडमळ्यातील तरुणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-ट्रकखाली चिरडून कोंडमळ्यातील तरुणाचा मृत्यू
चिपळूण-ट्रकखाली चिरडून कोंडमळ्यातील तरुणाचा मृत्यू

चिपळूण-ट्रकखाली चिरडून कोंडमळ्यातील तरुणाचा मृत्यू

sakal_logo
By

rat20p23.jpg-
44543
चिपळूण ः अपघातानंतर महामार्गावरील जमावामुळे वाहतूक कोंडी झाली होती.

rat20p24.jpg-
44561
चिपळूण ः ठेकेदार, अधिकारी घटनास्थळी न आल्याने संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको केला.

rat20p25.jpg-
44562
ग्रामस्थांच्या रास्ता रोको आंदोलनामुळे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

कोंडमळ्यातील तरुणाचा
ट्रकखाली चिरडून मृत्यू

चिपळुणात संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको; घटनास्थळी तणाव

चिपळूण, ता. २० ः शहरातील पॉवरहाउस येथे दुचाकीस्वाराचा ट्रकखाली सापडून जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. २०) घडली. हा अपघात सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडला. किरण कृष्णा घाणेकर (वय २८, रा. कोंडमळा) असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर तरुणाच्या मृत्यूस ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप कोंडमळा ग्रामस्थांनी केला. ठेकेदार प्रतिनिधी अथवा राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी येत नाहीत, झाल्या घटनेची जबादारी स्वीकारत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने घटनास्थळी तणाव निर्माण झाला. सायंकाळी उशिरा ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केल्याने पोलिसांनीही मोठा बंदोबस्त ठेवला होता.
शनिवारी पाग-पॉवर हाउस मार्गावर खड्डे बुजविण्याचे काम सुरू होते. यावेळी लोटेकडून कोंडमळ्याकडे जाणारा किरण घाणेकर हा पाग पॉवरहाउस येथे आला असता, समोरून येणाऱ्या ट्रकखाली सापडला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. किरणने हेल्मेट घातलेले असतानाही त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणाचा मृतदेह कामथे उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. किरण हा लोटे येथील कंपनीत नोकरीस होता. त्याच्या मागे पत्नी, लहान मुले, भाऊ, आई, वडील असा परिवार आहे.
रोलरने खड्डे बुजवत असताना ठेकेदार कंपनीने सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही काळजी न घेतल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. पॉवरहाउस येथे खड्डे बुजवताना ठेकेदार कंपनीने देखरेखीसाठी माणसे ठेवली नव्हती. एकीकडे खड्डे बुजवण्याचे काम सुरू असताना दोन्ही बाजूने वाहतूक सुरू राहिल्याने हा अपघात घडला. संबंधित तरुणाची कोणतीही चूक नव्हती. दुचाकीचा वेगही खूप कमी होता. तरीही
निव्वळ खड्ड्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी घटना पाहणारे कामथे गावचे माजी उपसरपंच प्रदीप उदेग यांनी दिली.
अपघातानंतर कोंडमळा येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. या अपघाताला जबाबदार असणारे ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग अधिकारी जागेवर येईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण होते. उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी, रवींद्र शिंदे यांनी आणखी बंदोबस्त मागवून घेतला आणि ग्रामस्थांना सहकार्याचे आवाहन केले; परंतु ठेकेदार आणि अधिकारी जागेवर येऊन चर्चा करेपर्यंत हटणार नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तसेच चर्चेसाठी कोणी न आल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. मात्र, तरीही अधिकारी न आल्याने सातच्या सुमारास ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आणि त्यांनी रास्ता रोको सुरू केला.
------
चौकट
महामार्गावर यापूर्वी दोघांचा मृत्यू
महामार्गावरील खड्ड्यांमुळे काही महिन्यांपूर्वी बहादूरशेखनाका येथे भोम येथील तरुणीचा डंपरखाली सापडून मृत्यू झाला होता. कामथे येथेही अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला होता.